ट्रॅड वाईफ अर्थात ट्रॅडिशनल वाईफ – म्हणजे आपली पूर्णवेळ गृहिणीपदाची जबाबदारी घेणारी स्त्री. पूर्वीच्या स्त्रियाचं हे नियमित आयुष्य आज पुन्हा एकदा नव्याने स्वीकारलं जात आहे. आहे का तशी आजच्या मुलींची मानसिकता?
“आरुषी, आजच्या वर्तमानपत्रातील जाहिरात बघून घे. सरकारी नोकऱ्यांची सुवर्णसंधी आहे. तुझ्या फिल्डमधील भरपूर पोस्ट आहेत. आणि हे बघ, आयटी कंपन्यांसाठीही व्हेकन्सी आहे. ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. आजच अर्ज मेल कर.”
आरुषीचं आईकडं आजिबात लक्ष नव्हतं. कुंदाताईंना तिचा रागच आला. तिच्या जॉबसाठी तिनं प्रयत्न करायला हवेत. पण ती काहीच करत नाही. मी काही सुचवते आहे तर या मुलीला काहीच गांभीर्य नाही. शेवटी त्या रागावून म्हणाल्या, “आरुषी, हातातील काम सोडून इकडं ये आधी. मी काही महत्वाचं तुला दाखवते आहे. हे कळत नाही का तुला?”
“आई, थोडं थांब. मी एक नवीन रेसिपी ट्राय करते आहे. ते मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून मी येतेच.”
ते झाल्यावर किचन एप्रन काढून आरुषी आईसमोर आली. “अगं, आज मी ‘स्पिनच चीज रोल’ केले आहेत. सर्वांना आवडतील. मस्त सुवास येतोय ना? हं. आता बोल तू काय म्हणत होतीस?”
हेही वाचा : चारित्र्यावर निराधार संशय घेणे क्रुरताच…
“आरुषी. ते नवीन रेसिपी वगैरे सर्व राहू देत. या नोकरीसंदर्भातील जाहिराती वाच आणि लगेच माझ्यासमोर तुझा अर्ज पाठव.”
“आई, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की मला नोकरी करायची नाही.”
“अगं, नोकरी करायची नाही. तर मग काय रांधा वाढा उष्टी काढा करत बसणार आहेस का तू आयुष्यभर? तू पदव्युत्तर आहेस. कॉलेजमध्ये मेरिटवर आली आहेस. कॉम्पुटर मधील सर्व ॲप्लिकेशन तू शिकून घेतले आहेस. सर्व कॉलिफिकेशन असताना नोकरी का करायची नाही? आणि तू नोकरी केली नाहीस तर तुझं लग्न कसं होणार?”
“आई. मी ट्रेड वाईफ अर्थात ट्रॅडिशनल वाईफ – म्हणजे आपली पूर्णवेळ गृहिणीपदाची जबाबदारी घेणार आहे. मला घरात रमायला आवडतं. किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ करायला आवडतात. घरातील सजावट करायला आवडते. घरच्या बगिच्यात वेगवेगळी झाडं लावून त्याचं संगोपन करायला आवडतं.”
“आरुषी अगं, हल्ली केवळ गृहकृत्यदक्ष मुलगी कुणालाही नको आहे. सर्वंच मुलांना नोकरी करणारी. पैसे कमावणारी मुलगी हवी असते आणि हातात पैसा असेल तरच आपली सत्ता राहते. नाहीतर घरात काही किंमत राहात नाही. घरच्या कामाला काही मोल नसतं.”
हेही वाचा : विवाह अवैध ठरला तर पोटगीसारखे कायदेशीर हक्क गमवावे लागणार का?
“आई, तुझं म्हणणं बरोबर आहे. घरच्या कामाला काही मोल नसतंच. कारण त्याची पैशांत गणनाच करता येणार नाही. त्याच्यासाठी असलेलं प्रेम, आपुलकी पैशांत कशी मोजता येईल? तू नोकरी करत होतीस. घर आणि नोकरी सांभाळतानाची तुझी धडपड मी बघितली आहे. नोकरी करण्यासाठी तुला किती संघर्ष करावा लागला. हेही मी बघितलं आहे. मला तो करावा लागणार नाही. हे मला माहिती आहे, पण केवळ घरं सांभाळणं ही माझी आवड असू शकते. एवढं शिक्षण झालं म्हणून नोकरीच करायला हवी हा अट्टाहास का?”
“ आरुषी, गृहिणीला नेहमी गृहीत धरलं जातं. तिला मान,आदर घरात मिळत नाही. याचाही विचार कर आणि अगदीच घरात अडचणी आल्या तर दोघांची कमाई गरजेचीच असते.”
“आई, मी सुशिक्षित आहे. वेळ आलीच तर घराबाहेर पडून पैसे कमावू शकते किंवा माझ्याकडं कला आहे. मी घरबसल्या काही व्यवसाय करू शकते. पैसेही कमवू शकते. ‘ट्रेड वाईफ’ होणं ही माझी आवड आहे. मग फक्त लग्न व्हावं म्हणून मी नोकरी का करावी? घर सांभाळणं हेही एक कौशल्य आहे. पैसे कमावण्यापेक्षाही घरात पैसा कसा वाचवता येईल? घरातल्या सर्वांना सकस आणि पोषक आहार कसा देता येईल? मुलांचं संगोपन नीट कसं होईल? घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही कसं राहील? घरातील संस्कार कसे जपता येतील याचा प्रयत्न मला करता येईल.
हेही वाचा : अवघ्या १६ व्या वर्षी काम्या कार्तिकेयन ठरली माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिला भारतीय मुलगी
आई, घरात प्रेम आणि आदर मिळवणं ही वेगळी गोष्ट आहे. नोकरी करणाऱ्या सर्वच स्त्रियांना घरात आदर आणि जोडीदाराचं प्रेम मिळतंच असं नाही. उलट बहुतेकवेळा तिच्यापेक्षा. तिच्या पैशांवरच अधिक प्रेम असतं. मी काही मैत्रिणींचे अनुभवही ऐकले आहेत. एकमेकांच्या विचारांचा सन्मान केला. समजून घेतलं तर प्रेम आणि आदर आपोआप मिळतो. ते मिळवणं हे आपल्याही हातात असतं. आजी नेहमी म्हणायची नाही का, ‘नवऱ्याचे हृदय जिंकण्याचा मार्ग त्याच्या पोटातून सुरू होतो’. मला“ट्रेड वाईफ’ व्हायचं आहे. ज्याला माझे विचार पटतील त्याच्याशीच मी लग्न करेन.”
आरुषी बरंच काही सांगत होती आणि कुंदाताई मन लावून ऐकत होत्या. आपली मुलगी इतर मुलींपेक्षा वेगळी आहे. तिचे विचार प्रगल्भ आणि परिपूर्ण आहेत, याचा त्यांना अभिमान वाटला. नोकरीच्या जाहिराती त्यांनी बाजूला ठेवून दिल्या आणि तिच्या विचारांना सपोर्ट करायचा, असं त्यांनी ठरवलं.
(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)
(smita joshi606@gmail.com)