काय गं विशाखा, तुमच्या लग्नाला आता तीन वर्ष झाली ना. आता मूल होऊ देण्याची वेळ आली बरं !” विशाखाची डॉक्टर आत्या हसत हसत विशाखाला म्हणाली.
“ हो गं आत्या, पण खरं सांगू का, मला ना काही गोष्टींची भीती वाटते गं. मला बालदमा होता. आणि नवऱ्याला कितीतरी वर्ष फिट्स येत असत. त्याच्या आई वडिलांना डायबेटिस आहे, ज्याचा त्यांना खूप त्रास आहे. शिवाय माझ्या माहेरूनही काही आजारांची ‘हिस्ट्री’ आहे. हे सगळं आनुवंशिकतेने आपल्या बाळात येईल की काय अशी भीती वाटते मला.”
“ अगं, अशी भीती बाळगायचं काहीच कारण नाही. विज्ञान इतकं प्रगत झालं आहे, की सगळ्या शारीरिक आजारांवर इलाज आहेत. आपण सुशिक्षित आहोत, जागरूक आहोत, आपण आधीपासूनच योग्य खबरदारी घेऊ शकतो?”
“ आत्या, असं काहीतरी असायला हवं होतं, ज्यामुळे होणाऱ्या बाळाच्या जीन्समध्ये डायबेटिसचे जीन्स काढून टाकले किंवा इतर आनुवंशिक आजार निर्माण करणारे जीन्स नष्ट केले. किती छान होईल नाही? मग जगात कुठलेही आजार शिल्लकच राहणार नाहीत.”
“ म्हणजे तू ‘डिझायनर बेबी’ बद्दल बोलत आहेस. ”
“ आत्या, डिझायनर बेबी? वाऊ! म्हणजे डोळे आणि उंची ह्रितिक रोशनसारखे, त्वचा ऐश्वर्या रायसारखी. असं?”
हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: त्रासदायक डोकेदुखी
“ अगदी तसं नाही, पण आजारपणाबद्दल तू म्हणतेस त्या पद्धतीचे प्रयोग सुरू आहेत बरं का. म्हणजे जन्मणाऱ्या बाळाची चाहूल लागली, की त्या भ्रूण अवस्थेतच त्याची ‘जेनेटिक डिसऑर्डर’ तपासता येते. त्यांच्या जनुकात बदल करून त्याचे संभाव्य विकार दूर करता येतात, असे सांगितले जाते. चीन आणि अमेरिकेत असे प्रयोग झाले आहेत. ‘क्रायस्पर कॅस नाईन’ (CRISPR-Cas9 ) हे एक जिनोम (genome) बदलाचं प्रभावी साधन आहे. त्या द्वारे बाळाच्या भ्रूण अवस्थेतच त्यामध्ये जेनेटिक बदल करता येतात.”
“ मग मला तसं करता येईल का?”
“ इतकं सरळ सोपं नाही गं ते. डिझायनर बाळ तयार करणं हे किती नैतिक आणि किती अनैतिक यावर जगात अनेक वाद आणि शंका आहेत. मानवी जिनोमशी खेळताना भ्रृणात काही नवीन विकृती उद्भवण्याची शक्यता आहे. त्याचे दूरगामी वाईट परिणामही होऊ शकतात. आपल्याकडे अशा तंत्रज्ञानाला परवानगी नाहीये. नाहीतर उद्या प्रत्येक भावी जोडप्यांना आपली अपत्य ह्रितिक रोशन किंवा ऐश्वर्या राय सारखीच हवी असतील.”
“ आत्या, ती माझी मैत्रीण आहे ना सायली, तिला फार वाटतं, की तिचा मुलगा निरज चोप्रा सारखा व्हावा, असं वाटणं ठीक आहे, पण त्यासाठी किती प्रचंड मेहनत लागते, शिवाय ते रक्तात असावं लागतं. माझ्या ऑफिसमधील तो राजन आहे ना, तो तर नेहमी म्हणत असतो की त्याच्या आजोबांना हिमोफिलियाचा त्रास होता, तो त्याच्या मुलात नको यायला. डिझायनर बेबीच्या तंत्रज्ञानाने हे शक्य होईल का?”
हेही वाचा… समुपदेशन: नोकरी – कटू आठवणी किती दिवस सांभाळणार?
“ आजतरी ते मी नक्की नाही सांगू शकत, पण भविष्यात होईलही कदाचित.”
“ मी ना, अजून काही वर्षं उशिरा जन्मायला हवी होते. म्हणजे हे डिझायनर बेबी तयार करणारं तंत्रज्ञान पुर्णपणे विकसित झालेलं असतं आणि त्याला साऱ्या जगाने मान्यता दिलेली असती. माझं होणारं मूल मी असं काही डिझाईन केलं असतं ना, की त्याने किंवा तिने सगळी ऑलिंपिक पदकं जिंकावी इतकी निपुणता मी त्यांच्यात आणली असती. ”
“ ए वेडाबाई. असा विचार तर सगळेच पालक करतील ना. जर तुझं मूल तितकं निपुण निपजू शकतं तर बाकीची मुलं का नाहीत? तितकंच कौशल्य इतरही सगळ्या मुलांमध्ये येईलच की ! ”
“ अरे हो की ! हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. एका वर्गात सगळेच पाहिले कसे असतील नाही का? पण आत्या, हे डिझायनर बेबी बनवण्याची कल्पना आणि त्या तंत्रज्ञानासाठी झटणाऱ्या वैज्ञानिकांना मनापासून सलाम बरं का !”
adaparnadeshpande@gmail.com