पूजा सामंत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बागी’, ‘आशिकी २’, ‘ओके जानू’, ‘एक व्हिलन’ अशा माझ्या अनेक चित्रपटांमधून माझी ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ अशी इमेज तयार झाली होती, पण आता तीन वर्षांच्या गॅपनंतर येणाऱ्या ‘तू झूठी, मै मक्कार’ या चित्रपटामध्ये माझी भूमिका सेन्शुअस, बोल्ड आहे. दिग्दर्शक लव्हरंजन यांची ती कल्पना. यातली नायिका जेनिफर अर्थात मी झूठी, थोडी फ्लर्टीश आहे. नायक रणबीर कपूरला (मिकी ) वश करून घेण्यासाठी मी ना ना उद्योग करते. एकूणच मुलांच्या बाबतीत जेनिफर फ्रंटफूटवर असल्याने ती ‘बोल्ड एन्ड ब्युटीफूल’ आहे. मला माझ्या स्टीरिओटाइप इमेजमधून बाहेर पडायची संधी या चित्रपटाने आणि त्या व्यक्तिरेखेने दिली. इतक्या वर्षांनंतर मीच माझ्या इमेजमधून बाहेर येतेय.

१४ वर्षांपूर्वी मी मॉडेलिंगपासून माझ्या करियरची सुरुवात केली होती. अनेक प्रख्यात फॅशन डिझायनर्सच्या कलेक्शनसाठी मी मुख्य मॉडेल (शो स्टॉपर ) म्हणूनही वावरले. अनेक नामांकित ब्रॅण्ड्सना मी एंडॉर्स केलं. त्या पुढील टप्पा होता, हिंदी चित्रपटांचा. प्रसिद्ध दिग्दर्शिका लीना यादव यांनी मला ‘३ पत्ती’ या हिंदी चित्रपटासाठी साइन केलं. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश लाभलं नसलं तरी महानायक अमिताभ बच्चन, ‘गांधी’ फेम बेन किंग्जले, रायमा सेन, आर. माधवन असे  दिग्गज कलाकार त्यात होते. या चित्रपटामुळे माझ्याकडे चित्रपटसृष्टीचं लक्ष गेलं आणि यथावकाश माझं करियर आकाराला येऊ लागलं. खरं म्हणजे -माझे वडील शक्ती कपूर यांच्या कारकीर्दीला ४५ वर्षे झालीत, पद्मिनी कोल्हापुरे, तेजस्विनी कोल्हापुरे माझ्या मावशा लागतात तर लता मंगेशकर , अशा भोसले जवळच्या नातेवाईक (आज्या ). म्हणजे एकूणच चित्रपटाचं वलय माझ्या मागे असताना कुणाला वाटेल, की मला चित्रपटांचे दरवाजे आपोआप उघडले गेले असतील. किंबहुना वडिलांनीच (शक्ती कपूर) मला आणि माझ्या मोठ्या भावाला (सिद्धांत कपूर ) लाँच केलं असेल. पण तसं झालेलं नाही. अगदी माझ्या डॅडनीसुद्धा प्रचंड संघर्षानंतर स्वतःला एस्टॅब्लिश केलं. खिशात अवघे २०० रुपये घेऊन ते दिल्लीहून मुंबईला आले होते. ‘पापड बेलना’ या म्हणीचा पुरेपूर प्रत्यय त्यांना आला होता. कधी सहनायक, कधी खलनायक, कधी चरित्रनायक, कधी कॉमेडियन अशा अनेक रूपात डॅड गेली ४५ वर्षं इथे टिकून आहे. त्यांच्यामागे कुठे कसलं वलय होतं? पण स्वतःचा मार्ग स्वतः काढत ते इथवर आले, म्हणूनच मी आणि सिद्धांतने स्वतःच संघर्ष करत पुढे जायचं ठरवलं. मी माझ्या बहुतेक चित्रपटांसाठी स्वत: ऑडिशन देत सिलेक्ट झाले. आणि आता ‘तू झूठी, मैं मक्कार’ हा चित्रपट ३ वर्षांच्या ब्रेकनंतर रिलीज झालाय. तत्पूर्वी ६ मार्च २०२० रोजी माझा ‘बागी-३’ हा सिनेमा रिलीज झाला होता.

सगळेच मला विचारतात, मी गेली ३ वर्षे कुठे होते? २०२० मध्ये करोनाची पहिली लाट आणि २०२१ मध्ये दुसऱ्या लाटेने जगाला विळखा घातला. या दरम्यान काही जण चित्रपट निर्मिती करत होते, परंतु मी माझ्या कुटुंबीयांसमवेत माझ्याच घरी होते. त्यानिमित्ताने कुटुंबाचं प्रेम, एकत्रित राहणं पुन्हा अनुभवता आलं. माझा जन्म झाल्यानंतर मम्मी डॅड मला ज्या घरात घेऊन आले त्याच घरात मी आजही राहतेय याचा मला अभिमान आहे. माझ्या बेडरूमला जी बाल्कनी -विंडो आहे, ती माझी अत्यंत आवडती जागा आहे.  त्या खिडकीत रंगीबेरंगी पक्षी सतत येतात, थेट रंगीत चिमण्या,पोपट, कोकीळ, बुलबुल आणि हो दिवस भर अनेक खारींची देखील लगबग चालू असते. करोनाकाळाचा तो वेगळाच अनुभव होता.

आणि आता माझा ‘तू झूठी, मै मक्कार’ हा सिनेमा येतोय. त्याचा दिग्दर्शक लव्हरंजन आणि माझा यातला नायक रणबीर कपूर दोघंही ‘मक्कार’ (लबाड ) आहेत, असं माझं मत आहे. लव्हरंजनने मला या चित्रपटाचं स्क्रिप्ट आजतागायत दिलेलं नाही. एक दिवस आधी ते दुसऱ्या दिवशीच्या शूटिंगचे संवाद हातात देत असत. हल्ली सगळेच बाऊंड स्क्रिप्ट देतात, पण ‘कल देता हू’ असं म्हणत या पठ्ठ्याने आता चित्रपट रिलीज झालाये तरी स्क्रिप्ट दिलेली नाही. रणबीरसोबत सिनेमात काम करायला मिळावं याची मी गेल्या १२ वर्षांपासून वाट पाहात होते. रणबीरच्या ‘सावरिया’पासून मी त्याच्या परफॉर्मन्सची चाहती आहे. रणबीर सेटवर येतो, पण कुणालाही कसलाही मागमूस लागू न देता तो चोरपावलांनी सेटवरचा एक कोपरा गाठतो. या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी खूपच छळलं त्याने मला. “क्यों श्रद्धा, अपनी लाइन्स याद की है ना तुमने?” मी अगदी साधेपणाने त्याला सांगे, “यस.” ! तो म्हणायचा, “ मैंने कोई डायलॉग प्रीपेअर नही किये है. इसलिए।” पण कॅमेरा रोल झाल्यावर मात्र या साध्याभोळ्या रणबीरचं एका कसलेल्या कलावंतामध्ये रूपांतर व्हायचं, ते पाहून थक्क व्हायला व्हायचं. मला मात्र स्ट्रेस देत राहायचा, मी संवाद पाठ केलेत की नाहीत, हे येता-जाता विचारत राहायचा, ‘मक्कार’ कुठला! पण याचा अर्थ असा नाही, की मी रणबीरची फॅन आहे. आय हॅड बिग क्रश ऑन हृितिक रोशन. त्याचा ‘कहो न प्यार है’ रिलीज झाला तेव्हा मी टिनएजर होते. मी नंतर त्याला माझ्या भावना कळवल्या. त्यावर त्याचं उत्तर होतं, ‘सो स्वीट ऑफ यू.’

 ‘तू झूठी’ या चित्रपटानिमित्ताने मला आठवण झाली ती माझ्या बालपणीची. मी सहसा खोटं बोलत नाही, मम्मी डॅडीसमोर खोटं बोलणं कधीच शक्य झालं नाही. पण एकदा प्रीलियम्स चालू झाल्या, माझ्या एका मैत्रिणीकडून मी पेपर मागवून घेतला. त्याची चांगली तयारी केली. मला उत्तम मार्क्स मिळाले. शिक्षकांना संशय आला. मला इतके उत्तम गुण मिळतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. मम्मीने सहज गुगली टाकली, ‘श्रद्धा, तुला यापूर्वी ९० टक्के मार्क्स कधी मिळाले नव्हते, कसे गं इतके मार्क्स मिळवलेस या वेळी? तिने असं म्हणताच माझा बांध फुटला आणि मी तिला खरं खरं सांगून टाकलं, की मी मैत्रिणीकडून पेपर मिळवला ते. ती खूपच चिडली. मग मात्र मी ठरवलं, की चांगले मार्क्स मिळवायचेच. आणि मिळवलेही.

माझे आणखी काही चित्रपट येत आहेत, माधुरी दीक्षितच्या ‘तेजाब’चा रिमेक मी करण्याची शक्यता आहे, ‘नागिन’ च्या रिमेकमध्ये मी आहे. ‘स्त्री(पार्ट २ )’, ‘चालबाज इन लंडन’ अशा विविध चित्रपटांमध्ये मी बिझी आहे. सध्या मी कामाचा भरभरून आनंद लुटते आहे. आणखी काय हवं असतं एखाद्यासाठी.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doing a bold role for the first time shraddha kapoor in movies chatura article ysh