-सिद्धी शिंदे

देवाने चेहरा समोर ठेवलाय आणि मेंदू मात्र लपवलाय… कुठल्या तरी कार्यक्रमात ऐकलेलं हे वाक्य सकाळपासून डोक्यातून जात नव्हतं. पण कामाच्या गडबडीत हा विचार करत बसायला वेळ नाही असं मी स्वतःला बजावलं आणि पुन्हा आपला मोर्चा कामाकडे वळवला. कसंय माझ्या लपवलेल्या मेंदूने जर नीट काम केलं नाही तर समोरचा चेहरा लपवायला जागाही मिळणार नाही. मग हा सगळा वैचारिक वाद नंतर करू म्हणत स्वतःला दिवसभर कामात गुंतवून ठेवलं. संध्याकाळी काम उरकून वेळेत ट्रेन पकडण्यासाठी पुन्हा वेगळी धावपळ सुरु झाली. स्टेशनला पोहोचताच आज सुदैवाने लगेच ट्रेन दिसली, बसायला जागा नव्हतीच पण परत थांबून राहावं लागणार नाही म्हणून मी सुखावले आणि ती गच्च भरलेली ट्रेन सुटण्याआधी पकडली आणि मग त्या गर्दीत पुन्हा एकदा मला दुपारी डोक्यात लपवून ठेवलेल्या त्या वाक्याची आठवण झाली.

Train fight video two females dispute in train shocking video went viral
कहरच! चालत्या ट्रेनमध्ये दोन महिलांनी अक्षरश: मर्यादा ओलांडली, साड्या फाटल्या तरी थांबल्या नाही; धक्कादायक VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Thieves , jewellery stolen, Sankranti ,
पुणे : संक्रातीच्या दिवशी चोरट्यांचा धुमाकूळ, महिलांकडील दागिने चोरीला
India Women Register 435 Highest ODI Total
India Women Highest ODI Total: भारतीय महिला संघाची वनडेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या, पुरूष संघालाही टाकलं मागे
Mumbai Local Train Shocking Video viral
मुंबई लोकलच्या लेडीज डब्यात नशेबाज तरुणाचा धिंगाणा, महिलांसमोर थुंकला अन् हातवारे करुन…; पाहा धक्कादायक VIDEO
Image of Laurene Powell Jobs Maha Kumbh 2025 preparations
Steve Jobs’ Wife : “यापूर्वी इतक्या गर्दीच्या ठिकाणी…” महाकुंभ मेळ्यात सहभागी झालेल्या स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नीला ऍलर्जी
Success story of kalpana saroj who got married at 12 now owning crores business
बाराव्या वर्षात लग्न अन् सासरच्यांचा छळ! पण हार न मानता २ रुपयांची कमाई करणाऱ्या ‘या’ महिलेने उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो

ट्रेनबद्दल मला आवडणारी गोष्ट म्हणजे, एखाद्याला एकटेपणा जाणवणार नाही इतकी गर्दी असते… आणि गर्दीतही प्रत्येकाला वेगळेपण जाणवेल इतकं वैविध्य! आमच्या लेडीजच्या डब्यातच किती वेगवेगळे चेहरे होते. कामावरून थकून येऊनही ट्रेनमध्ये मैत्रिणींच्या गप्पा ऐकताना खुलून आलेले, धावत ट्रेन पकडताना एखादीचे केस सुटलेले, काही जणी धापा टाकत आल्या होत्या पण तरीही प्रत्येकीच्या चेहऱ्याचं वैविध्य मला खुणावत होतं. मी नेहमीप्रमाणे इयरफोन घातले आणि फोन हातात घेतला एवढ्यात एका बातमीचं नोटिफिकेशन आलं, ‘जगातील टॉप १० सुंदर महिलांची यादी’ ! कुठल्यातरी एका विदेशी मासिकाने म्हणे वैज्ञानिक पद्धत वापरून सौंदर्याची टक्केवारी काढली होती.

तुमचा चेहरा किती परफेक्ट आहे हे सांगणारं विज्ञान वापरल्याचा दावा या मासिकाने केला होता. आजवर आईपासून ते शेजारच्या काकूंपर्यंत अनेकांनी सांगितलेले सौंदर्याचे निकष मी ही ऐकले होते, “कशा जजमेंटल आहेत या बायका” म्हणून मी त्यांच्या टोमण्यांकडे कानाडोळा केला. पण आता या वैज्ञानिक पद्धतीचं कुतुहूल वाटलं म्हणून मी ती यादी बघायचं ठरवलं. अगदी थोडक्यात सांगायचं तर जर तुमचा चेहरा एखाद्या साच्यातून काढल्याप्रमाणे असेल तर तुम्ही सर्वात सुंदर असा एक ‘छोटा’ विचार या यादीमागे होता. त्यानुसार जगातील १० महिला निवडल्या होत्या, ज्यात ९ व्या स्थानावर दीपिका पदुकोणचं नाव वाचून जरा बरं वाटलं. पण खरं सांगायचं तर एखाद्या साच्यातून काढावी अशीच ही यादी होती.

सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असतं असं मी ऐकलं होतं मग मुळात कोणाच्याही सौंदर्याचं प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी या मासिकाला कोणी दिली असावी हाच पहिला प्रश्न आहे. बरं त्यांनी या अत्यंत महत्त्वाच्या कामाचं ओझं उचललं पण मग ते पूर्ण करताना थोडी मेहनत घेतली असती तर आणखी बरं वाटलं असतं. मुळात यादीचं शीर्षक होतं ‘जगातील टॉप १० सुंदर महिला’, पण ही यादी तयार करणाऱ्या मंडळींच्या जगाचा आवाका हा अमेरिका व आजूबाजूचे चार पाच देश एवढाच असल्याचं यात दिसून येतंय. यात अर्थात त्यांची चूक नाही, कारण सौंदर्याला अवघ्या १० जणांच्या यादीत बांधू पाहणाऱ्या संकुचित मेंदूला जगाचा विस्तृत आवाका कसा कळणार? इतकी क्षमता त्यांना निसर्गाने दिलेलीच नसावी.

बरं चला त्यांनी मर्यादित जगातील महिला यादीत घेतल्या असतील पण त्या सगळ्या अभिनेत्रीच? कदाचित सामान्य महिलांचं सौंदर्य शोधायला जाण्याइतका वेळ तुमच्याकडे नसावा पण निदान जी क्षेत्र कॅमेरासमोर आहेत त्यात तरी थोडं तपासून पाहायचं होतं. क्रीडा, राजकारण, व्यवसाय या कुठल्याच क्षेत्रात एकही महिला टॉप १० मध्ये येण्याच्या पात्रतेची वाटली नसावी? अर्थात यात त्यांची चूक नाही कारण मेहनतीने घाम गाळून चेहऱ्यावर येणारा ग्लो, एखादं पदक जिंकल्यावर उजळणारा चेहरा, बंधनं झुगारून एखादं बिझनेस डील यशस्वी केल्यावर चेहऱ्यावर येणारी चमक, केवळ मेकअप हायलाईटरचा झगमगाट पाहणाऱ्यांना हे सौंदर्य समजलं नसावं. यात मेकअप करणाऱ्या महिलांना विरोध नाही पण मेकअप न करणाऱ्यांना हायलाईट केलं जात नाही याचं वाईट वाटतंय.

विचारांचा गोंधळ डोक्यात सुरु असताना अचानक एक गजरेवाली ट्रेनच्या डब्यात आली. तिच्या पाटीतल्या मोगरा, चाफ्याच्या घमघमाटाने डब्यात प्रसन्नता पसरली होती. माझ्या बाजूला बसलेल्या एका मुलीने तिच्या परडीतला गजरा उचलला, तिचे केस लहान होते त्यात काही केल्या तो गजरा टिकत नव्हता मग त्या गजरेवालीने तिला तो हेअरबॅन्डसारखा माळून दिला. इतक्यात त्या गजरेवालीच्या चेहऱ्यावर नजर पडली. सावळा रंग, भुरभुरणारे केस त्यात चाफ्याचं फुल, समुद्राइतके पाणीदार डोळे, आणि पाठीला एका ओढणीने बांधलेलं बाळ… त्या दोघींना बघून मी डब्यावर एकच नजर फिरवली, “जगातील सर्वात सुंदर महिला” माझ्या आजूबाजूला गप्पा मारत बसल्या होत्या!

Story img Loader