-डॉ. स्मिता प्रकाश जोशी
“भैरवी, अगं, एवढं धावत पळत मला भेटायला येण्याची काय गरज होती? आपण फोनवरही बोलू शकलो असतो.”
“तुला आज प्रत्यक्ष भेटणं खूप गरजेचं होतं म्हणूनच मी आले आहे.”
“ठीक आहे. तू शांत बैस बरं आधी. हे पाणी घे प्यायला. आपण बोलू ,पण तू थोडी रिलॅक्स हो.”
“नाही गं, माझ्या जान्हवीचं व्यवस्थित झाल्याशिवाय मी रिलॅक्स होऊ शकणार नाही.”
“जान्हवीला काय झालंय?”

“समृद्धी, माझी जान्हवी किती हुशार आणि सिन्सियर आहे, हे तुलाही चांगलंच माहितीय, पण तिचा सीईटीचा स्कोअर कमी झाला आणि तिला मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं नाही. तिच्या बाबांच्या सांगण्यावरून तिनं इंजीनियरिंगची सीईटीही दिली होती त्यामध्ये तिला चांगल्या ठिकाणी ॲडमिशन मिळाली. आता तिचं एक सेमिस्टर पूर्ण झालंय, पण ती दोन विषयात नापास झालीय. तिचं लक्ष आता अभ्यासात लागत नाहीये. तिला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न मी बघितलं होतं, पण शासकीय इंजिनियरिंग महाविद्यालयात तिला ॲडमिशन घ्यावं लागलं, पण तिचं मन तिथं रमत नाहीए. फुलपाखरासारखी बागडणारी माझी जान्हवी अगदी कोमेजून गेली आहे. तिचं वजन कमी झालंय. ती नाराज असते. ती नैराश्यात गेल्यासारखी वाटते. समृद्धी, तू मानसोपचार क्षेत्रात काम करतेस, असं नैराश्यात गेलेली मुलं आत्महत्येचा प्रयत्नही करतात, अशी खूप उदाहरणं मी पाहिली आहेत. मी तिला औषधं चालू करू का? की तुझ्याकडे कोणती मानसोपचार थेरपी असेल तर ती चालू करता येईल? तिचे बाबा म्हणतात, एखादं वर्ष वाया गेलं तरी हरकत नाही, तिनं इंजीनियरिंग पूर्ण करावं. पण मला वाटतं की, तिला पुन्हा मेडिकलला ॲडमिशन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. तुला काय वाटतं ते मला सांग आणि जान्हवीच्या उपचारासाठी काय करू तेही सांग.”

आणखी वाचा-तब्ब्ल ‘१६’ सरकारी नोकऱ्या नाकारून, पहिल्याच फटक्यात UPSC परीक्षेत उत्तीर्ण होणारी ‘ही’ IPS अधिकारी कोण? जाणून घ्या…

समुपदेशन आणि थेरपीची गरज जान्हवीला नसून भैरवीला आहे, हे तिच्या लक्षात आलं. ती म्हणाली, “ भैरवी, अगं जान्हवीला मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली नाही, याचं तिच्यापेक्षा तुला जास्त वाईट वाटतंय. तुझी इच्छा होती, तिनं डॉक्टर व्हावं आणि तिच्या बाबांची इच्छा होती तिनं इंजिनियर व्हावं, तिला नक्की काय व्हायचंय? याचा विचार तुम्ही दोघांनी केलेला नाही. तिचं वजन कमी झालं. पहिल्या सेमिस्टरमध्ये दोन विषयात ती फेल झाली. ती जास्त बोलत नाही याचा अर्थ ती डिप्रेशनमध्ये गेली, असं तुला वाटतंय. इतके दिवस ती घरचं खात होती. आता हॉस्टेलवर राहून कॅन्टीनमधलं जेवण जेवते, त्यामुळं वजनावर परिणाम होऊ शकतो. वातावरण बदलतं. नव्या ओळखी व्हायला वेळ लागतो. जुन्या मित्र मैत्रिणीमध्ये जेवढं ती रमायची, तेवढं अजून इथं रमत नाही,म्हणून जास्त बोलत नसेल. अभ्यासातील विषय बदलतात, समजून घेण्यास वेळ लागतो, सुरुवातीला पहिल्या सेमिस्टरमध्ये एखादं दुसऱ्या विषयामध्ये फेल होणं, एटीकेटी मिळणं, होऊ शकतं, याचा अर्थ ती नैराश्यात गेली असं तू का घेतेस? भैरवी, तू माझी चांगली मैत्रीण आहेस म्हणून सांगते, तुझं स्वप्न पूर्ण होणार नाही, याचं तुला जास्त वाईट वाटतंय. तुझ्या हातातून सर्व काही निसटून गेलं आहे अशी भावना तुझ्यात मनात निर्माण झाल्यानं तू अतिविचार करते आहेस. स्वतः ला सावर. अतिविचारांमुळं तू चिंताग्रस्त झाली आहेस. स्वतःला दोष देऊ लागली आहेस मुलीला मेडिकलला ॲडमिशन घेऊन देता आली नाही, याची टोचणी तुला लागून राहिली आहे.

आणखी वाचा-‘राष्ट्रीय युवक पुरस्कारा’नं गौरव झालेली विधी पळसापुरे

जान्हवीच्या बाबतीत तुझी काळजी योग्य असली तरी ‘ती नैराश्यात गेली’ अशा निष्कर्षापर्यंत तू जाऊ नकोस. मी तिच्याशी नक्कीच बोलेन. तिच्या मनात काय चाललंय ते ही समजून घेईन.”

“ समृद्धी, तू म्हणते आहेस ते बरोबरही असेल. मीच अतिविचार करते. तिनं डॉक्टर व्हावं, असं स्वप्न मी बघितलं होतं, त्यामुळंच मला त्रास होत असेल, पण आता मी स्वतःला सावरेन. फक्त ती आनंदी राहावी एवढंच मला वाटतं. तुझ्याशी बोलल्यानंतर मला आता हलकं वाटतंय. जान्हवीशीही तू नक्की बोल.”
“हो, मी बोलेन तिच्याशी,काळजी करू नकोस.”
समृद्धीच्या आश्वासक बोलण्यानं भैरवी शांत झाली. आपल्या चूक दाखवणारी खरी मैत्रीण आयुष्यात गरजेची असते हे ही तिला पटलं होतं.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smitajoshi606@gmail.com)