डॉ. किशोर अतनूरकर

असुरक्षित संभोगानंतर गर्भधारणा राहू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून काही तासांच्या आत गर्भनिरोधक गोळ्या किंवा Emergency Contraceptive Pills (EC Pills) घेण्याबद्दलची जागरूकता वाढत आहे. या गोळ्यांचा उपयोग ‘ बॅक अप ‘ किंवा आपत्कालीन परिस्थितीतच करावा, ही संततिनियमिनाची नियमित पद्धती नाही हे लक्षात घेतलं पाहिजे.

पाळणा लांबविण्याची जी उपलब्ध साधनं आहेत त्यांचा उपयोग अथवा ही योजना शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी (संभोगापूर्वी)  किंवा त्या दरम्यान अवलंबवावी लागते. ज़र तशी काळजी घेतली गेली नसेल तर जोडप्याची चिंता वाढू शकते. आपण काहीच ‘ काळजी ‘ घेतली नाही. गर्भधारणा तर होणार नाही ना? आपल्याला तर गर्भ नको आहे, आता काय करावं?. असे प्रश्न उद्भवणे साहजिकच आहे अर्थात, अशी परिस्थिती क्वचित प्रसंगी योग्य ‘ काळजी ‘ घेतल्यानंतर देखील येऊ शकते. उदा. निरोध किंवा कंडोम वापरताना ते निसटू शकतं, फाटू शकतं आणि वीर्याचा एखादा थेंब योनीमार्गात जाऊ शकतो, त्यामुळे ‘ आपत्कालीन ‘ परिस्थिती निर्माण होऊ शकते.

हेही वाचा >>> Kolkata Rape : “मुलींनो भारतात येऊ नका, कारण..” कोलकाता बलात्कार प्रकरणानंतर महिला इन्फ्लुएन्सरची पोस्ट

एखादं नियमित निरोध वापरणारं जोडपं आहे; पण त्या रात्री निरोधचा ‘स्टॉक‘ संपल्याचं त्यांना ‘ऐन’ वेळेवर लक्षात येतं, दोघांच्या भावना अनावर झाल्या आहेत, मूड चेंज करण्याच्या मनस्थितीत दोघेही नाहीत, अशा परिस्थितीत निरोधाशिवाय संभोग होऊन जातो. नंतर, गर्भधारणा तर राहाणार नाही ना याची धाकधूक पुढील मासिक पाळी येईपर्यंत चालू रहाते. असाच काहीसा प्रसंग, सेफ पिरियड कोणता आणि डेंजर पिरियड कोणता या संदर्भातील गोंधळामुळे घडू शकतो. मासिकपाळीच्या ९ ते १९ व्या दिवसात संभोग टाळण्याऐवजी होऊन जातो. काही जोडप्यांना ( बऱ्याचदा पुरुषांना) मनावर ताबा ठेवणं कठीण जातं, अशा प्रसंगातून नको असलेली गर्भधारणा राहण्याची शक्यता असते. अशा प्रसंगांना आपण लैंगिक जीवनातील ‘अपघात ‘ म्हणूया. अशा संकटकाळात बाहेर पडण्यासाठी संशोधकांनी आपल्यासाठी एक दरवाजा शोधून ठेवला आहे. त्या संकटकाळात बाहेर पडण्याच्या मार्गाचं नाव आहे, तातडीचं संततिनियमन अथवा Emergency Contraception. तातडीच्या  संततिनियमनसाठी असुरक्षित संभोगानंतर, गर्भधारणा राहू नये यासाठी एक प्रकारची गोळी घेतली जाते. ही गोळी फक्त आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतरच घेण्यासाठी तयार केली गेली आहे, म्हणून या गोळीचा वापर नियमित स्तरावर करू नये. तसं केल्यास त्या गोळीचा परिणाम पाहिजे तसा होत नाही.

असुरक्षित संभोगानंतर ७२ तासाच्या आत (शक्यतो लवकर) डॉक्टरांनी शिफारस केलेल्या गोळ्या घ्याव्यात. दोन गोळ्यांमध्ये १२ तासांचं अंतर असावं. काही स्त्रियांना गोळ्या घेतल्यानंतर मळमळ/उलटीचा त्रास होऊ शकतो. उलटी न होण्याची गोळी १ तास अगोदर घेतल्यास असा त्रास होणार नाही. गोळ्या घेतल्यानंतर दोन तासाच्या आत उलटी झाल्यास गोळ्यांचा डोस repeat करावा. औषधांच्या दुकानात  (i pill) किंवा (UNWANTED 72) या नावाने या गोळ्या मिळतात. या गोळ्या घेतल्यानंतर सहसा एका आठवड्यात मासिक पाळी येते. न आल्यास गर्भधारणा आहे किंवा नाही हे समजण्यासाठी  लघवीची तपासणी आवश्यक आहे.

हेही वाचा >>> समुपदेशन : ‘स्लो फेड’ नातं ‘फास्ट’ करायचं आहे?

समजा या पद्धतीने गोळ्या घेऊन देखील गर्भधारणा राहिल्यास आणि नंतर तो गर्भ वाढवण्याचा निर्णय झाल्यास, त्या गर्भात या गोळ्यांमुळे काही व्यंग निर्माण होऊ शकतील, असं अजून तरी सिद्ध झालेलं नाही. ग्रामीण भागात ‘ आशा ‘ ही आरोग्य कार्यकर्ती असते. तिच्या जवळ या गोळ्या सहज उपलब्ध असतात.

या काही आपत्कालीन परिस्थितीशिवाय ही गोळी अन्य काही प्रसंगी लाभदायक ठरते. उदा. एखादी स्त्री गर्भनिरोधक इंजेक्शन नियमित घेत आहे, पण काही कारणास्तव एखादा डोस घेण्यास उशीर झाला, बसवलेली तांबी निसटून शरीराबाहेर पडली आणि नवी तांबी बसवण्यासाठी डॉक्टरकडे जाणं झालं नाही.   

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांचा पाळणा लांबवण्याकडे कल असतो. चुकून गर्भधारणा राहिली आणि बाळ नको असेल तर गर्भपाताचा मार्ग मोकळा आहे, हे जरी खरं असलं तरी गर्भपाताच्या कटकटीला सामोरं जाण्यापेक्षा गर्भ न राहिलेला बरा ही पॉलिसी केंव्हाही लाभदायक.

काही लोकांमध्ये या गोळीच्या उपलब्धतेमुळे बेफिकीर वृत्ती वाढू शकते. विशेषतः जिथे विवाहपूर्व किंवा विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवले जातात, त्यांना ही गोळी घेण्याचा प्रकार सोपा वाटू शकतो. पाहिजे तेंव्हा ‘ असे ‘ संबंध ठेवा, गोळी घ्या आणि निश्चिन्त व्हा अशी सवय जडली तर त्याचा शरीरावरही गंभीर परिणाम होऊ शकतो.

औषधविक्रेते सांगतात की, या गोळ्यांचा खप महाविद्यालयीन मुलामुलींमध्येच जास्त प्रमाणात दिसतो. हे जर खरं असेल तर या गोळीचा वापर संकटकाळातून बाहेर पडण्यासाठी करायचा असला तरी, विवाहपूर्व आणि विवाहबाह्य संबंधांचं प्रमाण वाढीस लागल्यास अनेक सामाजिक संकटाना तोंड द्यावं लागेल. तेंव्हा जरा जपून.

संकट काळात बाहेर पडण्याच्या मार्गाचा वापर फक्त संकट काळासाठीच राखून ठेवावा, नेहमीच्या जाण्या-येण्यासाठी त्याचा वापर करू नये.

( लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एमएस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.) atnurkarkishore@gmail.com