डॉ. उल्का नातू-गडम
योगासनांचा सराव करत असताना आसनांच्या अंतिम स्थितीत मनाची स्थिरता, भावनांची शांतता व शरीराची क्षमता वाढली पाहिजे. म्हणूनच आसनांचा सराव नीट होण्यासाठी प्रथम यम नियमांचे पालन हे जणू महाव्रतांप्रमाणे झाले पाहिजे, असे मुनी पतंजली म्हणतात. प्रथम परमहंस स्वामी निरंजनानंद सरस्वती काय म्हणता ते पाहू.
देहेन्द्रिषु वैराग्यम् यम इत्युच्यते बुध्ये।।
म्हणजेच देह व इन्द्रियांना वैराग्य प्राप्त होणे हे साधना नीट होण्यासाठी आवश्यक आहे. वैराग्याचा अर्थ विरक्ती नव्हे. परंतु जरुरीपेक्षा आवश्यक देहभाव व इन्द्रियांचे चोचले पुरवणे हे घातक आहे. यामुळे सामाजिक अस्थिरता, असुरक्षितता व राक्षसी वृत्ती किती वाढते हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. निरंतर साधनेने मनात सुस्थिर भाव येण्यास मदत होते. वृत्तींमध्ये बदल होतो.
आणखी वाचा – योगमार्ग : तीर्यक पर्वतासन
आज आपण उत्थित एकपादासनाचा सराव करूया
हे करण्यासाठी प्रथम शवासनात (शयन स्थितीतील विश्रांती अवस्था) स्थिर व्हा. सावकाश दोन्ही पाय एकमेकांना समांतर, जोडलेले ठेवा. दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवा. आता दोन्ही हातांचा (तळव्यांचा) जमिनीला घट्ट आधार घेऊन उजवा पाय जमिनीपासून सावकाश वर उचला. पाय गुडघ्यात दुमडू नका. पाय ९० अंशांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीत डोळे मिटून लक्ष श्वासावर एकाग्र करा. अंतिम स्थितीत चार ते पाच श्वास थांबून सावकाश पाय खाली आणा. आता विरुद्ध पायाने हीच कृती पुन्हा करा.
हर्निया अथवा हृदयविकार, गर्भारपण असल्यास सांभाळून करा. अशावेळी जो पाय वर उचलणार त्याच्या विरुद्ध बाजूचा पाय गुडघ्यात दुमडून टाच दुसऱ्या बाजूच्या गुडघ्याजवळ ठेवा व नंतरच पाय ९० अंशांपर्यंत उचला. हे केल्याने पोटावर दाब येणार नाही. पायांतील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी, ओटीपोटातील रक्तसंचय दूर करण्यासाठी हे आसन खूप उपयुक्त आहे.
ulka.natu@gmail.com