तन्मयी तुळशीदास बेहेरे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
“उठ ग बाई उठ. उजाडेल आता. आज पहिली आंघोळ. पहाटे उठायला हवं तर अजून लोळतेस.” आईने खसकन पांघरूनच खेचलं. एसीने गार झालेल्या बेडरूममध्ये मी कुडकुडू लागले. “एकतर दिवसभर घर झाडून घेतले. मग रात्री जागून चकल्या पाडून घेतल्या. आता थोडं झोपू म्हटलं तर पहाटे उठायची कटकट. काय तर म्हणे पहिली आंघोळ. मग त्यासाठी काय पहाटेच उठलं पाहिजे का?” तरी मला बेडवरून उठवण्यात आई कमालीची यशस्वी ठरली. मग तिने उटणं लावलं, कानात तेल घातलं. केसांना खोबऱ्याचा शिरं चोळलं. एकदाचं अभ्यंगस्नान पार पडलं.
आणखी वाचा : ती पुन्हा भेटली… पण या खेपेस वेगळ्या रूपात!
मी रांगोळी काढत असताना बाबा पायरीवर येऊन बसले. त्यांना मी तक्रारीच्या स्वरात विचारलं, “बाबा पहाटेच का उठायचं असतं दिवाळीला?” “अग पहाटे उठायचं. अभ्यंगस्नान करायचं. नवे कपडे घालायचे. देवळात जायचं. नातेवाईकांना भेटायचं, फराळ करायचा, रांगोळी काढायची, फटाके फोडायचे. केवढी मज्जा असते.” “पण हे सगळं करायला पहाटेच का उठायचं. देऊळ दिवसभर उघडं असतं आणि रात्री दिवाळी पार्टी केली की फ्रेंड्स भेटतात रिलेटिव्हजना एक झूम कॉल केला की झालं.” बाबा दूर कुठेतरी पाहत होते…
आणखी वाचा : करून पाहा: प्रांतोप्रांतीचा आगळावेगळा फराळ!
“तेव्हा दिवाळीला पहाटे थंडी पडायची. पांघरून घेऊन आत आत गुरफटून झोपावं वाटत असताना रेडियोवर ‘उठा उठा हो सकळीक… ’लतादीदींचा स्वर ऐकू यायचा. पाट्यावर खोबरं वाटल्याचा आणि त्याबरोबर आजीच्या बांगड्या किणकिणल्याचा आवाज येऊ लागायचा. आईची पाटासमोर रांगोळी काढायची लगबग सुरु असायची. बाबा दबक्या पावलांनी पणत्या आणि कंदील लावत असायचे. आजोबांना आजीने पहिलं उटणं लावलं की नागरमोथा, चंदन, वाळा यांचा दरवळ ‘दिवाळी आली’ अशी जणू वर्दी द्यायचा. फटाक्याचा जळका सुगंध नाकात शिरला की मी धावत धावत पाटावर जाऊन बसायचो. आई प्रेमाने अंगाला उटणं लावत असताना ओव्या म्हणायची…
आजी आजोबा कौतुकाने पाहत असायचे. मी गोविंदा गोविंदा म्हणत कारेट्याचा उर्फ नरकासुराचा वध केला कि बाबा लगेच अंगणात फटाक्याची माळ लावायचे. मला तर तेव्हा आपण कुणी राजकुमारच आहोत असं वाटायचं. वर्षातून एकदा नवीन कपडे मिळायचे. आतासुद्धा कधी नव्या कपड्याचा सुगंध आला की दिवाळीच असल्यासारखं वाटतं.
आणखी वाचा : …आली दिवाळी!
फटाकेसुद्धा वर्षातून एकदाच. काका पैसे द्यायचे. टोपलीत फटाके घेऊन ते आधी उन्हात चांगले वळवायचे म्हणजे ते चांगले वाजतात असं आजोबा म्हणायचे. ते फटाके रोज मी बघत बसायचो. दिवाळी कधी येणार आणि आपण हे कधी एकदा वाजवणार असं व्हायचं मला. त्यात आज काय चकली, उद्या काय लाडू असा काही ना काही जिन्नस घरात तयार होतानाचा खमंग गंध यायचा. पण खायला मात्र दिवाळी कधी येणार याची वाट पाहायला लागायची. अखेर तो दिवस यायचा. आनंदाची उधळण करत. काका, काकी, चुलत भावंडं अली की घर कसं भरून जायचं. फटाके, किल्ला, फराळ, रांगोळी सगळ्यांनी मिळून सण साजरा करायचा आणि त्या आठवणी वर्षभर मनाशी जपायच्या.” “पण बाबा पहाटे…” माझं टुमणं चालूच होतं. “ताई, तुमचं कसं झालंय माहीत आहे का? तुमच्या पिढीला दिवाळीचं काही अप्रूप राहिलेलं नाही. नवीन कपड्यांचं नाही. ते कधीही ऑनलाईन घेता येतात. फराळही बराचसा ऑर्डर करता येतो. नातेवाईकांचे तर व्हॉट्सअपचे ग्रुप असतात. तिथे फॉरवर्ड मेसेज पाठवले की झालं. तुम्हाला दिवाळीचच काही कौतुक राहिलं नाही तर लवकर उठण्याचं काय घेऊन बसलीस.” बाबा खिन्नपणे हसले आणि उठले पण मनाशी काही ठरवून.
आणखी वाचा : यंदा दिवाळीत काढा, अशी रांगोळी!
रात्री जेवताना त्यांनी जाहीर केलं की उद्या सकाळी ६ वाजताची ‘दिवाळी पहाटे’ची तिकिटं काढली आहेत. सगळ्यांनी जायचं. दिवाळी पहाट? परत पहाट? मी आणि बहिणीने एकमेकींकडे पहिलं. हे काय नवीन आता? बाबापण ना… पण आज बाबा फ्रण्ट फूटवरच खेळत होते. पहाटे तडफडत उठलो. बघतो तर काय आई पैठणी नेसून, तन्मणी घालून, केसात गजरा माळून तयार होती. आजी नऊवारी इरकली लुगडं, आजोबा आणि बाबा सिल्कचे कुर्ते घालून घरात लगबग करत होते. आम्ही जरा शॉकच होतो. असं नटूनथटून जायचं असतं तर… आम्हीही मग आमचे अनारकली ड्रेस घालून तयार झालो. नाट्यगृह खचाखच भरलं होतं. मोगऱ्याचा, उठण्याचा, अत्तराचा, नवीन कपड्यांचा सुगंध उत्सवाचं वातावरण तयार करत होता. चतुरंग प्रतिष्ठानचं बॅनर लक्ष वेधून घेत होतं. निवेदिकेने चतुरंग प्रतिष्ठान या संस्थेचं समाजसेवेचे व्रत, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान याची माहिती दिली. १९८६ पासून चतुरंगने दर्जेदार कार्यक्रमाची ‘दिवाळी पहाट’ ची नवी परंपराच सुरु केली आणि ती आजतागायत सुरु आहे असे सांगून कार्यक्रमाची उत्कंठा वाढवली. पडदा उघडला आणि एक स्वप्नातली सफर सुरु झाली. रंगमंचावर दस्तुरखुद्द गानसरस्वती ‘किशोरी आमोणकर’. गाण्याच्या क्लासमध्ये किशोरी ताईंविषयी ऐकलं होतं पण प्रत्यक्ष समोर पाहायची पहिलीच वेळ. किशोरीताईंनी तानपुऱ्यावर षड्ज लावला आणि प्रेक्षागृह स्तब्ध झाले. त्या स्वतःच संगीतबद्ध केलेला अभंग गाऊ लागल्या. ‘जनी जाय पाणियासी…मागे भावे हृषीकेशी… ’पखवाज आणि टाळाचा धीर गंभीर ताल आणि किशोरीताईंचा स्वर…
पहिल्यांदा तो स्वर ऐकला आणि वाटलं की हा स्वर आपल्याला थेट देवळाच्या गाभाऱ्यात नेऊन सोडतोय. आत आत जाऊन गात्र गात्र शांत करतोय. पाण्याला गेलेली संत जनाबाई किशोरी ताईंनी त्या अभंगातून समोर उभी केली. विठूच्या नामस्मरणाने भारून गेली जनाबाई. ती घागर भरण्यासाठी पाण्यात उतरते. तिचे हात पाय भिजतात, ते पाणी घेऊन घरी आली की ती सडा सारवण करते. तिच्या सगळ्या दैनंदिन कामातली लयच जणू या अभंगातून व्यक्त होत होती. हे सगळं करत असताना जनाबाईंना विठूमाऊली दिसत असते. तिची कामंसुद्धा मग विठूमाउलीची पूजा केल्यासारखी पवित्र होतात. देहभान हरपून जाणारी ती अवस्था… जसं अमूर्ताशी संवाद साधणं. ताईंचा लडिवाळ स्वर भिडत गेला. गाण्याच्या भावाबरोबरच ताईंचा लडिवाळ स्वर,त्यांची तळमळ माझ्या अंतःकरणात थेट पोचत होती. काहीतरी हरवलेले गवसल्यासारखी.
आणखी वाचा : दिवाळीत असा असू द्या आहार
परमोच्च बिंदू गाठला तो ‘अवघा रंग एक झाला’ या भैरवीने. पंढरीच्या विठुरायाला पाहून काम, क्रोध निघून गेले… मी तू पण, राग, लोभ, मान अपमान विरले उरला फक्त विठुराया. अवघा रंग एक झाला असा देही असून विदेही घेऊन जाणारा किशोरीताईंचा सात्विक स्वर. तो ईश्वरी स्वर ऐकून लक्ष लक्ष दिवे उजळत आहेत त्या तेजाने आणि पवित्र्याने मनाचा कोपरा नि कोपरा उजळतो आहे. असा तो किशोरी ताईंचा स्वर. समाधिस्थ… अंतरात्म्याशी संवाद साधणारा. स्वतःलाच स्वतःची ओळख करून देणारा. हळूहळू उजाडू लागले आणि दिव्यत्वाचा हा विलक्षण अनुभव घेऊन त्या दिवाळी पहाटेला आम्ही घराची वाट धरली… तेव्हा श्रीमंत झाल्याचा भास आमच्यात नांदत होता.
आणखी वाचा : दिवाळीला का करतात अभ्यंगस्नान? त्याचे शास्त्रीय महत्त्व काय ?
नंतर दरवर्षी प्रत्येक दिवाळी पहाट बाबांसोबत किशोरीताईंच्या स्वरात न्हाऊन साजरी केली. आता मनात प्रश्न नव्हते तक्रार नव्हती. मी- तू पण निघून जाऊन सर्वांमध्ये समरस होऊन त्याचबरोबर अंतरात्म्याशी संवाद साधून अवघा रंग एक होण्यात जे समाधान आहे ते किशोरीताईंच्या गाण्याने मला कायमचं सोबत दिलं. आता किशोरीताई नाहीत आणि बाबाही नाहीत. पण जेव्हा जेव्हा हा अभंग मी ऐकते तेव्हा तेव्हा वाटतं… दिवाळीच आहे. पहाटेचा गार वारा वाहतो आहे. आम्ही ताईंना ऐकतो आहोत… पणत्या, कंदील आणि लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून गेलाय आणि माझं मनही उजळून जातंय… बाबांच्या आठवणींनी आणि किशोरीताईंच्या ओजस्वी स्वरांनी!
tanmayibehere@gmail.com