डॉ. किशोर अतनूरकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गर्भवती असताना काही स्त्रियांचा रक्तदाब- ‘बीपी’ वाढतं. त्यामुळे आईच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि आईकडून बाळाकडे होणारा रक्तपुरवठा बिघडून बाळाची वाढ योग्य प्रमाणात होत नाही, किंबहुना ती खुंटते. तसं होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्टर त्या गर्भवतीला रक्तदाब ‘नॉर्मल’ होण्याच्या गोळ्या देतात. ‘या ‘बीपी’च्या गोळ्या मला आता नेहमीसाठी घ्याव्या लागणार का डॉक्टर?’ अशी भीती त्या स्त्रीकडून व्यक्त केली जाते. अशी शक्यता असते, पण त्याचं प्रमाण खूप कमी असतं.

गर्भवती असताना वाढणारं ‘बीपी’ ही बाब गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. कारण मातामृत्यूसाठी कारणीभूत असणाऱ्या चार प्रमुख कारणांपैकी आजही ते एक कारण आहे. गर्भधारणा असताना वाढणारं ‘बीपी’ जोखमीचं असतं. ही जोखीम मातेला, बाळाला किंवा दोघांनाही असू शकते.एखाद्या गर्भवती स्त्रीला किंवा पहिलटकरणीला ‘बीपी’ वाढण्याची समस्या का निर्माण होते आणि अन्य अनेक स्त्रियांना का नाही, हा संशोधनाचा विषय आहे.

आणखी वाचा-किडनी स्टोन ते कर्करोगाची शक्यता; अंतराळातील मुक्काम वाढल्याने सुनीता विल्यम्स यांच्यासमोर कोणती आव्हाने?

विशेष करून पहिलटकरीण गर्भवती स्त्रियांमध्ये गर्भधारणेच्या २० ते २८ आठवड्यानंतर (सहसा सातव्या महिन्यात) रक्तदाब वाढण्याची शक्यता असते असं आढळून आलं आहे. पण सर्वच पहिलटकरीण स्त्रियांचं ‘बीपी’ वाढतं असं नाही. नेमकं कोणत्या गर्भवती स्त्रीमध्ये ‘बीपी’ वाढून गुंतागुंत निर्माण होईल, हे डॉक्टरांना सांगता येत नाही. ज्या गर्भवती स्त्रीच्या कुटुंबात आई-वडील, आजी-आजोबा, काका-मामा यांच्यापैकी कुणाला उच्च रक्तदाबाचा त्रास असतो, तिचं ‘बीपी’ साधरणतः सातव्या महिन्यात वाढू शकतं. हे तिच्या भावी आयुष्यात- म्हणजे तिच्या वयाच्या चाळिशीनंतर तिला उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु होण्याची शक्यता अधिक असण्याचं लक्षण असू शकतं. वेगळ्या शब्दात सांगायचं म्हणजे, ज्या स्त्रियांना उतारवयात ‘बीपीचा त्रास’ होणार हे ठरलेलं असतं, त्याचं ‘ट्रेलर’ गर्भवती असताना वाढलेल्या बीपीच्या स्वरूपात दिसू शकतं.

आणखी वाचा-“पुरुषांनो, मन इतकं निखळ ठेवा की…!” पुणेकरांनी संभाजी भिडेंना दिले सडेतोड उत्तर

तिसऱ्या महिन्यात केल्या जाणाऱ्या सोनोग्राफीत (कलर डॉप्लरची तपासणी) आईकडून बाळाला रक्त पुरवठा योग्य प्रमाणात होत आहे की नाही, हे पाहून सातव्या महिन्यात रक्तदाब वाढण्याची समस्या निर्माण होणार का नाही, याचा अंदाज डॉक्टरांना बांधता येतो. असा रिपोर्ट आल्यानंतर रक्तदाब वाढू नये, यासाठी डॉक्टर गोळी लिहून देतात. या प्रतिबंधात्मक गोळीमुळे ‘बीपी’ न वाढण्यात काही प्रमाणात यश मिळतं. वाढलेलं ‘बीपी’ कमी प्रमाणात असेल- उदा. १४०/९०, तर ‘बीपी’ सामान्य व्हावं यासाठी जी विशिष्ट गोळी असते, ती सुरु केली जात नाही. एका ठराविक पातळीच्या वर ‘बीपी’ वाढलं- उदा. १४०/१०० किंवा १६०/११०, तर बीपी कमी करण्याची गोळी सुरु करावी लागते. गर्भवती असताना वाढलेलं ‘बीपी’ कधी-कधी ‘बीपी’च्या गोळ्या घेतल्यानंतर, ‘बीपी’च्या गोळ्यांचा डोस वाढवूनदेखील कमी होत नाही. असं का होतं, याचं नेमकं कारणदेखील सांगता येत नाही. अशा प्रसंगी आई आणि बाळाच्या प्रकृतीचा सारासार विचार करून, बाळंतपणाच्या नैसर्गिक कळा सुरु होण्याची प्रक्रिया सुरु होण्यापूर्वीच, सलाईनद्वारे औषधाचा वापर करून किंवा अन्य पद्धतीनं बाळंतपणाच्या कळा सुरु करून बाळंतपण करून घ्यावं लागतं. काही गर्भवती स्त्रियांमध्ये ९ महिने पूर्ण होण्यापूर्वीच ‘सिझेरियन सेक्शन’ करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. कोणत्याही पद्धतीनं बाळंतपण होणं किंवा करणं हाच अशा काही परिस्थितींत ‘बीपी’ कमी करण्याचा उपचार असू शकतो.

आणखी वाचा-घरी आइस्क्रीम बनवून थाटला तब्बल सहा कोटींचा व्यवसाय! कोण आहेत रजनी बेक्टर, पाहा…

गर्भवती असताना वाढलेलं ‘बीपी’ हे सहसा बाळंतपणानंतर आपोआप कमी व्हायला सुरुवात होते. बाळंतपणानंतर काही दिवसांतच ते ‘नॉर्मल’ होतं. गर्भवती असताना चालू केलेली ‘बीपी’ची गोळी न घेतादेखील बऱ्याचदा ‘बीपी’ सामान्य होतं. काही स्त्रियांमध्ये हे वाढलेलं ‘बीपी’ नॉर्मल होण्यासाठी जास्त वेळ लागतो. बाळंतपणानंतरदेखील त्यांना ‘बीपी’ची गोळी चालू ठेवावी लागते. बाळंतपणानंतर जास्तीत जास्त १२ आठवड्यापर्यंत ‘बीपी’ नॉर्मल होतं. त्यानंतर ‘बीपी’ची गोळी घ्यावी लागत नाही. पण यांपैकी १० टक्के स्त्रियांमध्ये बाळंतपणानंतर १२ आठवडे झाल्यनंतरदेखील ‘बीपी’ नॉर्मलला येत नाही, ‘बीपी’च्या गोळ्या त्यांना घ्याव्याच लागतात. अशा काही रुग्णांमध्ये ‘बीपी’ वाढलेलं असण्याचं अन्य काही कारण आहे का, हे समजण्यासाठी तपासण्या करून उपचार करावे लागतात. याचा अर्थ असा, की गर्भवती असताना ‘बीपी’ वाढलेल्या साधरणतः १० टक्के स्त्रियांना ‘बीपी’ची गोळी नेहमीकरिता घ्यावी लागू शकते, सर्वांना नाही.

गर्भवती असताना वाढलेलं ‘बीपी’ कमी करण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या काही स्त्रिया, ‘एकदा बीपीच्या गोळ्या सुरु केल्या की कायम घ्याव्या लागतील,’ या गैरसमजापोटी घेण्याचं टाळतात. मात्र असं केल्यानं आईच्या आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घ्यायला हवं.

atnurkarkishore@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you need to take the bp pill that is started during pregnancy forever mrj
Show comments