आराधना जोशी

भीती ही खरंतर नैसर्गिक भावना आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला कशाची ना कशाची सतत भीती वाटत असते. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर भीतीचं स्वरूपही बदलत जातं. लहानपणी शाळेची भीती काही मुलांना वाटते, काहींना शाळेतल्या विशिष्ट शिक्षकांची वाटते, घरातल्या काही नातलगांची वाटते तशीच ती पाणी, उंची, अंधार, पशू – पक्षी, काही विशिष्ट खेळणी किंवा वस्तूंची असू शकते. थोडं मोठं झाल्यावर रॅट-रेसचा भाग होताना परीक्षा, अपयश यांची भीती वाटायला लागते. नंतर नोकरी मिळेल का? मिळाली तरी ती टिकेल का? सेटल होता येईल का? म्हातारपणी मरणाची वाटणारी भीती. अशी ही भीती आयुष्यभर आपल्या बरोबर असते. खरंतर ही भीती आपलं संरक्षणच करत असते. करोना काळात आपल्याला त्याची भीती वाटत होती म्हणूनच तर आपण सगळेचजण काळजी घेत होतो.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल
Balu Dhanorkar mother, Vatsala Dhanorkar claim,
खळबळजनक! खासदार बाळू धानोरकरांचा घातपात, आईच्या दाव्याने शंका कुशंका
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?
swargate police file case against three for gang rape of woman by threatening to kill children
मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामुहिक बलात्कार; स्वारगेट पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या वैज्ञानिक अभ्यासानुसार, भीती वाटणं हा मुलांच्या सामान्य विकासाचा एक भाग आहे. यासाठी करण्यात आलेल्या अभ्यासात ८ ते १३ वर्ष वयोगटातील २९० मुलांचं निरीक्षण करण्यात आलं. त्यातून असा निष्कर्ष काढला गेला की, काही मुलांना जास्त विचार केल्याने सुद्धा भीती वाटते, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन आयुष्यावरदेखील परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा >> मुलांच्या हट्टीपणाला पालकच जबाबदार? पालकत्व सुसह्य होण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच!

जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे आपण या भीतीवर मात करायला शिकतो किंवा ती भीती किती निरर्थक आहे याची जाणीव व्हायला लागते. मात्र लहान मुलांमध्ये असणाऱ्या किंवा त्यांना वाटणाऱ्या भीतीबद्दल पालकांनी अधिक जागरूक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेकदा मुलांना नेमकी कशाची भीती वाटते ते सांगता येत नाही. परंतु हातापायाची थरथर होणं, वारंवार लघवीला जाणं, अंगदुखी अशी लक्षणं पालकांच्या लक्षात येऊ शकतात. अशावेळी पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते. “असा कसा रे तू भित्रा भागूबाई,” असं जर पालकांकडून मुलांना ऐकवलं गेलं तर मुलांच्या मनातली भीती कमी तर होत नाहीच उलट ती आणखी खोल रुतून बसते. काहीवेळा मुलं ऐकत नसतील, हट्ट करत असतील तर त्यांना पोलीस, डॉक्टर, बागुलबुवा, बिल्डींगचा वॉचमन किंवा नात्यातल्या एखाद्याची भीती घातली जाते. काही काळापुरती मुलांच्या मनात भीती तयारही होते पण जर याचा अतिरेक झाला तर त्यालाही मुलं जुमानत नाहीत. म्हणूनच पालकांनी आपल्या मुलांना शक्यतो अशी भीती घालू नये.

अगदी लहान वयात शाळेची वाटणारी भीती ही आईबाबांपासून वेगळं होण्यातून निर्माण होते. अशावेळी धाक दाखवून किंवा रागावून जबरदस्तीने मुलांना शाळेत पाठवण्यापेक्षा त्याला समजावून सांगणं आणि मूल शाळेत रमेपर्यंत काही काळ आम्ही बाहेरच बसलेले आहोत हा दिलासा देणं अत्यंत गरजेचं असतं. कधी-कधी शाळेत व्यवस्थित जाणारी मुलं अचानक शाळेत जायला घाबरायला लागतात. शाळेत जायला नकार देतात. बहुतांश वेळी यामागे जे प्रासंगिक कारण असतं, ते क्षुल्लक असतं. पण खरंतर हळुहळू मुलांच्या मनात घर करुन असलेली भीती, हेच कारण असतं. त्यात प्रदीर्घ सुट्टीनंतर, अचानक तुकडी आणि शाळा बदलणं, आजारपण अशी रिफ्युजलची प्रासंगिक कारणं असू शकतात. मुळात मुलांना वाटणाऱ्या भीतीतून त्यांना बाहेर काढणे ही पालकांची मोठी जबाबदारी असते. ती जर नीट पार पडली नाही तर भीतीचं रुपांतर फोबियामध्ये होण्याची शक्यता असते.

हेही वाचा >> मुलांचं करिअर घडवायचं आहे, पण कसं? प्रत्येक आईने ‘या’ गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात!

घरातील काही नातलगांबद्दल मुलांना वाटणारी भीती ही आदरयुक्त भीती आहे की त्यामागे इतर काही कारणं आहेत हे पालकांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. लैंगिक शोषणातून जर मुलांच्या मनात त्या नातलगाबद्दल भीती बसली असेल तर हा सगळाच प्रकार पालकांनी अत्यंत संयमाने, धीराने आणि खंबीरपणे हाताळायला हवा. अनेकदा जवळचे नातेवाईक असल्याने अळीमिळी गुपचिळी असा प्रकार केला जातो. त्याऐवजी या सगळ्यात “आम्ही तुझ्या बरोबर आहोत, घाबरण्याचं काही कारण नाही,” हा दिलासा त्या मुलाला पालकांकडून मिळायला हवा. तरच ते मूल आयुष्य आत्मविश्वासाने उभं राहू शकेल.

याबरोबर नैराश्य, पौगंडावस्था, अँक्झायटी, सामाजिक वातावरणाची भीती, अमली पदार्थांचा वापर, जवळच्या नातलगाचा मृत्यू इत्यादी कारणांमुळे देखील मुलांच्या मनात भीती निर्माण होत असते. भीतीची ही कारणं जरी नैसर्गिक असली, तरी वयपरत्वे विशिष्ट भीती अति प्रमाणात जाणवते. त्यामुळे मुलांच्या दैनंदिन आयुष्यात समस्या निर्माण होत असतील तर ते सामान्य नाही. यावर वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घेणं आवश्यक आहे. वेळीच उपचार न केल्यास पुढल्या आयुष्यात मोठ्या स्वरुपाच्या कायमस्वरूपी फोबियामध्ये याचं रुपांतर होतं. म्हणूनच पालकांनी जागृत असणं आणि आपल्या मुलांना वाटणाऱ्या भीतीची योग्य दखल घेणं आवश्यक आहे.