सध्या नवीन वर्षाची सगळीकडे जय्यत तयारी सुरू आहे. नवीन वर्ष कसे जाणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. वर्षाच्या अखेरीस नवीन वर्ष सुख, समृद्धी आणि आनंदाने जावे, म्हणून काही लोक स्वत:साठी संकल्प करतात. हे संकल्प तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या अगदी जवळ घेऊन जातात आणि यामुळे तुम्हाला स्वत:ला प्रेरणा मिळते.
नवीन वर्षानिमित्त महिलांनी काही संकल्प घेण्याची गरज आहे. हे संकल्प महिलांना चुका करण्यापासून वाचवतील आणि स्वत:वर प्रेम करण्यास प्रोत्साहन देतील.
१. इतरांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहू नका
महिलांनो, स्वत:ला इतके स्वावलंबी बनवा की कुणावरही आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहू नका. तुमची आर्थिक बाजू नेहमी मजबूत असावी. तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम बना. तुम्ही विवाहित असाल किंवा नसाल, पण स्वत:च्या पायावर उभे राहा. परिस्थिती माणसाला कधी कोणता दिवस दाखवेल सांगता येत नाही, त्यामुळे इतरांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून न राहता स्वत:चे एक वेगळे अस्तित्व निर्माण करा.
२. स्वत:चे निर्णय स्वत: घ्या.
अनेकदा महिला भीतीपोटी स्वत:चे निर्णय स्वत: घेत नाहीत. निर्णय घेताना त्या इतरांवर अवलंबून राहतात, पण हे चुकीचे आहे. स्वत:चा निर्णय व्यक्तीने स्वत: घ्यावा आणि त्या निर्णयाच्या चांगल्या वाईट परिणामांची सुद्धा जबाबदारी घ्यावी. अनेकदा कठोर निर्णय घेताना तुम्हाला मार्गदर्शनाची गरज भासू शकते पण शेवटी निर्णय हा तुमचा असावा. इतरांवर स्वत:ची जबाबदारी ढकलू नका तर स्वत:ची जबाबदारी स्वत: उचला.
३. बचत करा, अति खर्च करू नका
अनेक महिलांना अति खर्च करण्याची सवय असते. खरेदी हा महिलांचा आवडता विषय आहे. अशात नवीन वर्षानिमित्त तुम्ही अति खर्च करण्याची तुमची सवय मोडू शकता. नवीन वर्षात तुम्ही खर्च करण्याऐवजी बचत करण्याची सवय लावा. त्यामुळे तुमचे नवीन वर्ष आर्थिकदृष्ट्या सुद्धा चांगले जाईल. पैशांची बचत करणे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. महिलांनो, अडचणीच्या वेळी बचत केलेला पैसाच कामी येतो.
४. अति जास्त भावनिक होऊ नका
अनेक महिला खूप भावनिक असतात आणि या भावनिकतेच्या ओघात असे काही निर्णय घेतात, की नंतर पश्चाताप होतो. महिला पुरुषांपेक्षा खूप लवकर भावूक होतात, असे म्हणतात. महिलांनो भावूक होणे, हा स्वभावाचा एक भाग आहे पण त्यामुळे तुमचे नुकसान व्हायला नको, याची काळजी घ्या.
५. करिअरला प्राधान्य द्या, करिअरचा त्याग करू नका
स्त्री पुरुष समानतेविषयी आपण बऱ्याचदा बोलतो पण जेव्हा करिअरविषयी बोलल्या जाते तिथे मात्र अनेकदा महिलांना करिअरचा त्याग करावा लागतो. लग्नानंतर अनेकदा महिला कोणताही मागच पुढचा विचार न करता करिअरचा त्याग करतात पण असे करू नका. जोडीदाराबरोबर बोला, त्यांच्याबरोबर संवाद साधा आणि एकमेकांच्या करिअरचा आदर करा. विशेषत: महिलांनो, तुम्हीही तुमच्या जोडीदाराप्रमाणे नेहमी स्वत:च्या करिअरला प्राधान्य द्या.
६. आरोग्याची काळजी घ्या, त्याकडे दुर्लक्ष करू नका
अनेकदा महिला घर, नोकरी किंवा व्यवसाय सांभाळताना स्वत:कडे लक्ष देत नाही.अशावेळी तिला अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. महिलांनो, जेव्हा तुम्ही निरोगी राहाल तेव्हाच तुम्ही इतरांची सुद्धा काळजी घेऊ शकाल. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वत:साठी सुद्धा जगा.
६. चौकटी बाहेर जाऊन नवीन गोष्टी शिका. स्वत:ला बंधनात टाकू नका
भारतीय संस्कृतीत पूर्वीपासून महिलांना खूप मर्यादा होत्या. आजही अनेक महिला स्वत:ला त्याच चौकटीत ठेवून जगतात. महिलांनो, स्वत:ला चौकटी बाहेर काढा आणि मोकळा श्वास घ्या. स्वत:ला बंधनात टाकून तुम्ही मुक्तपणे आणि आनंदाने जगू शकत नाही. त्यामुळे चौकटीच्या बाहेर पडून नवीन गोष्टी आत्मसात करा. आयुष्य खूप सुंदर आहे. भरभरून जगा.
७. शारीरिक आणि मानसिक अत्याचार सहन करू नका
भारत कितीही प्रगतशील देश असला तरी आजही अनेक महिला अत्याचाराच्या शिकार होतात. महिलांनो, कधीही शारीरिक आणि मानसिक अत्याचार सहन करू नका. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, त्या विरुद्ध उभे राहा आणि लढा. तुमचे एक पाऊल अनेक महिलांना प्रेरित करू शकतात. लक्षात ठेवा, अत्याचार सहन करणारा सुद्धा तितकाच गुन्हेगार असतो त्यामुळे अन्यायाविरुद्ध आवाज उचलायला शिका.
८. स्वत:ला कधीही कमी लेखू नका
अनेकदा महिला पुरुष प्रधान संस्कृतीत वावरताना स्वत:चा आत्मविश्वास गमावून बसतात. ज्या महिलांकडे आर्थिक, सामाजिक, कौटूंबिक किंवा इतर कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार नसतात त्या स्वत:ला इतरांपेक्षा कमी लेखतात. मला हे जमणार नाही, मी हे करू शकणार नाही असे त्या सातत्याने बोलतात ज्याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावरसुद्धा होतो.
९. स्वत:वर प्रेम करा आणि स्वत:वर विश्वास ठेवा
स्वत:वर प्रेम करायला शिका. स्वत:वर विश्वास ठेवा. नवीन गोष्टी शिकण्याचा नेहमी प्रयत्न करा. तुमच्यात जग बदलण्याची ताकद आहे. तुम्ही वर्तमानाचा आधार आहात आणि भविष्याची गरज आहात.
महिलांनो,
“तुच तुला सावरावं…
तुझ्यातल्या ‘तु’ ला
तुच आरशात बघावं…
तुझ्यात लपलेल्या
‘तू’ ला तूच बाहेर काढावं…
तूच आहे तुझी
‘तू’ तुझ्यावरच प्रेम करावं…”