अलीकडची किमान ४ ते ५ वर्षे मी रूपेरी पडद्यापासून तशी दूर आहे . पण खासदार म्हणून माझं कार्यक्षेत्र असलेल्या मथुरा शहरात तेथील जनतेची कामं,त्यांच्या समस्यांच्या निवारणासाठी माझा खूपसा वेळ जातोय पण मी हे काम मनापासून करतेय जनतेच्या तक्रारी निवारण करणे याचा मला खरोखरीच आनंद आहे. उद्या म्हणजे १९ मार्च ला मुंबईच्या एनसीपीए थिएटरमध्ये ‘गंगा ‘हा बॅले मी सादर करणार आहे .सध्या या बॅलेच्या सरावात मी खूप व्यग्र आहे. गंगा नदीचे शुद्धीकरण आणि पर्यायाने राज्यातील ७५ नद्यांच्या शुद्धीकरणाची मोहीम राज्य शासनाने हाती घेतली आहे.
आणखी वाचा : विवाह समुपदेशन : लग्नाचाही प्रोबेशन पीरियड असतो?
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली अनेक वर्षे गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी प्रयत्नशील आहेत. आता ही जबाबदारी त्यांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवारांकडे सोपवली आहे. मुनगुंटीवार यांनी महाराष्ट्रातील नद्यांच्या शुद्धीकरणाची मोहीम आणि त्या निमित्याने जनजागृतीबद्दल माझ्याशी संपर्क साधत एक शो करण्याचे मला सुचवले तेव्हा मी त्यांना ‘गंगा ‘या नृत्यनाटिकेविषयी सांगितलं. मीरा ,दुर्गा ,द्रौपदी अशा इतिहासातील, पुराणातील गाजलेल्या थोर स्त्रियांविषयी मी करत असलेल्या बॅले डान्स शो विषयी सांगितले आणि मग त्यांनी ही कल्पना उचलून धरली आणि ‘गंगा ‘या डान्स बॅलेला मूर्त कल्पना मिळाली. तोच ‘गंगा ‘हा बॅले मी उद्या (१९मार्च ) रोजी माझ्या सहकाऱ्यांसोबत एनसीपीए येथे सादर करणार आहे .फॅशन डिझायनर नीता लुल्ला यांनी गंगा बॅलेसाठी माझे आणि सगळ्या नर्तकांचे पोशाख डिझाईन केले आहेत. भूषण लाखनदारी यांचे नृत्य दिग्दर्शन, दिवंगत रवींद्र जैन यांच्या समूहाचे संगीत, शंकर महादेवन -सुरेश वाडकर यांनी गायलेली गीतं असा मोठे सेटअप आहे.
आणखी वाचा : गच्चीवरची बाग : बाग कोणासाठी आणि कशी?
गंगा असो किंवा यापूर्वी सादर केलेल्या सगळ्याच बॅलेमध्ये मी सशक्त स्त्री व्यक्तिरेखा साकारल्या. या सगळ्याच स्त्रियांची दुःखं, त्यांची अगतिकता, त्यांची सहनशीलता,संयम,समर्पण, निष्ठा, प्रेम अशा सगळ्याच भावभावनांचा कल्लोळ बॅलेमधून दाखवणं हा माझ्यासाठी मोठाच भावनिक प्रवास असतो. अशा शोमधून मला भावना अनावर होतात, अतिशय कसून डान्स बॅलेची प्रॅक्टिस करावी लागते. गेली ६७ वर्षे मी नृत्य सादर करते आहे,नृत्य हाच माझा श्वास आहे.
आणखी वाचा : आहारवेद बदाम : अन्न आणि औषधदेखील
दक्षिणी सिनेमांमधून माझ्या अभिनयाला सुरुवात झाली, नंतर मी हिंदी सिनेमात आले. या प्रवासाला ६० वर्षे होऊन गेलीत. माझ्या हिंदी सिनेमांच्या कारकिर्दीवर मी अगदी संतुष्ट आहे, डबल रोल, ग्लॅमरस भूमिका, कणखर स्त्री,सोशिक स्त्री अनेक बहूपेडी भूमिका माझ्या वाटेला येत होत्या पण मला माझ्या नृत्य कौश्यल्याला वाव मिळेल अशा भूमिकेची प्रतिक्षा होती, ती प्रतिक्षाच राहिली! कारकिर्दीच्या एका टप्प्यावर मग मी ‘नुपूर ‘ही मालिका केली त्यात मी माझी नृत्याची हौस पुरवून दुधाची तहान ताकावर भागवली!
नृत्य आणि मी कधी वेगळा विचार होऊ शकत नाही. गेली ६५ वर्षांपेक्षा अधिक काळ मी दैनंदिन नृत्य करत असते. अम्माने (आई -जया चक्रवर्ती ) मला भरतनाट्यम शिकवायचे ठरवले आणि आमच्या घरी गुरुजी येऊ लागले तेव्हा नृत्य करणे हे मला अगदी नकोसे वाटे. पण अम्माने तेव्हा जिद्द ठेवली नसती तर आजची मी घडले नसते! असो, तर वयाच्या सातव्या वर्षांपासून मी नृत्य शिकत आलेय. गेली अनेक वर्षे देश विदेशांत खूप डान्स शोज केलेत. माझं बॅले सादरीकरण म्हणजे भारतीय संस्कृतीशी नाळ जोडत थीम वर /स्त्री व्यक्तिरेखेवर आधारित असा भव्य दिव्य शो मी सादर करते. ‘गंगा ‘नदीला आपण भारतीय देव मानतो ,तिच्यात देवी -माँ आहे, अशी श्रद्धा असणारे आपण गंगेची काळजी घेत नाही. गंगेच्या पवित्र पाण्यात सांडपाणी सोडून आपण ते अस्वच्छ प्रदूषित पाणी केलं आहे .गम्मत अशी की परदेशांमध्ये तेथील नागरिक त्यांच्या नद्यांना देव मानत नाहीत, पण सुजाण नागरिकाचे कर्त्यव्य निभावत आपल्या नद्यांची काळजी घेतात, त्यात सांडपाणी नसते! आपल्या भारतीयांचा हा निष्काळजीपणा दूर व्हावा, किमान पुढील पिढ्यांसाठी प्रदूषण विरहित पर्यावरण आणि शुद्ध पाणी असलेले पाणी नद्यांतून मिळावे हाच माझ्या डान्स बॅलेचा मुख्य हेतू आहे. थ्रीडी तंत्राने स्टेजवर गंगा अवतरते हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
सिनेमाचे हे युग रिमेकचे आहे. माझ्या जुन्या गाजलेल्या सिनेमांचा रिमेक झाला तर माझी हरकत नाही. दुसरी बाब – रिमेक झाला तरी माझ्या भूमिका करण्यासाठी दीपिका पदुकोण, आलिया भटसारख्या समर्थ अभिनेत्री आहेत. सध्याच्या काळात प्रत्येक विवाहित अभिनेत्री विवाहानंतर /मातृत्वानंतरही अभिनय सहज करतेय. पण या बाबत मात्र मीच पायोनियर मानेन स्वतःला! माझ्या विवाहानंतर किंवा ऐशा आणि आहना दोन्ही लेकीच्या जन्मांनंतरही माझ्या अभिनयाला कधी अल्पविराम लागला नाही ! माझ्या मुलींचे पालनपोषण, माझे नृत्याचे कार्यक्रम, अभिनय, अम्माची देखभाल,अभिनय, आऊट डोअर शूटिंग्ज, पुढे निर्मिती दिग्दर्शन, नंतर राजकारणात सक्रिय सहभाग माझ्या जीवनातील एक मोठे वर्तुळ पूर्ण झाले अशी माझी भावना आहे .
माझ्यातील नृत्याची आवड माझ्या मुली आणि आता तिसऱ्या पिढीत माझ्या नातवंडांमध्येही उतरली आहे हे पाहून समाधान वाटते. धरमजी हल्ली उत्तम संहिता असलेल्या सिनेमांचे शूटिंग करण्यात व्यग्र आहेत, ते सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत हे पाहून मला बरं वाटतं. वन्स अ ऍक्टर ऑल्वेज अॅन ऍक्टर अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे धरमजी त्यांना आवडणाऱ्या अभिनयात पुन्हा छान रमलेत.
मी खासदार म्हणून जनतेची सेवा करत आलेय, पुढेही करेन. जीवनातल्या खऱ्या खुऱ्या सगळ्या भूमिका मी मनःपूर्वक निभावल्यात,मुलगी, पत्नी, आई, अभिनेत्री, आजी, राजकीय व्यक्ती (खासदार ), नृत्यांगना या सगळ्या भूमिका ऑफ स्क्रीन कुशलनेने निभावू शकले याचं श्रेय परमेश्वराला देईन मी!