गॉसिप हा अनेकांच्या जवळचा आणि आवडीचा विषय आहे. आपण कितीही नाही नाही म्हटले तर नकळत का होईना आपण कोणाबद्दल तरी किमान दिवसातून एकदा तरी गॉसिप करतोच. विशेषत्वाने हे गॉसिप महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असते. मग ते ठिकाण, वेळ कुठलीही असो, त्यांचे गॉसिप एकदा रंगले की, त्यांचे विषय इतके वाढत जातात की, मग ते थांबवणे कोणालाही सहज शक्य होत नाही. काही जणांच्या मते, गॉसिप करणे ही वाईट सवय असल्याचे म्हटले जाते; पण हे खरेच वाईट असते का?
सगळे गॉसिप्स वाईट असतात?
दिल्लीतील समुपदेशन करणाऱ्या मानसशास्त्रज्ञ शिवांगी राजपूत सांगतात, “सगळे गॉसिप वाईट असतात, असं मला वाटत नाही.” कारण- हे आपल्या समाजात सामाजिक संबंध टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेकांकडून मी ‘गॉसिपिंग एक सामाजिक कौशल्य असल्याचं ऐकलं आहे.’ त्याशिवाय मलाही हे खरं वाटतं. अनेकदा गॉसिपमुळे आपल्याला महत्त्वाची माहिती मिळते. उदाहरण सांगायचं झालं तर, समजा तुमचा एखादा मित्र एखाद्या व्यक्तीला आदर्श मानत असेल; पण ती व्यक्ती जर त्याची फसवणूक करीत असेल, तर अशा वेळी तुम्ही तुमच्या मित्राला त्या व्यक्तीपासून सावध राहण्याचा सल्ला देऊ शकता. त्यामुळे गॉसिप करणं नेहमीच वाईट नसतं; पण आपण त्याचा वापर कशा प्रकारे करतो यावर सर्व काही अवलंबून आहे. शेवटी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नेहमी घातकच असतो.”
गॉसिप करण्याचे फायदे
गॉसिप केल्यामुळे व्यक्तीचे मन मोकळे होते. लोक त्यांच्या मनातील भावना आणि राग कोणतेही भांडण न करता, इतरांना सांगून आपले मन मोकळे करतात. तसेच गॉसिपमुळे समोरच्या व्यक्तीच्या मनातील इतरांबद्दलचे मत, तर्क आपल्याला कळतात; जेणेकरून त्या व्यक्तीसोबत आपले चांगले संबंध निर्माण होतात.अनेकदा वरवरच्या गप्पा संपल्यानंतर गॉसिप केल्याने अनेक न माहीत असलेल्या गोष्टी आपल्याला कळतात; ज्यामुळे समोरच्या व्यक्तीसोबतची मैत्री अधिक घट्ट होते. बऱ्याचदा गॉसिपमुळे विविध विचारांचे लोकही एकत्र येऊन एखाद्याचे वागणे, बोलणे यांचे निरीक्षण करून, त्यावर चर्चा करतात.
गॉसिप का करु नये?
चांगले संभाषण आणि गॉसिप यांच्यातील उत्तम फरक वेळीच ओळखा, कधी कधी सतत गॉसिप केल्याने स्वतःलाच मानसिक त्रास होऊ शकतो शिवाय ज्याच्याबद्दल गॉसिप केले जाते त्याच्यासोबतच्या नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो.जेव्हा आपण एखाद्याबद्दल वाईट बोलतो तेव्हा त्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून बघा. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या समोर काही बोलणार नसाल, तर त्याच्या पाठीमागे देखील बोलू नका. सतत एखाद्याबद्दल वाईट बोलल्याने आपले विचार देखील नकारात्मक होतात. ज्याचा गंभीर परिणाम आपल्या आयुष्यावर आणि कामावर देखील होतो.
हेही वाचा: हा तर महिलांचा अपमान! मुंबई लोकलमधील महिला प्रवाशांनी शरीरधर्म उरकण्यासाठी किती पायपीट करावी?
गॉसिप करण्याची सवय कशी सोडवावी?
अनेकदा गप्पा मारता मारता विषय भरकटतो आणि आपण नकळत एखाद्याबद्दल गॉसिप करु लागतो, अशावेळी स्वतःवर नियंत्रण ठेवा. यावेळी गॉसिपला कारणीभूत असलेली परिस्थिती ओळखणे महत्वाचे आहे. बऱ्याचदा आपल्याला एखाद्याबद्दल मत्सर वाटतो, अशावेळी देखील आपण त्या व्यक्तीबद्दल दुसऱ्यांसोबत गॉसिप करतो. त्यावेळी ज्या व्यक्तींवर तुमचे प्रेम आहे त्यांच्याविषयी चर्चा करा. तुम्हाला सतत गॉसिप करायची सवय असेल तर गॉसिप करण्याआधी गॉसिप केल्यामुळे नातेसंबंधांवर होणाऱ्या नकारात्मक परिणामांचा विचार करा. गॉसिप ऐवजी पर्यायी इतर विविध विषयांवर चर्चा करा, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल.