नीलिमा किराणे
‘कॉफी प्यायला ये’, असा योगिताचा मेसेज पाहून साक्षी ऑफिसच्या कॅन्टीनला गेली. तिची कलीग-कम- मैत्रीण योगिता कोपऱ्यातल्या टेबलवर भिंतीकडे तोंड करून बसलेली होती. योगिताचा लाल झालेला डोळा आणि सुजलेला गाल पाहून साक्षी खवळून म्हणाली, “आज पुन्हा हात उचलला रोहितने?” योगिता उदास हसली.
थोडी कॉफी पोटात गेल्यावर म्हणाली, “परमच्या प्रमोशनच्या पार्टीचे कुणीतरी एफबीवर टाकलेले फोटो रोहितने पाहिले आणि ‘तू परमला लगटूनच उभी राहिलीएस’ म्हणून आवाज चढवून बडबडायला लागला. ‘परमनं दोन महिन्यांपूर्वी तुला घरी सोडलं होतं, तेव्हापासूनच मला शंका होती’ वगैरे वगैरे. माझं काही ऐकूनच घेईना. मग जोराचं भांडण झालं. संतापाच्या भरात हात उचललाच त्यानं. सासूबाई मध्ये पडल्या तर त्यांनाही ढकललं. फार वाढत चाललंय गं. सहन होत नाही, सगळं सोडून पळून जावंसं वाटतंय.”
“मग जा ना, कुणी थांबवलंय तुला?”
“कुठे जाऊ?”
“कुठेही जाऊ शकतेस. जॉब आहे, मोठी पोस्ट, चांगला पगार आहे…बदली घे मागून.”
“खूपदा वाटतं, पण हिम्मत होत नाही गं…”
“आणखी किती वाट पाहणारेस? किती सहन करणारेस योगिता? इतक्या वर्षांत ना याची ड्रिंक्स थांबली, ना संशय, ना मारहाण.”
“काय करू गं? घटस्फोट घेतला तर बदनामी होईल. आई-बाबांना कुणाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. लोकांच्या चौकशा.. त्यापेक्षा झाकली मूठ सव्वा लाखांची.. तेच सेफ वाटतं. ”
“येता जाता संशय, ड्रिंक्स, अघोरी मार खाणं हे सेफ वाटतं तुला? आणि बदनामीची भीती तुला वाटायला हवी की त्याला? तू काय केलंयस? झाकली मूठ कुठली? तुझं सुजलेलं तोंड, अचानक रजेवर जाणं यांचा अर्थ कळत नसेल का लोकांना?”
“तरी आशा असतेच गं मनात, पुन्हा पूर्वीसारखं होईल अशी.” योगिता उदासपणे म्हणाली. तेवढ्यात लांबून कुणी परिचिताने हात केलेला पाहिल्यावर क्षणात तिचा चेहरा नॉर्मल झाला, कमावलेलं स्माईल चेहऱ्यावर आलं. ते पाहून साक्षी भडकलीच.
“हे, हे झटकन सगळं लपवून काहीच न घडल्यासारखं तू सहज हसतेस ना, त्या नाटकाचा संताप येतो मला.”
“म्हणजे मी सारखी रडत, चेहऱ्यावर टेंशन घेऊन बसू का?”
“तसं नव्हे, पण या लपवालपवीतून, ‘छे, कुठे काय घडलंय?’ असं स्वत:लाही सांगत राहायची सवय झालीय तुला. पिहूवर काय परिणाम होईल या सगळ्याचा?”
“म्हणून तर तिला हॉस्टेलला ठेवलंय ना..”
“योगिता, हे तात्पुरते उपाय झाले. आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असूनही तू असंच सगळं चालू ठेवायचा जाणिवपूर्वक निर्णय घेतला असशील, तर माझं काही म्हणणं नाही, पण लोक काय म्हणतील, आई-बाबांना काय वाटेल? वगैरे काल्पनिक गोष्टींना तू घाबरते आहेस. आणि मुख्य म्हणजे इतरांचा जास्त विचार करते आहेस. घटस्फोट घ्यायचा, की बदली घ्यायची, की सेपरेट राहायचं, याचा निर्णयही पुढचा आहे. मला हे जाणवतं, की तुझी चिडचिड करून झाली, की तू शांत होतेस आणि प्रश्नाला सामोरं जाणंच टाळतेस. पिहू नव्या पिढीची आहे. ४-५ वर्षांनी ती तुला नक्की विचारेल, “आई, तू एवढा अपमान आणि मारहाण सहन का केलीस?” तेव्हा तू ताठ मानेनं तिच्या नजरेला नजर देऊ शकशील?”
पिहू आपल्याला विचारते आहे असं चित्र डोळ्यासमोर येऊन योगिता चपापली. तरीही म्हणाली, “साक्षी, आमच्या समाजात असं घटस्फोट वगैरे होत नसतात गं.”
“असली कारणं मला मान्यच नाहीत योगिता. आमचा समाज, आमच्या पद्धती याच्या पलीकडे जायला हवं तुला. नाहीतर एवढं शिकण्याचा उपयोग काय? गेल्या दहा वर्षांत परिस्थिती जास्त वाईट झालीय, हे मला नक्की माहीत आहे. रोहितला आपलं काही चुकतंय असंही वाटत नाही, त्यामुळे कुणाची मदत घ्यायचा प्रश्नच नाही. या वस्तुस्थितीकडे तू डेटा म्हणून बघावंस आणि पर्याय शोधावेस असं मला वाटतं. आत्तापर्यन्त मी कधी आग्रह धरला नव्हता, पण आता राहावत नाहीये. आपल्याला आयुष्यात आत्मसन्मानानं जगायचं आहे, की समाज, खोटी आशा वगैरे कारणं देऊन प्रत्यक्षात भित्रेपणातच मरत जगायचं आहे? हा चॉइस तुझाच आहे. उद्या पिहू सुद्धा हेच संस्कार घेऊन असाच अन्याय सहन करत राहिली तर तुला चालेल का?”
साक्षीचा जीव का तुटतोय ते योगिताला एका क्षणात लख्ख कळलं. वर्तमान आणि भविष्यकाळाचा आरसाच साक्षीने तिच्यासमोर धरला होता.
(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)
neelima.kirane1@gmail.com