‘आज ५० टक्के रक्कम भरा आणि २१ दिवसांनंतर वस्तू ताब्यात घ्या,’ अशी जाहिरात वाचून शीतल एका दुकानात शिरली. तिच्या शहरात नव्यानेच सुरू झालेलं हे इलेक्ट्राॅनिक्स दुकान होतं. दुकानाची जाहिरात व्हावी, या हेतूने आम्ही ही योजना काही दिवसांसाठी सुरू केली आहे, असं दुकानातील सेल्स गर्लने तिला सांगितलं. तिच्या बोलण्यावर शीतलचा विश्वास बसला. तिने पस्तीस हजारचा फ्रिज, दहा हजारचा मायक्रोवेव्ह ओव्हन आणि सातशे रुपयांची इस्त्री घ्यायचं ठरवलं. दोन-तीन वर्षांपासून जुना फ्रिज बदलायचं तिच्या मनात होतं. निम्मेच पैसे भरायचे आहेत तर आज भरूनच टाकू असा विचार करून तिने पैसे भरले. एका कागदावर पैसे मिळाले असं लिहून त्यांनी तो कागद शीतलकडे दिला आणि म्हणाले, “येताना हा कागद घेऊन या.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“अहो, या कागदावर दुकानाचं नाव, सही, शिक्का काहीच नाही. जरा व्यवस्थित बिल देता का?”

“तुम्हाला सही-शिक्क्यासह बिल हवं असेल तर आणखी एक हजार रुपये जास्त लागतील.”

“चालेल मला. हे घ्या एक हजार रुपये. पण मला पक्कं बिल द्या.”

त्यांनी तिला दुसरं बिल दिलं. त्यावर दुकानाचं नाव होतं. तिने बिल घेतलं. आनंदाने घरी गेली. एकवीस दिवस ती एकदम शांत होती. नवऱ्याच्या खिशावर डल्ला न मारता स्वत: साठवलेल्या पैशांतून फ्रिज घेतल्याचं सरप्राइज तिला नवऱ्याला आणि मुलीला द्यायचं होतं. तो दिवस आला. आज तिला सगळ्या वस्तू मिळणार होत्या. तिने सगळी कामं पटापट आवरली. दुकानात फोन केला. म्हणाली, “आज माझ्या वस्तू घरपोच होतील ना. मी वाट पाहात आहे.”

“मॅडम, आज खूप जास्त ऑर्डर्स घरपोच करायच्या आहेत, तुमच्या वस्तू दोन दिवसांत देतो.” शीतल हिरमुसली, पण आणखी दोन दिवसांनी काय बिघडणार आहे, असं म्हणत तिने स्वत:ला समजावलं. दोन दिवसांनी पुन्हा तोच रिप्लाय आला तेव्हा ती अस्वस्थ झाली. ती त्या दुकानदाराला म्हणाली, “तुमच्याकडे माणसं नसतील तर मी दुकानात येते. मी माझ्या वस्तू घेऊन जाईन.”

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: बालदम्याबाबत विचार बदला

“चालेल मॅडम, दुपारी चार वाजता या.” त्यांनी सांगितलं. ती नवऱ्याला सोबत घेऊन दुकानात गेली, पण दुकानाच्या बाहेर लांबपर्यंत रांग होती. दंगा चालू होता. तिने त्या गर्दीतील एकाकडे चौकशी केली. तेव्हा ते दुकानवाले लोकांना फसवून कुठे तरी निघून गेल्याचं तिला कळलं. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आपण फसले गेलोय हे पचवणं तिला शक्यच नव्हतं. तिने त्या लोकांना फोन केला. आत्ता सकाळपर्यंत अगदी गोड गोड बोलणाऱ्यांचे फोन बंद होते. तिच्या नवऱ्याच्या सगळं लक्षात आलं.

आता रडून, खचून उपयोग नव्हता. तिथं स्थानिक पोलीस पंचनामा करण्यासाठी आलेच होते. इतरांप्रमाणे शीतलने तक्रार नोंदवली. हे पैसे कसे, कधी परत मिळतील की हे पैसे बुडाले या विचारात दोघं घरी परतले. शीतलला प्रचंड मानसिक त्रास होत होता. तिच्याकडचं बिल तिने पोलिसांना दाखवलं. ते बिलही फसवं होतं. अशा पद्धतीने हजारो लोक फसले होते. करोडो रुपयांचा गंडा त्या लोकांनी घातला होता. शीतलही त्या हजारोंपैकी एक होती. शीतलप्रमाणेच इतरांनाही बराच त्रास झाला होता. या फसलेल्यांमध्ये गृहिणींची संख्या जास्त होती.

लोकांनी अशी खरेदी करण्यापूर्वी विचार करायला हवा होता. निम्म्या किमतीत वस्तू मिळवा. एकावर एक वस्तू फ्री. अमुक रुपयांची खरेदी करा त्यावर आकर्षक भेटवस्तू अशा अनेक फसव्या जाहिराती गृहिणी, नोकरदार स्त्रिया सगळ्यांनाच आकर्षित करतात. कारण कमी पैशांत जास्त काही मिळवण्याचा मोह आवरता येत नाही. पोलिसांकडे तक्रार तर नोंद झाली होती. पण पैसे परत मिळतील याची काही खात्री नव्हती. शीतलला पैसे बुडल्याची घटना स्वीकारणं हा एकच पर्याय होता. शिवाय पुन्हा असं होणार नाही यासाठी काळजी घ्यावी लागणार होती.

आपण असे फसले जाऊ नये यासाठी ग्राहकराणीने पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी –

१) फसव्या जाहिरातीला बळी पडू नये.

२) आधी पैसे द्या, नंतर वस्तू न्या, असं म्हणणारा दुकानदार फसवणारा असू शकतो. अशा ठिकाणी पैसे देण्याची घाई करू नये. त्या दुकानाविषयी किंवा कंपनीविषयी नीट माहिती काढा, मगच पैसे भरा.

३) नव्या दुकानाच्या जाहिरातीची विश्वासार्हता तपासून घ्यावी. बिल घेताना ज्यावर जीएसटी नंबर लिहिलेला असतो असंच बिल घ्यावं.

४) फसवणूक झाल्याचं लक्षात येताच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी.

५) ग्राहक तक्रार आयोगाकडे ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन तक्रार नोदवावी.

मनाला भुरळ घालणाऱ्या अनेक आकर्षक जाहिराती असतात, पण त्या वस्तू हातात मिळेपर्यंत त्याचं आकर्षण कमी होतं. त्यात फसले गेलो तर राग, अस्वस्थता या भावनांचा अतिरेक होतो. वस्तू खरेदी करताना मानसिक, आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी सजगतेने खरेदी हाच उत्तम उपाय आहे.

archanamulay5@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont fall for advertisements like pay 50 percent today and take possession later or sale and discounts dvr
Show comments