२०१८ च्या मेमध्ये माझ्या बायकोला- माधुरीला स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान झाले. तेव्हापासून १६ ऑगस्ट २०२२ पर्यंत ती कर्करोगाशी धीटपणे झुंज देत होती. माधुरीला जाऊन आता ३ वर्षें होतील. तिच्या मरणानंतर मी तिच्या डायऱ्या चाळत असताना जसा मला तिच्या मनाच्या एका वेगळ्याच पैलूचा थांग लागत गेला, तसाच एक वेगळा पैलू तिचे गुगल ड्राईव्ह चाळताना मला पुन्हा एकदा जाणवले. कर्करोगग्रस्त असतानाही ती रोजनीशी लिहायची. त्यामुळे तिला खूप मोकळं मोकळं वाटायचं. ही तिची खाजगी बाब असल्यामुळे मी तिला तिची स्पेस देण्यासाठी कधीही त्या डायऱ्या वाचण्यास मागितल्या नाहीत. तिच्या मृत्यूनंतरच त्या डायऱ्या मी उघडून पाहिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१८ मार्च आमच्या लग्नाचा वाढदिवस असतो. २०२२ च्या १८ मार्चच्या रोजनिशीमध्ये लिहिलेले माधुरीचे हे मनोगत मला तिच्या मोबाईलच्या गुगल ड्राईव्हवर सापडले. वाचून आठवणीचा कल्लोळ उडाला. माधुरी मरणाच्या दारात उभी असतानासुद्धा एवढ्या तटस्थपणे कशी काय लिहू शकली, याचे मला आश्चर्य वाटत राहिले. असे लिहिण्यासाठी माणसाचे मन नुसते खंबीर असून चालत नाही तर ते विवेकीही असावे लागते.

तिच्या या मनोगतात तिने तिला झालेल्या कर्करोगाचा परामर्ष घेतघेत स्वतःबद्दलचाही चिकित्सक वेध घेतला आहे. तो तिच्याच शब्दात असा…

‘‘माझ्या पोटात अचानक दुखू लागले म्हणून माझ्या मधुमेहावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मला काही चाचण्या करून आणायला सांगितल्या होत्या. त्या पाहून त्यांना काय शंका आली न कळे, त्यांनी आणखीन काही वेगळ्या चाचण्या करायला सांगितल्या. त्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा सांगितले की, मला स्वादूपिंडाचा कर्करोग झालेला आहे, त्या क्षणी मला धक्का बसणे स्वाभाविकच होते. डॉक्टरांनी केलेल्या निदानामुळे माझ्या डोळ्यात अश्रू आले… पण ते शेवटचेच. तरीही ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा’ अशी माझी त्यावेळी अवस्था झाली होती. पण तो क्षण सरल्यानंतर मी शांतपणे विचार केला आणि कर्करोग हा कोणालाही होऊ शकतो आणि मधुमेही लोकांना तर स्वादूपिंडाचा कर्करोग होण्याची शक्यता असते, हे वैज्ञानिक सत्य मी मनोमन स्वीकारले. मग ‘मलाच हा रोग का झाला?’ असा निराशावादी प्रश्न स्वतःला विचारून मी स्वतःला दुःखी करून घेतले नाही.

मी सुरुवातीलाच ठरवलं होतं की, आपल्या आजाराबद्दल आपण जास्त कुणाला काही सांगायचं नाही. कारण लोकांच्या डोळ्यामधील माझ्याविषयीची बिचारेपण दाखवणारी सहानुभूती मला नको होती. मला त्यांच्यासमोर केविलवाणे होणे पसंत नव्हते. शेवटी आजाराशी मला एकटीलाच लढायचे होते, तर हा त्रास मी बाकीच्यांना का द्यावा? म्हणून कर्करोग झाल्याचे कळल्यावर परिवारात मी एकदाही माझ्या आजारपणाबद्दल चर्चा केली नाही. जोपर्यंत मी हालचाल करू शकत होते तोपर्यंत कधीही अंथरुणावर पडून राहिले नाही, हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी सकारात्मक विचाराने जाऊ लागले. तसेच माझी सर्व कामे मी नियमितपणे करत आहे.

तरीसुद्धा काही आप्तांनी खोचकपणे विचारलंच, ‘‘तुम्ही एवढ्या अहारतज्ज्ञ असूनसुद्धा तुम्हाला कॅन्सर कसा झाला?’ त्यांच्या या अज्ञानी प्रश्नाला मी फक्त हसून उत्तर देत असे. तर काही आप्तांनी सांगितले की, ‘तुम्ही देवाधर्माचे काही करत नाही ना, म्हणून देवाने तुम्हाला शिक्षा दिली. आतातरी कुळाचार पाळा.’ त्यावर मी त्यांना एवढेच म्हणत असे की, ‘तुम्हीच म्हणताना की देव हा दयाळू आहे, करुणेचा सागर आहे. मग त्याला भजले नाही म्हणून तो रागावून का शिक्षा देईल? आणि देवाला माणसासारखे रागलोभ असतील तर मग तो देव कसला… तो तर माणूसच.’ असो.

पण खरं सांगू, या कर्करोगामुळे मी खऱ्या अर्थाने जगण्यास शिकले. मी कृतज्ञ राहण्यास शिकले. खोचक प्रश्न विचारणाऱ्या माझ्या आप्तानाही माफ करायला शिकले. म्हणूनच मी हा कर्करोगाचा प्रवास आनंदाने करू शकतेय. मी ज्या हॉस्पिटलमध्ये जातेय तेथील डॉक्टर, तिथे काम करणारी माणसे, एवढेच काय, पण मला देण्यात येणारी औषधेही आपल्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन येतात, असे मला वाटत असते. म्हणून हॉस्पिटल माझ्यासाठी एक जिगीविषा जागवण्याचे प्रतिक आहे.

माझ्या या साऱ्या दुःखद प्रवासात खरी कसोटी लागतेय ती जगदीशची. पण तो रॅशनल विचारांचा… विवेकी विचाराचा असल्यामुळे त्याने न डगमगता खंबीरपणे परिस्थितीला हाताळले आणि अजूनही हाताळतो आहे. आता मी पलंगावरून उठूही शकत नाहीय. तेव्हाही तो न कुरकुरता प्रेमाने माझे सर्व काही करत आहे- अगदी माझी शी-शू सुद्धा निगुतीने काढून माझ्या स्वच्छतेकडे लक्ष पुरवत आहे. त्याला जरासुद्धा या गोष्टीची किळत वाटत नाहीये. उलट हे सगळे करत असताना त्याच्या डोळ्यातून निखळ आणि नितळ प्रेमच बरसत असताना दिसतेय. ते पाहून मी मात्र अचंबित होतेय. त्याचवेळी मी स्वतःलाच प्रश्न विचारते की, जर हीच वेळ… अशीच सेवा मला जगदीशसाठी करायला लागली असती तर मी करू शकले असते का? मला किळस आली नसती का? प्रामाणिकपणे सांगते, मला ते शक्य झाले नसते. त्यानेच मला निर्लेप मनाने निरपेक्ष प्रेम कसे करावे हे शिकवले.

या कर्करोगाने मला हेही शिकवले की, अडचणी आल्या तर त्या संधी म्हणून स्वीकारायला हव्यात. अंत्यत कठीण परिस्थितीत तुम्ही स्वतःच स्वतःचे चांगले मित्र असता. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, हा महत्त्वाचा धडा मला कर्करोगाने दिलाय. आयुष्यभर लोकांच्या दृष्टिकोनातून आपण कसे दिसतो या नजरेने स्वतःकडे पाहात असतो. त्यामुळे अनेकदा आपण नको ते मुखवटे घालून जगत असतो आणि स्वतःचे आयुष्य मात्र जगायचे विसरून जातो. पण या रोगामुळे माझ्या आयुष्यात बऱ्याच नकारात्मक गोष्टी घडत असतानादेखील मी सकारत्मकतेने जगायला शिकले. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केला. माझ्यावर ओढवलेली परिस्थिती तर मी बदलू शकत नाही; पण आलेल्या या प्रसंगाला हसत हसत सामोरे जाणे माझ्या हातात आहे ना! आणि मी तेच करतेय. कारण कर्करोग फक्त शरीराला होतो, तो तुमच्या मनाला कधीच होऊ शकत नाही.

माझ्या कर्करोगाच्या या प्रवासातून मी अजून एक तत्व शिकले की, आयुष्य हे अनाकलनीय आहे. कधी काय होईल सांगता येणार नाही. काही गोष्टी आपल्या हातात आहेत, तर काही गोष्टी आपल्या हातात नसतात. पण आनंदी राहणं, भरभरून जगणं तर आपल्याच हातात आहे ना! ते का सोडा? आयुष्यामध्ये आलेला प्रत्येक क्षण मग तो दुःखाचा असो किंवा सुखाचा; त्याचाही एक ठराविक कालावधी असतो. माणूस जन्माला येताना एकटा येतो, मरतानाही एकटाच असतो. पण या दोन्ही टोकांमध्ये त्याच्या आजूबाजूला त्याच्या जिवाभावाची माणसे लाख मोलाची असतात. मग लहानसहान घडणाऱ्या अप्रिय घटनांमुळे आपण त्यांना आपल्या क्षुल्लक अहंकारापोटी दूर का लोटतो? म्हणून आनंदी जगा, हसत जगा. आपले दुःख उगाळत न बसता लोकांनाही आनंदी जगायला शिकवा. कारण आयुष्याचा हा चलचित्रपट एकदा संपला की त्याचे पुनःप्रक्षेपण होणे नाही. तुमच्या वेदनेत, संघर्षात, आनंदातच जीवनाचे सौदर्य दडले आहे.

jetjagdish@gmail.com