तीन वर्षांतून एकदा अधिकमास येतो. या अधिकमासाला नवीन लग्न झालेल्यांसाठी विशेष महत्त्व असते. सासुरवाशीण मुलीचे आई-वडिल जावयाला आणि मुलीला घरी जेवायला बोलवतात आणि जावयाला अधिकमासाचे ३० आणि ३ असे वाण देतात. या अधिकमासात या ३३ आकड्याला महत्व आहे. अनारसे, बत्तासे, रेवड्या, रसगुल्ले इत्यादी वस्तू वाण म्हणून देतात त्याला धोंडे असे म्हणतात. या धोंडे जेवणाच्या कार्यक्रमात जावयाचे पायही धुतले जातात. पाय धुण्याच्या प्रथेवरून अनेक पुरोगामी विचारवंतांनी टीका केली आहे. आपल्या आई-वडिलांच्या वयातील सासू-सासऱ्यांकडून पाय धुवून घेण्याची ही कसली प्रथा म्हणून या प्रथेची कुचेष्टाही केली जाते. परंतु, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी धोंडी जेवणाबाबतची नवी संकल्पना आज स्पष्ट केली. यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित यशस्विनी सन्मान सोहळ्यात बोलत होत्या.
या सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सोशल इम्पॅक्ट कसा कॉन्टिफाय करतात हे माहीत नाही. माझी सर्वांत लाडकी स्टोरी धोंडी जेवणाची आहे. मला धोंडी जेवणाविषयी माहित नव्हतं. कारण शिंदेंनी कधी माझ्या वडिलांना जेवायला बोलावलं नाही, आणि पवारांनी कधी सदानंद सुळेंना बोलावलं नाही. त्यामुळे मला माहितच नव्हतं. हे मला कोणामुळे कळलं तर रीलमुळे कळलं. मी रोज पाच मिनिटे रील बघते आणि मी हे कबुलही करते. पाच मिनिटांच्यावर माझं इन्स्टाग्राम लॉक होतं. त्यामुळे दिवसभरात मी फक्त ५ मिनिटेच रील पाहू शकते. नाहीतर रील पाहून पाहून दोन तास जातील आणि खासदारी येईल धोक्यात. त्यामुळे मी तुम्हालाही विनंती करते की पाच मिनिटंच रील बघा. पण रीलमध्ये जे दिसतं ते खरं नसतं. आजकाल मी पाहते की पुण्यात रील्सकरून नको नको ते व्हायला लागलंय. त्यामुळे हे थांबवा.”
हेही वाचा >> अधिकमास का जावयांचे चोचले मास?
त्या पुढे म्हणाल्या, “रील्स बघत असताना एका पक्षाचे आमदार आणि त्यांच्या पत्नी जावयाचे पाय धुवत होते. हे तर आधी आपल्याकडे होते. तेव्हा मी लग्नाला गेले होते. मग हा बाबा आता का पाय धुवतोय? असा मला प्रश्न पडला. कारण, लग्न होऊन पाच वर्षे होऊन गेले. मग मी गाडीतून उतरले आणि प्रशांतदादांना विचारलं. हा बाबा पाय का धुवतोय असं विचारलं? ते म्हणाले की ताई हे धोंडे जेवण आहे. दर तीन वर्षांनी जावयाला जेवायला बोलावलं जातं. आणि जावयाचे पाय धुतले जातात. अशीच पद्धत असते.”
“मी माझ्या लोकसभा मतदारसंघापासून सुरुवात करणार आहे. जरूर धोंडे जेवण करा, माझा त्याला विरोध नाही. पण सासूने जावयाचे पाय धुण्याऐवजी जावयाने सासू आणि आईचे पाय धुवायचे, एवढी चांगली मुलगी दिली म्हणून. जावयाने सासू आणि आईला दोघींनाही जेवायला बाहेर न्यायचं, किंवा घरात जेवायला बोलवा. पण, मुलीच्या किंवा मुलाच्या आईवडिलांना पाय धुवायला लावू नका. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. संस्कृती जपली पाहिजे. जावयाला मुलगा बनवा आणि सूनेला मुलगी बनवा. पण यांना डोक्यावर नको मनात बसवा”, असंही प्रेमळ आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं.
अधिक मास म्हणजे काय?
वसिष्ठ सिद्धांताप्रमाणे अधिक महिना हा ३२ महिने १६ दिवस आणि ८ तासांनंतर म्हणजे साधारण ३३ महिन्यांनंतर येतो. या ३३ महिन्यांसाठी म्हणून ३३ वस्तूंचे दान केले जाते. याचा उल्लेख अनेकदा तीस – तीन असा केला जातो. कारण महिना ३० दिवसांचा असतो. या काळात काही लोक महिन्याभराचे व्रत ठेवतात. उदा. जर एकवेळ कथा वाचनाचे व्रत करत असाल तर शेवटचे तीन दिवस दिवसातून २ वेळा करून हे पुढील ३ दिवस भरून काढावे लागतात.
३३ ही संख्या अधिकमासामध्ये महत्वाची आहे. ३३ कोटी देव असल्याने ३३ ही संख्या महत्वाची आहे.अधिकमास म्हणजे पृथ्वीचे सूर्या भोवतीच्या भ्रमणामुळे सूर्य बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो. त्यात ३६५ दिवस ५ तास, ४८ मिनीटे आणि ४७ सेकंद असतात. या काळात इंग्रजी कॅलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र चंद्राच्या पृथ्वी भोवती फिरण्यावर आधारलेले १२ हिंदू चंद्रमास मात्र ३५४ दिवसातच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात.
सौरमास आणि चांद्रमास यांची सांगड घालण्यासाठी तसेच हा ११ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिकमासाची योजना करण्यात आली आहे. तीन वर्षांत होणारा ३३ दिवसांचा फरक क्षयमास आणि अधिकमास टाकून ही कालगणणा सूर्याधारीत सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते असेही त्यांनी सांगितले.