चालत्या लोकलमधून उतरू नये किंवा चढू नये. रेल्वे रूळावरून क्रॉस करू नये, ब्रिजचा वापर करावा; असे बरेच नियम रेल्वे प्रशासनाने घालून दिले आहेत. मात्र, आता यामध्ये ‘लोकल’ नियमांची भर पडली आहे. प्रवाशांना रोजच्या त्रासदायक असलेल्या प्रवासात दिलासा मिळावा यासाठी ठरवलेले नियम म्हणजे ‘लोकल’ नियम. हे नियम लिखित नाहीत. तुम्ही रोज प्रवास करू लागलात की तुमच्याही अंगवळणी पडतील किंवा क्या रे नया है क्या, असं एक वाक्य ऐकलं की तुम्हाला हे नियम समजून घ्यायला भाग पाडतील. पण, या नियमांमुळे रोज कोणत्या ना कोणत्या लोकलच्या डब्यात वाद होत असतात. मग तो महिलांचा डब्बा असो किंवा पुरुषांचा. सगळीकडे हे ‘लोकल’ नियम लागू. यात मात्र एवढाच फरक आहे की, महिलांच्या डब्यात थोडे वेगळे नियम आहेत आणि पुरुषांच्या डब्यात थोडे वेगळे नियम आहेत. असो. पण, हे ‘लोकल’ नियम का पाळायचे असा एक प्रश्न निर्माण झाला आहे. या ‘लोकल’ नियमाने आतापर्यंत केलेल्या प्रवासातला अनुभव…

डोंबिवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा माझा नेहमीचा प्रवास असतो. शिफ्टनुसार मी माझ्या वेळेच्या लोकलनं प्रवास करत असते. कधी सकाळी ७.१४ ची लोकल, तर कधी ८.१४ ची लोकल आणि सीएसएमटीवरून येताना रात्री ८.४४ ची कसारा किंवा ९.२६ ची कर्जत. या लोकल माझ्या ठरलेल्या असतात. याच लोकलमधून प्रवास करताना आलेला अनुभव सांगतेय. डोंबिवली स्टेशनला जरी ७.१४ ची लोकल पकडण्यासाठी धावपळ करून आले तरी ती लोकल नेहमीच उशिरा असते. ही बदलापूरवरून सुटणारी लोकल असते. महिलांच्या डब्यात चढताना तर खूप मारामारी असते. आधीच लोकलच्या दरवाज्यात उभ्या राहिलेल्या महिलांना धक्काबुकी करून आत कसं बसं शिरायचं असतं. त्यात ठाण्याला उतरणाऱ्या महिलांची गर्दी जास्त असेल तर मग काही खरंच नाही. अशात आतमध्ये गेलं तर दररोजचा प्रवास करणाऱ्या महिलांचा एक ग्रुप तयार झालेला असतो. यातल्या महिला आपापल्या मैत्रिणींच्या जागा आधीच बुक करून ठेवतात. मग ती मैत्रीण आरामात चढून आली तरी तिच्या बसण्यासाठी जागा तयार असते. तिच्या अगोदर धावपळ करत चढलेल्या महिला किंवा मुली वेड्याच, असं वाटू लागतं. यावरून कधी कधी वादही होतो. पण, तो महिलांचा एक ग्रुप असल्यामुळे वाद घालणारी एकटी महिला त्यात मात्र अपयशी ठरते.

दुसऱ्या बाजूला महिलांच्या डब्यात चढल्यानंतर कोणी ठाणे आहे का? कोणी घाटकोपर आहे का? कोणी कुर्ला आहे का? तुम्ही कुठे उतरणार? असं एकमेकींना विचारावं लागतं. बोलणाऱ्याची मातीही विकली जाते अन् न बोलणाऱ्याचे सोनं विकलं जात नाही अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती असते. ज्या महिलेनं एखादी जागा विचारली नाही, तर तिला मात्र शेवटपर्यंत उभं राहून प्रवास करावा लागतो. जर नशीब चांगलं असेल तर मग चौथी सीट मिळते.

हेही वाचा – मासिक पाळीच्या काळात वर्क फ्रॉम होम करण्याची सवलत!

या चौथ्या सीटवरून आठवलं. महिलांच्या डब्यातली चौथी सीट म्हणजे मौल्यवान जागा म्हणायला काही हरकत नाही. या जागेवरून सर्वात जास्त वाद होतात. जर ती जागा दिली नाही तर मात्र तुमची खैर नाही आणि जरी ती जागा दिली तर मग ‘थोडं अजून सरका’ यावरून कधी कधी जोरजोरात वाद होताना पाहिले आहेत. मला तर कोणाशी वाद घालण्यात अजिबात रस नसतो. मूग गिळून मी लोकलमधून प्रवास करत असते. जर जागा मिळाली तर देवाच्या कृपेने मिळाली असं समजते, नाही मिळाली तर आज बसमध्ये बसायला मिळले या समाधानानं पुढला प्रवास करते. हा होता सकाळी ७.१४ च्या लोकलमधल्या प्रवासाचा अनुभव.

८.१४ ची डोंबिवलीवरून सुटणारी जलद लोकल असते. ही लोकल डोंबिवलीला ७.५० किंवा ७.५५ पर्यंत येते. पण, इथेही नेहमीप्रमाणे चढायची मारामारी. जर तुम्हाला बसण्यासाठी जागा हवी असेल तर चालत्या लोकलमध्ये चढण्याशिवाय पर्याय नाही. या लोकलमधून जर कोणत्या महिलेनं मुंब्रा, दिव्यावरून डाउन केले तर मग तिला डोंबिवलीवरून चढलेल्या महिलांबरोबर वादाला सामोरं जावं लागतं. कारण जर एखाद्या महिलेनं डाउन केले असेल तर तिला ठाण्यापर्यंत उभं राहणं भाग असतं. पण, ती महिला आपला मुद्दा मांडण्यात सक्षम असेल तर मग ती या नियमांना लाथाडून त्या जागेवरची हलतच नाही. इतर महिला वाद घालून घालून काही वेळानंतर शांत बसतात. महिलांच्या डब्यात असे बरेच नियम आहेत. आता पुरुषांच्या डब्यातले काही अनुभवलेले नियम पाहू.

हेही वाचा – भौतिकशास्त्रात नापास, ५३९ कंपन्यांनी नाकारली इंटर्नशिप, ती एक संधी अन्… पाण्यावर उडणारी बोट बनवणारी भारतीय तरुणी

पुरुषांच्या डब्यात जर एखादा व्यक्ती सीएसएमटीपासून बसून आला तर त्यानं ठाण्याला उठून उभ्या असलेल्या व्यक्तीला स्वतःची जागा देणं. पुरुषांच्या डब्यात महिल्यांच्या डब्याप्रमाणे कुठे उतरणार असं विचारलं जात नाही. जी व्यक्ती दोन सीटच्यामध्ये येऊन पहिली उभी राहील, त्या व्यक्तीला पहिली रिकामी जागा मिळते. एवढेच नियम पुरुषांच्या डब्यातले आतापर्यंत माहीत पडले आहेत. याशिवाय फर्स्ट क्लास डब्यात ही वेगळे नियम असतात. पण, ‘हे ‘लोकल’ नियम कशासाठी? प्रशासनाने दिलेले नियम धाब्यावर बसवणं आणि हे ‘लोकल’ नियम काटेकोरपणे का पाळायचे? या नियमापायी विनाकारण सकाळी-सकाळी, त्यानंतर रात्री थकून का वाद घालायचे?, असे बरेच प्रश्न आता मनात घर करून बसले आहेत.

Story img Loader