आज महिला समानता दिवस आहे. समाजामध्ये स्त्री आणि पुरुष यांना सर्वच स्तरांमध्ये समान वागणूक मिळावी, हा याचा उद्देश आहे. महिलांना आपल्या हक्कांसाठी अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागला आहे. पण, पुरुषप्रधान संस्कृतीचा महिलांच्या मनावर जसा परिणाम होतो, तसाच त्यांच्या मेंदूवर होतो, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. लैंगिक असमानता महिलांच्या मेंदूवर आणि पर्यायाने त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम करते, असे हे संशोधन सांगते. लैंगिक असमानता महिलांच्या मेंदूवर कशी परिणाम करते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिला समानता दिन का साजरा करतात ?

महिला समानता दिवस हा पहिल्यांदा अमेरिकेत साजरा करण्यात आला. १८५३ मध्ये महिलांच्या हक्कांसाठी अमेरिकेत आवाज उठवण्यात आला. महिलांना समान हक्क मिळावेत, यासाठी जवळपास ५० वर्षे चळवळ सुरू होती.पहिल्या महायुद्धात महिलांनी सहभाग घेतला होता आणि त्यानंतर त्यांचे योगदान सर्व जगासमोर आले होते. महिलांच्या या चळवळीला सगळीकडून पाठिंबा मिळू लागला. अखेर १९२० मध्ये महिलांना त्यांचे हक्क मिळाले. अमेरिकेत महिलांना मतदानाचा हक्क नव्हता. २६ ऑगस्ट या दिवशी तेथील महिलांना मतदानाचा हक्क मिळाला आणि समानतेसाठी लढल्या जाणाऱ्या या चळवळीचा येथे विजय झाला. त्यामुळे २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून सुरुवातीला अमेरिका आणि नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यात येऊ लागला.

हेही वाचा : माटुंगा रेल्वे स्थानकावरील ‘त्या’ महिला तुम्हाला माहीत आहेत का? मृतदेह उचलणे हे नित्यकाम; जाणून घ्या कोण आहेत या महिला…

लैंगिक असमानता आणि मेंदूवर होणार परिणाम

लैंगिक असमानता किंवा पुरुषप्रधान संस्कृती ही महिलांच्या मनावर परिणाम करत असते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या जागतिक अभ्यासानुसार, पुरुषप्रधान संस्कृतीत राहणाऱ्या आणि कमी अधिकार असलेल्या महिलांच्या मेंदूमधील ग्रे मॅटर या पदार्थाचे प्रमाण कमी होते, असे आढळते. लैंगिक असमानता महिलांच्या मेंदूची क्षमता कमी करते.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने ७,८०० हून अधिक महिलांच्या मेंदूचा अभ्यास केला. या अभ्यासानुसार, ज्या राष्ट्रांमध्ये महिलांना कमी अधिकार आहेत, किंवा पुरुषप्रधान संस्कृतीचे वर्चस्व आहे अशा प्रदेशातील महिलांचा मेंदूचा वरील थर पातळ होतो. भारत, तुर्कस्तान आणि ब्राझील यांसारख्या लिंग असमानता जास्त असलेल्या देशांमध्ये स्त्रियांच्या मेंदूच्या उजव्या भागातील ‘ग्रे मॅटर’ची जाडी त्या प्रदेशातील पुरुषांच्या तुलनेत तीन ते पाच टक्क्यांनी कमी आहे. .
मेंदूचे सिंग्युलेट कॉर्टेक्स आणि ऑर्बिटफ्रंटल कॉर्टेक्स हे दोन भाग तणाव आणि भावनांशी जोडलेले आहेत. संशोधकांच्या मते, लैंगिक असमानता असणाऱ्या प्रदेशामध्ये दीर्घकाळ राहिल्याने ताण येऊ शकतो. अधिक ताण आल्यामुळे मेंदूच्या पेशींवर परिणाम होतो. मेंदूच्या पेशींवर परिणाम झाल्यास मेंदूतील ‘ग्रे मॅटर’ कमी होते.

संधीचे प्रमाण आणि मेंदूचा विकास

महिलांना घरगुती पातळीपासून ते सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयात योग्य प्रमाणात संधी मिळणे आवश्यक आहे. परंतु, त्यांना कमी प्रमाणात संधी मिळाल्या तर त्याचा परिणाम मेंदूच्या विकासावर होतो. जर महिलांना अधिक प्रतिकूल परिस्थितीत राहावे लागले, तर त्यांचा मेंदू कमी विकसित होतो. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतर्फे करण्यात आलेल्या संशोधनानुसार मेंदूचे आवरण पातळ होण्याचा स्तर स्किझोफ्रेनियासारख्या परिस्थितीत दिसून येतो. ऑक्सफर्ड विद्यापीठातील मानसोपचार विभागातील व्हिजिटिंग प्रोफेसर डॉ निकोलस क्रॉसले म्हणाले की, “आमच्या संशोधनानुसार मेंदूच्या संरचनेतील काही संप्रेरके, भाग हे लैंगिकतेशी संबंधित आहेत. लैंगिक फरक, प्रतिकूल सामाजिक परिस्थिती मेंदूच्या या भागांवरती परिणाम करते. हे बदल विशेषत: मेंदूच्या भावनिक नियंत्रण, तसेच ताण-तणावाचे व्यवस्थापन करणाऱ्या भागांवर अधिक होतात. कमी शिक्षण किंवा शिक्षणाची संधी न मिळणे, बालविवाह, लैंगिक हिंसाचार, लैंगिक असमान वागणूक यांचा मेंदूवर परिणाम होत असतो.

मानसिक आरोग्यास अधिक धोका

केवळ वैचारिकतेने मागास असणाऱ्या देशांमध्ये नव्हे, तर आर्थिक संपन्न असणाऱ्या देशांमध्येही लैंगिक असमानता दिसून येते. कार्यालयामध्ये पदोन्नतीमध्ये होणारा भेदभाव, प्रतिनिधित्व करण्यास संधी न देणे, वेतन वेळेवर न देणे, कामामध्ये सुरक्षितता नसणे याचा परिणाम महिलांच्या मानसिक आरोग्यावर होत असतो. संशोधन करताना संशोधकांनी यूके, यूएसए, चीन, भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशांतील १८ ते ४० वयोगटातील ४,०७८ महिला आणि ३,७९८ पुरुषांच्या एमआरआय रिपोर्टचा अभ्यास केला. संशोधकांनी सांगितले की, महिलांच्या मेंदूवर लैंगिक असमानतेचा घातक परिणाम होत असतो. तसेच शिक्षण कमी असेल तर त्याचाही महिलांवर परिणाम होतो.
हा अभ्यास जर्नल प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस (PNAS) मध्ये ७० हून अधिक संस्थांच्या सहकार्याने प्रकाशित करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Does gender inequality affect womens brains gender inequality shrinks womens brains vvk
Show comments