वैद्य हरीश पाटणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्वीच्या काळी भारतीय लोक चुलीतून तयार होणाऱ्या राखेने दात घासत असत. नंतर काही कंपन्यांचा भारतीय बाजारपेठेत प्रवेश झाला आणि राखेने, कोळशाने दात घासणे दातांच्या आरोग्याला किती घातक आहे असे ते पटवून देऊ लागले. त्यांनी कॅल्शियम असणाऱ्या पावडर व पेस्ट विकायला आणल्या. सर्वानी त्याचा वापर सुरू केला. हळूहळू लोकांचे दातांचे आरोग्य सुधारण्याऐवजी खराबच होत गेले. मग सतत काही तरी नवीन देण्याच्या प्रयत्नात त्यांनी ‘टूथपेस्ट में नमक है? निंबू है?’ अशी विचारणा करत हळूहळू पेस्टमध्ये मीठ, लिंबू, निंबपत्र अशा वेगवेगळ्या आयुर्वेदिकव पारंपरिक गोष्टींचाच समावेश करून आपले मार्केट कायम राखण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही लोकांचे दातांचे आरोग्य काही सुधारत नाही असे लक्षात आले.

एकाच घरामध्ये पारंपरिक पद्धतीने दात घासणाऱ्या आजोबांचे दात चांगले आहेत, तर गेली सलग २० वर्षे पेस्ट वापरणाऱ्या आधुनिक विचारांच्या मुलांचे दात खराब होऊ लागले आहेत. नातवांच्या दातांच्या आरोग्याबद्दल तर न बोलणेच चांगले, अशी परिस्थिती सध्या आली आहे. प्रत्येकाने रोज दोन दोन वेळा पेस्टने ब्रश करूनही लोकांमध्ये दातांचे आरोग्य खालावलेले आहे. असे का होत आहे याचा अभ्यास करून मग कंपनीने पुन्हा आपल्या पेस्टमध्ये थोडा बदल करत त्यात ‘चारकोल’ वापरून नवीन पेस्ट बाजारात आणली. हा चारकोल तुमच्या दातांमध्ये खोलवर लपून बसलेले किटाणू घालविण्यास सक्षम असून याने दातांचे आरोग्य वाढते असा दावा सुरू केला. मोफत मिळणारा कोळसा किंवा मीठ हजार रुपये किलो दराने आम्हालाच विकायला सुरुवात केली. जरा विचारपूर्वक या संपूर्ण घटनेकडे पाहा. हा चारकोल म्हणजेच कोळसा म्हणजेच राख. पण आतासुद्धा कोळशाने किंवा राखेने दात घासा म्हटलं तर कोणी घासणार नाही, मात्र चारकोलयुक्त पेस्टने घासा म्हटले की लगेच विश्वास ठेवून घासतील.

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: ‘उद्गार’ अर्थात ढेकर

पूर्वीच्या काळी दातांचे, हिरड्यांचे आरोग्य सुधारावे म्हणून दंतधावन केले जात होते. आजकाल फक्त मुलींनी आकर्षित व्हावे, मुखदुर्गंधी जावी व दात पांढरेशुभ्र स्वच्छ दिसावेत फक्त एवढ्यासाठीच दात घासले जातात. मग फेस येण्यासाठी व दात स्वच्छ होण्यासाठी त्यात सोडियम लॉरेल सल्फेट नावाचे रसायन मिसळले जाते.

आजकाल फेस आला नाही तर दात घासलेत असे लोकांना वाटतच नाही. मग याचे प्रमाण अधिक झाले की दातांची झीज सुरू होते. दात स्वच्छ दिसतात मात्र लवकर झिजतात. जसे कपडे जास्त स्वच्छ दिसण्यासाठी जास्त घासले, जास्त साबण लावून जास्त फेस केला की ते स्वच्छ होतात, दिसतात मात्र लवकर झिजतात तसेच. मग दाताच्या वरचा थर झिजून तुमचे दात संवेदनशील बनतात. मग या सेन्सिटिव्ह दातांसाठी नवीन पेस्ट. जास्त झिजले तर सिमेंट भरणे, रूट कॅनॉल करणे आलेच. मग या दुष्टचक्रातून बाहेर पडायचे असेल, आपल्या नव्या पिढीचे दात वाचवायचे असतील तर प्रत्येक आहारानंतर मुलांना प्रथम खळखळून, आवाज करून चूळ भरण्याची सवय लावा. जास्त वेळ पेस्टचा अतिरेक टाळा व किमान पेस्ट करून झाल्यानंतर मुलांना लिंबाच्या काडीने दात घासणे, हळद व मीठ सम प्रमाणात घेऊन त्याने दात घासणे किंवा अर्क, खदिर, करंज अशा वनस्पतींनी युक्त आयुर्वेदिक दंतमंजनाने दात घासायची सवय लावली पाहिजे.

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: त्रासदायक डोकेदुखी

ज्यांचे दात फार पिवळे होत आहेत त्यांनी मधाने दात घासले तरी स्वच्छ पांढरे होतात हा अनुभव आहे. हे सर्व घटक दातांमधील किटाणू मारून टाकतात व हिरड्यांना बळ देतात. कोणतीही राख, कोळसा हा सर्वोत्तम स्वच्छताकारक असतो. म्हणून पाणी स्वच्छ करण्यासाठीसुद्धा अनेक जलशुद्धीकरण केंद्रात याचाच वापर करतात. लक्षात ठेवा सर्वच जुन्या गोष्टी टाकाऊ नसतात आणि सर्वच नवीन जाहिराती आरोग्यदायक नसतात. आपल्या काही जुन्या परंपरांच्या पाठीमागील शास्त्र शिकून घेतल्यास आपल्या दातांना नक्कीच चांगले आरोग्य प्राप्त होईल.

harishpatankar@yahoo.co.in

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dental health and issues precautions asj
Show comments