Menstrual Hygiene Day 2024 : आज जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन. २०१४ पासून हा दिन साजरा केला जातो. म्हणजे, यंदा मासिक पाळी स्वच्छतेच्या जनजागृतीला बरोबर १० वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या १० वर्षांत मासिक पाळीविषयी असलेल्या अनेक सामाजिक आणि धार्मिक रुढींविरोधात जनजागृती करण्यात आली. या दिवसांत सामाजिक आणि धार्मिक रुढी पाळण्यापेक्षा स्वच्छता पाळण्यावर महिलांनी भर द्यावा, असंही सुचवण्यात आलं. परंतु, आजही मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आदी शहरी भागातील वस्त्यांमध्ये स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष दिलं जात नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
एकीकडे अपुरी स्वच्छता, सॅनिटरी नॅपकिन्सच्या अपुऱ्या विल्हेवाटीची यंत्रणा आणि दुसरीकडे सामाजिक चालीरीतींशी झुंजणाऱ्या किशोरवयीन मुलींना मुंबईच्या वस्त्यांमध्ये अनेक समस्या भेडसावतात. या समस्यांकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. त्यानिमित्ताने ‘वाचा’ संस्थेने एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. त्यामुळे शहरी भागातील मासिक पाळीत महिलांची होणारी कुचंबना ही ग्रामीण भागातील महिलांपेक्षा वेगळी नसल्याचं सिद्ध झालंय. ‘मुंबई आणि ठाणे विभागातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या किशोरवयीन मुलींच्या मासिक पाळीच्या आरोग्याचा आणि स्वच्छतेचा अभ्यास’ या अहवालातून मुंबई आणि आजूबाजूच्या वस्त्यांमधील मासिक पाळीच्या काळातील आरोग्याबाबतचे भीषण वास्तव समोर आले आहे. इन्क्लुजिव्ह होरिजनच्या संस्थापिका डॉ. संगीता देसाई यांनी हे सर्वेक्षण केलं असून वाचा चॅरिटेबल ट्रस्टने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या सर्वेक्षणात १२ ते १९ वयोगटातील २७२ मुली सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा >> “…वाढदिवस साजरा केला जातो मग मासिक पाळी का नाही?” काय आहे ‘मासिका महोत्सव’ जाणून घ्या
४३ टक्के मुली मासिक पाळीविषयी अनभिज्ञ
वयाच्या १२ व्या वर्षांनंतर प्रत्येक मुलीला मासिक पाळी येते. मासिक पाळीविषयी सर्वसाधारण जनजागृती करणे, मुलींना त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलांविषयी माहिती देणे, हे पालक आणि शाळेचं कर्तव्य असतं. पंरतु, तरीही अनेक शाळकरी मुली यापासून अनभिज्ञ असतात. वाचा संस्थेने प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणानुसार, फक्त ५७ टक्के मुलींनाच त्यांच्या पहिल्या मासिक पाळीच्या आधीच याविषयीची माहिती होती. म्हणजे ४३ टक्के मुली मासिक पाळीविषयी अज्ञानी होत्या. मासिक पाळी आणि या काळातील स्वच्छतेकरता शाळांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांना जवळपास ७० टक्के मुलींनी हजेरी लावली आहे. तर, ७८ मुलींनी त्यांच्या पहिल्या मासिक पाळीविषयी नकारात्मक भावना अनुभवली. सामजिक स्थितीतील ही परिस्थिती पाहता वाचा संस्थेकडून मुलींच्या पालकांसाठी जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
मोफत मिळणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
यानंतर सर्वांत महत्त्वाचा भाग येतो तो स्वच्छतेचा. पूर्वी मासिक पाळीच्या काळात कपडे वापरले जायचे. परंतु, कालांतराने मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि सॅनिटरी नॅपकिन्सची जाहिरात झाल्याने आता सॅनिटरी नॅपकिन्स मोठ्या प्रमाणात वापरले जातात. मुंबई आणि आजूबाजूच्या शहरी भागातील ७२ टक्के शाळकरी मुलींना शाळेतून सॅनिटरी नॅपकिन्स मिळतात. हे नॅपकिन्स मोफत किंवा खरेदी केलेले असतात. शाळा स्तरांवर सॅनिटरी नॅपकिन्स प्रत्येकी पाच रुपये दराने दिले जातात. परंतु, महाविद्यालयीन विद्यार्थींनीसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन्सची सुविधा अद्यापही करण्यात आलेली नाही. ज्या शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स मोफत दिले जातात, त्या पॅड्सच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तर, सर्वेक्षण केलेल्या मुलींपैकी फक्त ३२ टक्के मुलींच्या शैक्षणिक संस्थांमध्ये सॅनिटरी वेंडिंग मशिन्स आहेत. त्यापैकी ३० टक्के मुलीच या वेंडिंग मशिन्स वापरू शकतात, असंही या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. ही बाब झाली शैक्षणिक संस्थांमधील. पण सार्वजनिक ठिकाणीही मासिक पाळीच्या स्वच्छतेबाबत उदासिनता दिसून येते.
घरातच बदलले जातात सॅनिटरी नॅपकिन्स
सर्वेक्षणातील ६० टक्के मुलींच्या घरात शौचालय नाहीत. तर, ६१ टक्के मुली आजही घरात सॅनिटरी नॅपकिन्स बदलतात. सार्वजनिक शौचालयात पुरेशा पाण्याची व्यवस्था नसल्याची तक्रार ४४ टक्के मुलींनी केली. त्यामुळे या मुली घरातच सॅनिटरी नॅपकिन्स बदलतात. ६७ टक्के मुलींनी सार्वजनिक शौचालयात कचऱ्याचा डबा नसल्याचंही सांगितलं. त्यामुळे सार्वजनिक शौचालयात सॅनटरी नॅपकिन्स उघड्यावरच फेकले जातात. परिणामी दुर्गंधी आणि आजार पसरतात. घरात कोणी नसतं तेव्हा ९० टक्के मुली सॅनिटरी नॅपकिन्स बदलतात. तर, ६ टक्के मुली घरातील पुरुषांना बाहेर जाण्यास सांगून सॅनिटरी नॅपकिन्स बदलून घेतात. तर, ५१ टक्के मुली शाळा किंवा कॉलेजमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स बदलत नसल्याचंही या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
हेही वाचा >> Menstrual Hygiene Day 2024 : सॅनिटरी पॅड्सच्या जाहिरातीत कशाला हव्यात उड्या मारणाऱ्या मुली?
शहरी भागातही मासिक पाळी धार्मिक शिष्टाचारात अडकली
ग्रामीण भागात मासिक पाळीविषयी अनेक गैरसमजुती आजही पोसल्या जातात. हीच परिस्थिती शहरी भागातील वस्त्यांमध्येही आढळून येते. मासिक पाळी आजही धार्मिक शिष्टाचारात अडकलेली आहे. कारण, २७ टक्के मुलींना आजही वाटतं की मासिक पाळीतील रक्त अपवित्र असतं. तर, ६७ टक्के मुली आजही विश्वास ठेवतात की मासिक पाळीच्या काळात लोणच्याच्या बरणीलाही हात लावू नये. तर, ४६ टक्के मुली या दिवसांत मंदिरात किंवा इतर कोणत्याही धार्मिक ठिकाण जाणं टाळतात.
१३ टक्के मुलींना आजही मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक घरात परवानगी दिली जात नाही. तर, १० टक्के मुली या दिवसात बाजारहाटही करत नाहीत. १५ टक्के मुली सॅनिटरी नॅपकिन्स विकत घेण्यासाठी संकोचतात, असंही या सर्वेक्षणातून सिद्ध झालं आहे.
मासिक पाळीमुळे शाळेला दांडी
८९ टक्के मुलींना मासिक पाळीच्या काळात शारीरिक दुखणी होतात. तर, २७ टक्के मुली मासिक पाळीत शाळेत जाणंच टाळतात. मासिक पाळीचं दुखणं नैसर्गिक असतं अशा समजुतीतून अनेकजणी या दुखणीसाठी वैद्यकीय उपचारही घेत नाहीत.
मासिक पाळीविषयी अनेक धार्मिक समजुती असल्याने याविषयात खुलेपणाने बोलणं टाळलं जातं. धार्मिक शिष्टाचारांमुळे मुलींची कुचंबना होते. सोशल क्रांतीमुळे हल्ली मुली याविषयावर मुक्तपणे बोलत असल्या तरीही त्यांच्या समस्या अद्यापही संपलेल्या नाहीत. या समस्या सोडवण्याकरता सामाजिक, राजकीय, शैक्षणिक स्तरावर प्रयत्न करणं गरजेचं आहे. हे प्रयत्न एकत्रितरित्या झाले तरच शहरी आणि ग्रामीण भागातील मुलींची आणि महिलांची कुचंबना थांबू शकेल.