सावनी रंगाने सावळी आणि सामान्य मुलगी. लहानपणीच तिला सावळेपणामुळे ‘जज’ केलं जात असल्याचं तिच्या लक्षात आलं होतं. लहानपणी जेव्हा तिला सर्व जण काळी-सावळी म्हणायचे, तेव्हा तिला फार वाईट वाटत असे. आईकडे जाऊन ती रडायची. आई तिला समजवायची, तिच्यासाठी इतरांना ओरडायची आणि नंतर ती सर्व काही विसरून जायची. सावळी असली तरी आईचं माझ्यावर प्रेम आहे या जाणिवेनं ती आनंदी व्हायची. पण, कुठेतरी तिच्या मनात रंगामुळे न्यूनगंड तयार झाला आणि तिनं आत्मविश्वास गमावला होता; पण ती सावरली, हळूहळू तिला इतरांच्या चिडवण्यानं फरकही पडेनासा झाला एव्हाना सावनीला समज आली होती की, कोणत्याही व्यक्तीचा रंग हा त्याचा कमीपणा असू शकत नाही. रंगावरून एखाद्या व्यक्तीची योग्यता ठरवण्याची समाजाची मानसिकता चुकीची आहे हे तिला कळून चुकलं होतं. पण, हे माहीत असूनही आपल्याला कोणी स्वीकारणार नाही ही भीती तिच्या मनावर कोरली गेली होती आणि आयुष्यात पदोपदी तिनं ती अनुभवलीदेखील होती.
सावनी स्वत:ला समजावत असे की, व्यक्तीचं मन चांगलं पाहिजे, स्वभाव चांगला पाहिजे. रंगामुळे कोणाचं काही अडत नाही. सावनीनं हळूहळू स्वत:वर विश्वास ठेवला आणि आयुष्यात प्रगती केली. ज्या ज्या गोष्टींची तिला भीती वाटत असे, त्या त्या सर्व गोष्टी तिनं केल्या. स्वत:ला त्या बंदिस्त वर्तुळातून बाहेर काढलं. सावनीनं स्वत:ला जसं आहे, तसं स्वीकारलं; पण समाजात कित्येक ठिकाणी तिला नकार मिळत होता. आपला स्वभाव कितीही बदलला तरी लोकांचा स्वभाव आपल्याला बदलता येत नाही. लोक पहिल्यांदा रंगच पाहतात. तुम्ही कितीही हुशार असा वा नसा, तुम्ही कितीही चांगल्या पदावर काम करीत असाल किंवा नसाल. तुम्ही कितीही चांगले असा किंवा नसा… लोक फक्त रंगच पाहतात. सावनीला एरवी या गोष्टींचा फरक पडत नव्हता; पण आता प्रश्न आयुष्याचा होता.
हेही वाचा – भारतीय संस्कृतीत मंगळसूत्राची संकल्पना कशी विकसित झाली?
सावनी कधीही अशा कोणत्याही व्यक्तीला भेटली नव्हती की, जो तिला, ती जशी आहे तशीच स्वीकारू शकेल. सावनीनं एक गोष्ट मात्र कायम मनाशी ठरवली होती आणि ती म्हणजे काहीही झालं तरी अशा व्यक्तीला जोडीदार म्हणून निवडायचं की, ज्याच्याबरोबर असताना तिला स्वत:मध्ये कोणतीही कमतरता आहे, असं जाणवणार नाही. पण, तसं कधी घडलंच नाही. सावनीला लग्नासाठी स्थळं येऊ लागली. कोणालाही दिसण्यावरून ‘जज’ करणार नाही, हे सावनीचं ठरलं होतं. तिला स्वत:चं शिक्षण आणि नोकरी यांच्या आधारावर एक चांगला जोडीदार अपेक्षित होता. पण येणारी स्थळं ती नाकारत होती. कारण- प्रत्येक स्थळ तिचा रंग सावळा आहे आणि ही तिची कमतरता आहे, असं भासवून देत होते. तिला त्याचा प्रचंड त्रास होत होता. आता कुठे तिनं रंग बाजूला टाकून आयुष्यात स्वत:ची ओळख निर्माण केली होती. स्वत:चं स्थानं निर्माण केलं होतं. पण, त्याला काही महत्त्वच नाही हे तिला सारखं भासवून दिलं जात होतं. शेवटी ”तुझा रंग काळा आहे, तुझ्यासाठी असलीच स्थळं येणार हे तिला स्वीकार करण्यास भाग पाडलं जात होतं.”
कोणालाही तिच्या मनाची अवस्था समजत नव्हती. तिनं कधीही कोणताही राजबिंडा, देखणा तरुण जोडीदार म्हणून अपेक्षिला नव्हता, फक्त तिला स्वीकारणारी व्यक्ती हवी होती. तिला समाजाची चुकीची मानसिकता मान्य नव्हती. त्यामुळे तिचा संताप होत होता आणि तिला काही समजत नव्हतं. जी स्थळं तिला तिच्या रंगामुळे पाठवली आहेत, असं तिला वाटत असे; तशी स्थळं ती नाकारत होती. मग, ते कितीही चांगलं स्थळ असो. हे तिला फक्त जाणवत नव्हतं; तर तिच्या घरातल्यांनीही तिला तसं बोलून दाखवलं होतं. “तुझ्यापेक्षा चांगल्या दिसणाऱ्या मुलाची अपेक्षा तू करू नकोस. तू सावळ्या दिसणाऱ्या मुलांची स्थळ बघ.” सावनीला भावी जोडीदाराच्या दिसण्यावरून काही फरक पडत नव्हता. सावळ्या मुलाबरोबर लग्न करण्यास तिची हरकत नव्हती. पण, ती सावळी आहे म्हणून तिनं ते स्वीकारावं हे तिला मान्य होत नव्हतं. तिला हा विचार स्वीकार करणं म्हणजे समाजाची चुकीची मानसिकता स्वीकारण्यासारखं वाटत होतं.
स्वत:ला जपण्याच्या नादात सावनीसुद्धा तीच चूक करीत होती, जी इतरांनी केली होती. पण, तिला त्या क्षणी इतरांना काय वाटतं यापेक्षा स्वत:ला काय वाटतं, हे महत्त्वाचं वाटत होतं. या सर्व गोष्टी स्वीकारून तिला स्वत:चा आत्मविश्वास पुन्हा गमावायचा नव्हता. तिला सर्वकाही असह्य होत होतं. लोकांना सांगूनही काही समजत नव्हतं आणि तिला समजत असूनही व्यक्त करता येत नव्हतं. तडजोड करावी लागते हे माहीत असूनही ती चुकीच्या मानसिकतेमुळे करावी लागू नये इतकीच सावनीची माफक अपेक्षा होती.
या सर्वांत चूक कोणाची? मानसिकता चुकीची आहे ती सावनीची की समाजाची? अशी कित्येक मुलं किंवा मुली असतील जे समाजाच्या चुकीच्या मानसिकतेबरोबर लढत असतील. कोणत्याही व्यक्तीची योग्यता रंगावरून कशी काय ठरू शकते? एखाद्याचा रंग न पाहता, त्याचं मन कधी पाहणार लोक? आपण असा समाज निर्माण करायला कमी पडतोय ही आपली कमतरता आहे. रंगापेक्षा एखाद्याची कौशल्यं, स्वभाव किंवा संस्कारांना महत्त्व देणारा समाज कधी घडणार आहे देव जाणे? तोपर्यंत समाजात अशा कित्येक सावनी ‘स्व’त्वाला जपण्यासाठी संघर्ष करीत राहतील.