अपर्णा देशपांडे
लग्नानंतर प्रत्येक तरुणीच्या मनात माहेराविषयी कितीही आत्मियता, प्रेम असलं तरी एकदा का ती सासरी गेली की ते घर तिचं होतं आणि माहेर कधी तरी येण्याचं ठिकाण होतं. खरंच माहेर उपरं करतं का?
जन्मापासून वयाच्या एका टप्प्यापर्यंत आई-वडिलांचं घर हे मुलीचं घर असतं. जेव्हा तिचं लग्न होतं, तेव्हा नवऱ्याचं घर हे तिचं घर आणि वडिलांचं घर माहेर म्हणवलं जातं. खरं तर प्रत्येक मुलगी लग्नानंतर देहानं जरी सासरी गेली तरी मनानं मात्र माहेरीच रेंगाळत असते. असंख्य आठवणी आणि त्याच्याशी जुळलेल्या कोमल भावना तिला महेराशी जोडून ठेवतात.
तिच्या सासरी जोपर्यंत सगळं छान छान सुरू असतं तेव्हा माहेरीदेखील आनंद आणि समाधान नांदत असतं. तन्वीदेखील सासरी गेलेली एक गोड तरुणी. लग्नानंतर काही दिवसांतच तिला लक्षात आलं, की तिचा नवरा अत्यंत विक्षिप्त, शीघ्रकोपी, आणि कमालीचा संशयी आहे. सासरचे इतर लोकही तिच्याशी खूप वाईट वागत असत. तन्वीनं जुळवून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही महिन्यांतच नवऱ्याने तिच्या समोर घटस्फोटाची कागदपत्रं ठेवली.
ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होती. केस कोर्टात उभी राहिली त्या काळात ती अर्थात माहेरी राहात होती. सुरुवातीचे काही दिवस सगळं ठीक होतं. आई-वडील, भाऊ भावजय तिच्याशी खूप प्रेमाने वागत. तिनं एकटीनं वेगळं राहण्याचा प्रस्ताव सगळ्यांनी धुडकावून लावला. पण काही महिन्यांनी हळूहळू सगळ्यांचं वागणं बदलू लागलं. घरात थोडी खुसफुस सुरू झाली. कधी नकळत आईचा स्वर तीव्र होऊ लागला. भायजय पूर्वीसारखी मोकळेपणाने वागत नाहीये हे जाणवू लागलं. आपल्या इथे नसण्याची सगळ्यांना सवय झाली आहे आणि त्यांची तशी घडी बसली आहे ज्यात आपण उपरे होतोय की काय अशी शंका तन्वीला येऊ लागली. आपण घरावर आपला आर्थिक बोजा अजिबात पडू द्यायचा नाही म्हणून ती जाणीवपूर्वक घरात खर्च करत होती, ऑफिस मधून येताना भाज्या, फळं आणि अनेक वस्तू आणत होती. सगळ्यांना काही ना काही भेट वस्तू आणत होती. पण पूर्वीचा मोकळा स्वर आता बदलला होता, हे तिला ठामपणे जाणवत होतं.
हेही वाचा >>> निसर्गलिपी : हिरवा कोपरा
एकदा तर भाऊ बोलता बोलता म्हणाला, की मुद्दाम तीन बेडरूमचा फ्लॅट घेतला कारण आता आम्हाला मूल होईल. मग त्याला एक खोली लागेल. तिला जाणवलं, की आता इथून निघायची वेळ आलेली आहे. तिनं सरळसरळ आईजवळ विषय काढला.
“आई, मला कल्पना आहे की तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण आता तुम्ही माझी फार काळजी करणं कमी करा. मला ऑफिसजवळ अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर एक छोटासा फ्लॅट भाड्याने मिळतोय. इथून ऑफिस दूर पडतं. शिवाय दादा-वहिनी आणि तुम्ही यांची चांगली घडी बसलेली आहे. घराची रचना आणि सोय तुमच्या दृष्टीने तुम्ही करवून घेतली आहे. उद्या दादाचं कुटुंब मोठं होईल. त्यांना जागा कमी पडेल. तुम्हाला आता इथे आणखी एक घर मिळेल हक्काचं. कधी तुम्ही तिकडे या, कधी मी येईन. हे प्रेम असंच कायम राहण्यासाठी मला इथून जाऊ द्या.” तिचं हे निर्वाणीचं बोलणं ऐकून आई खूप रडली. पण तन्वी तिच्या निर्णयावर ठाम होती. सध्याच्या परिस्थितीत अंतर ठेवून प्रेम टिकवणं जास्त गरजेचं होतं.
ती भाड्याच्या फ्लॅटवर शिफ्ट झाली. कुणालाही न दुखावता ती तिच्या माहेरून बाहेर पडली. घरच्यांनी तिला पूर्ण मदत केली. आईचे डोळे सारखे भरत होते, पण बाकी सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला असणार असं तिला वाटत होतं.
हेही वाचा >>> “बालसंगोपन रजा नाकारणं म्हणजे घटनेचं उल्लंघन”, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या धोरणावरून फटकारले!
या सगळ्या काळात तिची बाल मैत्रीण सुलभा कायम तिच्या सोबतीला होती. “सुलभा, मला वाटतं, की कुठल्याही विवाहित स्त्रीवर लग्न मोडण्याची वेळ येऊच नये. आणि जर तशी वेळ आलीच तर तिनं शक्य होईतो आत्मनिर्भर व्हावं. आपले जन्मदाते हे आपलेच असतात गं, पण परिस्थिती माणसाला अगतिक करते. मी कायमची इथे राहील की काय ही भीती मला दादा-वहिनीच्या नजरेत दिसू लागली होती. आई-बाबा म्हणाले, की आपण तिघं वेगळं राहू, पण मला ते मान्य नव्हतं. मी आता फ्लॅटवर शिफ्ट झालेय तर आता त्यांनी हककानं इथं यावं. स्वागत आहे. पण एका छताखाली कायम राहणं नको. लग्न मोडून फार काळ माहेरी राहिलं की ते घरही उसासे टाकू लागतं. जीभ थोडी काटेरी होत जाते. त्यांच्याही नकळत किंवा कदाचित आपल्याला त्यांचे साधे शब्दही काटेरी वाटत असावेत. परिस्थिती वाईट असते. आपली माणसं वाईट नसतात.”
सुलभानं प्रेमानं तिच्या पाठीवर हात ठेवला. तिला तिच्या मैत्रिणीच्या भावना पूर्णपणे कळत होत्या. तिच्या मनात वाक्य घोळत होतं, माणसं वाईट नसतात, परिस्थिती वाईट असते…
adaparnadeshpande@gmail.com