Jaya Kishori On Periods Discrimination: मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अजिबात जागचं हलायचं नाही, शिवाशिव करून घर खराब करायचं नाही, गोडाच्या पदार्थांना स्पर्श करायचा नाही, लोणच्याच्या बरणीकडे वळायचं पण नाही. मसाल्याच्या, पापडाच्या साठवणीच्या डब्यांना हात लावायचं नाही असं केलं तर हे पदार्थ लगेच खराब होतील. ही सगळी नियमावली वाचून आपण नेमकं कोणत्या शतकात जगतोय हा प्रश्न कदाचित तुमच्याही मनात आला असेल ना? मासिक पाळी चालू असताना महिलांवर पूर्वी खूप निर्बंध लावले जायचे, आजही हे नियम थोडे शिथिल झाले असले तरी संपुष्टात आलेले नाहीत. अगदी आपल्या समवयस्क अशा किती तरी मुली आहेत ज्यांच्या घरी पाळीच्या त्या दिवसांमध्ये पुरुषच नव्हे तर सासू, आजी अगदी आईकडूनही कठोर वागणूक मिळते. हे सगळं खरंच प्रगतीचं लक्षण आहे का असा प्रश्न पडावा इतके नियम काहींच्या घरी पाळले जातात. यावरूनच अलीकडे जया किशोरी यांना एका कार्यक्रमात प्रश्न विचारला गेला होता, ज्यांनी दिलेलं उत्तर हे खरोखरच विचार करायला लावणारं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा पहिल्या वाहिल्या नॅशनल क्रिएटर अवॉर्ड सोहळ्यात जया किशोरी यांना सामाजिक बदलासाठी काम करणाऱ्या इन्फ्लुएन्सर म्हणून पुरस्काराने गौरवले होते. या पार्श्वभूमीवर जया किशोरी यांचं समाजात महिलांना पाळीच्या दिवसांमध्ये मिळणाऱ्या वागणुकीबद्दलचं मत लल्लनटॉपच्या कार्यक्रमात विचारण्यात आलं. “तुम्ही एक स्त्री म्हणून मासिक पाळीत असे नियम पाळता का” यावर उत्तर देताना जया किशोरी म्हणाल्या की, “कसं आहे, या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत अंडी जेव्हा त्या सुरु झाल्या तेव्हा निश्चितच त्यामागे चांगलाच विचार होता. नंतरच्या पिढ्यांमध्ये या गोष्टी पुढे जाताना विचार मात्र भ्रष्ट होत गेले त्यामुळे आता हे नियम- निर्बंध जाचक वाटू लागले आहेत, जे खरंतर चांगल्या हेतूनेच सुरु झाले होते. “
“उदाहरण देऊन सांगायचं तर मासिक पाळीच्या दरम्यान जास्त आंबट, तिखट, गोड किंवा दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करू नये असं अनेक तज्ज्ञही सांगतात पण पूर्वी साहजिकच याविषयी इतकी जागरूकता नव्हती. त्रास होईल म्हणून आई- आजी वगैरे तरुण मुलींना लोणची खाऊ नका, गोडाच्या डब्याला हात लावू नको म्हणून सांगायच्या, पण अवखळ वयात इतरांनी सांगितलेलं कुणी ऐकेल का? मग ती भीती मनात बसावी म्हणून असं सांगितलं जायचं की तुम्ही हात लावला तर खराब होईल. आता अशा कितीतरी गोष्टी सांगितल्या जातातच, तुम्ही खोटं बोलाल तर नाक लांब होतं असंही म्हणतात पण म्हणून काय खरोखरच नाक लांब होतं का? या एकप्रकारच्या ट्रिक्स होत्या म्हणता येईल. “
“राहिला प्रश्न घरातून बाहेर पडण्याचं, तर आता जसे पॅड्स, कप्स उपलब्ध आहेत तेव्हा तसे नव्हते. पाळीच्या वेळी जेव्हा पॅड्स वापरत नाही आणि कपड्यांना डाग पडतात तेव्हा तसंच बाहेर कसं जाणार? बरं गेलं तरी त्या धावपळीत आपल्याला होणारा त्रास वाढणार तो वेगळा? हे मुद्दे लक्षात घेऊन घरभर फिरू नका, मंदिरात किंवा बाहेर जाऊ नका असं सांगितलं जायचं. हे सल्ले चांगल्याच हेतूने दिले जायचे पण नंतरच्या पिढीत त्याचा हेतू लक्षात न घेताच मासिक पाळीचं रक्त म्हणजे अपवित्र अशी भावना निर्माण होऊ लागली. जेव्हा एखादी स्त्री गर्भवती असते तेव्हा तिला नऊ महिने पाळी येत नाही, तेव्हा तेच रक्त त्या बाळाला घडवत असतं, मग ज्या रक्तातून आपला जन्म झालाय ते अपिवत्र कसं असेल”
हे ही वाचा<< आजारी पत्नीला काम करायला लावणं ही क्रूरता! न्यायालयाचं स्पष्ट मत, पण निकाल मात्र पतीच्या बाजूने, कारण..
तुम्हाला जया किशोरी यांचं हे मत पटतंय का किंवा तुमचं याबाबतचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा!