डॉ. मधुबेन पटेल… पूर्वाश्रमीच्या गांधी… वय वर्ष ८०… आज जरी त्या अमेरीकेत आपल्या मुलींसोबत रहात असल्या तरी ज्या काळी भारतात मुलींना साधी शिक्षणाची परवानगी नव्हती त्याकाळी त्यांनी डॉक्टर होण्याचं स्पप्न उराशी बाळगलं आणि वडिलांच्या निधनानंतर अनेक अडचणींवर मात करत ते स्वप्न मोठ्या कष्टानं पूर्ण केलं आणि त्या त्यांच्या समाजातल्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. डॉक्टरकी करत असतानाच त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व आणि कुटुंबनियोजनाचा प्रचार करण्याचं मोलाचं काम केलं…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘माझे आई-वडील अहमदाबादमधल्या एका छोट्याशा गावात रहात होते. वडील गोपालदास मोहनदास गांधी ( हे आडनाव लागलं ते त्यांच्या व्यवसायामुळे) हे धडाडीवृत्तीचे. हीच वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देईना. स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा ही इच्छा उराशी बाळगूनच त्यांनी गाव सोडून अहमदाबाद शहर गाठलं. तिथे भाड्याने घर घेऊन राहिले. एका प्रोव्हिजनल दुकानात नोकरी पत्करली. अपार मेहनत करून पैसा कमावला. माझ्या जन्मानंतर त्यांनी स्वत:चं हक्काचं घर घेतलं. स्वत:चा व्यवसाय सुरू केला. माझ्या जन्मानंतर त्यांचं भाग्य उजळलं असं ते सगळ्यांना कौतुकानं सांगत. माझे वडील प्रचंड कष्टाळू होतेच, पण त्यांच्याकडे व्यावसायिक द्रष्टेपणही होते. तसेच विचारांनी मात्र पुरोगामी. मुलांबरोबरच मुलींनाही समान न्याय मिळावा हा विचार त्याकाळी बाळगून होते. ते पक्के गांधी विचारांचे… आधुनिक विचारसरणीचे… मला खूप आभिमान वाटतो की ते मी त्यांची मुलगी आहे. कारण त्यांच्या पुढारलेल्या विचारांमुळेच मी डॉक्टर होऊ शकले आणि आजपर्यंतचा माझा जीवनप्रवास सुखेनैव सुरू आहे.’’ सध्या अमेरिकेत ८० व्या वर्षी आयुष्याची संध्याकाळ मुली आणि नातवंडांसोबत आनंदात घालविणाऱ्या पटेल आजी गतस्मृतीत रमतात…

हेही वाचा : ‘स्वलेखन’ ॲपद्वारे दृष्टीहिनांना डिजिटल युगाचे दार खुले करणाऱ्या उमा बडवे

‘‘वडिलांचा ड्रायफ्रुट्सचा व्यवसाय होता. वडिलांनीही आयुष्यात खूप चढउतार पाहिले होते. पण माझ्या जन्मानंतर त्यांच्या व्यवसायाला तेजी आली. स्वत:चं हक्काचं घर, दुकान घेतलं. मुंबई आणि मराठी माणसांशी माझं एकदम जिव्हाळ्याचं नातं. मी सहा महिन्यांची असताना वडील मला पहिल्यांना मुंबईत घेऊन आले. मग व्यवसायानिमित्त वडिलांसोबत येणं होत असे, पण माझी मुंबईशी नाळ सांगणारी ही गोष्ट आजही खूप सुखावून जाते. त्यामुळे अमेरिकेत कोणी मराठी माणसू भेटलं की मला खूप बरं वाटतं हे सांगताना त्यांचा चेहरा आनंदाने चमकून जातो. माझ्या जन्मानंतरच वडिलांचा मुंबईतला व्यवसाय मूळ धरू लागला आणि तो चांगलाच विस्तारलाही… पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. एक दिवस अचानक वडिलांच्या पोटात दुखू लागलं. दसऱ्याच्या निमित्तानं पीठाच्या गिरणीचा नवीन व्यवसाय सुरू केला होता. त्याचं उद्घाटन झालं. घरी आले. पोटात दुखण्याचं निमित्त झालं आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. तेव्हा मी केवळ अकरा वर्षांची होते. माझ्यापेक्षाही आणखी सहा लहान भावंडं… आमच्या कुटुंबारवर दु:खाचा डोंगरच कोसळला. वडिलांचा आजार आम्हा कोणालाच कळला नाही. त्यांचं असं अचानक जाणं माझ्या जिव्हारी लागलं. पण मी वडिलांच्या मत्यूनंतरच ठरवलं की, मी डॉक्टर होणार. …आणि पुढे असा इतिहास घडला की मी माझ्या समाजातली पहिली महिला डॉक्टर झाले. मुलींनी शिकणं म्हणजे कुटुंबावर संकट कोसळावं अशीच परिस्थिती असलेला तो काळ होता. मुलींची लवकर लग्न करून त्यांना आपल्या जबाबदारीतून मुक्त करून द्यावं हीच समाजाची मानसिकता होती. पण या काळातही मी मनाशी पक्कं केलं होतं की काहीही झालं तरी मी शिकणार… डॉक्टर होणार. शिकायचं, डॉक्टर व्हायचं याच विचाराने मी पछाडले होते. कारण मी माझ्या पुरोगामी विचारसरणी असलेल्या वडिलांची मुलगी होते.

अर्थात घरातलं आधुनिक विचारसरणीचं वातावरण यामुळेच हे शक्यही झालं. आमच्या घरी पारंपरिक वातावरण नव्हतंच. वडील आधुनिक विचारांचे होते. आईही त्यांच्याच विचारांच्या मार्गावर चालणारी होती. माझे वडील आमच्या समाजातल्या लोकांपेक्षा खूप पुढचा विचार करणारे होते. आमच्या समाजाचं एक मासिक होतं ‘धरती’नावाचं, त्याचं संपादन ते करत आणि त्यातून समाजाच्या उत्थानासाठी लिखाण करत, त्या संदर्भातले लेख प्रसिद्ध करत. त्या काळी ते मुलींनी शिकलं पाहिले, आई-वडिलांच्या मालमत्तेल मुलींचाही समान वाटा हवा याविषयी कळकळीने लोकांना सांगत. समाजातही त्यांचा दबदबा होता. दर रविवारी समाजाच्या बैठकीत समाजाला पुढे घेऊन जाणाऱ्या आधुनिक विचारांचा प्रसार ते करत. लहानगी मीही त्यांच्यासोबत असे, त्यामुळे माझ्यावरही त्यांच्या विचारांचा प्रभाव पडला आणि तोच वारसा मी पुढे चालवला.

वडिलांच्या जाण्यानं आमचा व्यवसाय ठप्प झाला. पण माझी आईही खमकी होती. पाच पुरूषांच्या तोडीची मेहनत ती एकटी करायची. तिची आत्मशक्ती जबरदस्त होती. कितीही संकट आलं तरी हार मानणं, हताश होणं तिला मान्य नसायचं. त्या काळी नवरा गेल्यावर केशवपन करणं, काळे कपडे घालणं अशी प्रथा होती, पण तिनं आपण यातलं काहीही करणार नाही असं ठामपणे सांगितलं आणि लहान असले तरी मी माझ्या आईच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. समाज काय म्हणेल याचा आम्ही विचार केला नाही. आईच्या पाठीशी मीही भक्कमपणे उभी राहिले. पुढे आईने माझ्या मामाच्या मदतीने वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या जाण्यानं कुटुंब वाऱ्यावर आलं असा कलंक आपल्या मागे लागू नये असं तिला वाटत होतं आणि मोठ्या ताकदीने ती वडिलांचा व्यवसाय सांभाळू लागली. वडील गेल्यानंतर भागीदारांनी आमच्या व्यवसायाबाबत अनेक अफवा पसरवल्या. पण ती डगमगली नाही. त्यावेळीही व्यवसायासाठी लागणारा माल आणायला ती स्वत: शहरात जात असे. आईवडिलांची हीच जिद्द माझ्यात आली, असं त्या सांगतात.

हेही वाचा : लग्नानंतर नाव बदलायचं नव्हतं, पण सासरच्यांनी केला विरोध अन्…

अहमदाबादच्या झेव्हिअर्समध्ये मी शिकले आणि पुढे बी. जे. मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झाले. आमच्या सामाजातली मी पहिली महिला डॉक्टर. त्यावेळेस आमच्या कॉलेजमध्ये विविध समाजातून आलेल्या एकूण १८ मुली होत्या आणि गंमत म्हणजे मुलग्यांची संख्या मुलींपेक्षा कमी होती. पुढे आम्ही सगळी भावंडे खूप शिकलो. माझा लहान भाऊ विजय भ्रष्टाचाराविरोधात ‘मच्छर’ नावाचं मासिक चालवत असे. एका अर्थाने तो वडिलांचा वारसाच चालवत असे.

सुरुवातीला मला लग्नच करायचं नव्हतं. डाॅक्टर होऊन लाेकांची सेवा करायची इतकंच ठरवलं होतं. पण आईनं माझं लग्न करून देण्याचा निर्णय घेतला. पण त्यावेळी मीही आईला स्पष्ट सांगितलं होतं की, मला डॉक्टर मुलाशीच लग्न करायचंय. त्याच्याकडे पैसा असो वा नसो, पण तो माणूस म्हणून उत्तम असेल आणि त्याला सामाजिक भान असेल. आईनेही माझी ही अट मान्य केली. आमच्या ओळखीतल्याच एकांनी जयंतीभाई पटेलांचं स्थळ आणलं. पण मी त्यांनाही सांगितलं की, आधी मी त्यांना स्वत: पाहणार. हे स्थळ पसंत पडलं तरच मी लग्न करणार. मग ठरल्याप्रमाणे मी सायकलवरूनच जयंतीभाई पटेल यांना पाहण्यासाठी गेले. त्यांची आर्थिक स्थिती आमच्या आर्थिक स्थितीपेक्षा फार चांगली नव्हती. पण माणूस म्हणून एकदम उत्तम. ते कुटुंबनियोजनाच्या प्रसाराचं काम करीत. ते छोटीशी डिसपेंसरी चालवत. त्यांना बघितल्यावर आजूबाजूला त्यांच्याविषयी चौकशी केली. ते माणूस म्हणून खूप सज्जन आणि समाजासाठी कर्तव्यभावनेने काम करणारे आहेत हे कळलं आणि मी हे स्थळ पसंत केलं.’’ ज्या काळी मुलींना स्वत:चे कुठलेच निर्णय घेण्याची परवानगी नव्हती, त्याकाळीही पटेल आजी आपल्या विचारांवर ठाम राहिल्या हे त्याकाळी एक धाडसच.

‘‘आम्हा दोघांची प्रॅक्टीस खूप छान सुरू होती. अहमदाबादमध्ये मी तीन क्लिनिक चालवत होते. डॉक्टरकी हे माझ्यासाठी केवळ पेशा नव्हता तर ते एक व्रत होतं. प्रॅक्टीस करताना मुलींच्या शिक्षणाच्या प्रसाराचंही काम करत होते. तसंच कुटुंबनियोगनाचा प्रसारही करत होते. माझं काम पाहून १९८१-८२ साली माझ्या क्लिनिकला ‘बेस्ट क्लिनिक’चं ॲवॉर्ड मिळालं. दरम्यान आमच्या कृष्णा, अदिती आणि जानकी या तीन मुलींचा जन्म झाला. या मुलींना सांभाळून मी डॉक्टरकी केली. या कामी माझ्या मिस्टरांचीही खूप मदत व्हायची. पण आम्हाला तीन मुली म्हणून आम्ही कधी रडत बसलो नाही. उलट आज मी अभिमानाने सांगते की, माझ्या या तीन मुली शंभर मुलग्यांच्या तोडीच्या आहेत. मला ईश्वराने मुलीच दिल्या यासाठी मी त्याचे खूप आभार मानते. कृष्णा डेंटिस्ट आहे. अदिती फिजिओथेरपिस्ट आहे आणि जानकीने प्राणीशास्त्रात एमएस केलं आहे. कृष्णा आणि अदिती अमेरीकेतच स्थायिक झाल्या आहेत आणि जानकी लंडनमध्ये असते.’’

हेही वाचा : Success Story : एक मोठी जबाबदारी अन् गृहकर्जाच्या जोखमीचं मूल्यांकन करण्यासाठी तयार केलं नवं मॉडेल; वाचा हर्षिता यांची प्रेरणादायी कहाणी

आपला भारत ते अमेरीका या प्रवासाविषयी सांगताना पटेल आजी सांगातात की, माझी मुलगी कृष्णा अमेरीकेत डॉक्टरकी करण्यासाठी आली. ती इथेच स्थायिक झाली आणि तिने आम्हालाही इथे आणलं आणि आता आम्ही सगळे इथेच स्थायिक झालो आहोत. सुखी-समाधानी आयुष्य जगत आहोत. आजही त्या भारतातून अमेरीकेत आलेल्या मुलांच्या मदतीसाठी, त्यांच्या अडीअडचणींमध्ये एका भक्कम आजीसारख्या पाठीशी उभ्या राहतात. त्यांना मोलाचे सल्ले देतात.

पटेल आजींचं शिक्षणावर नितांत प्रेम. शिक्षणामुळेच माझं आयुष्य सुखी झालं. मुली शिकल्या तरच त्यांचं भविष्य अधिक उज्ज्वल होईल, त्या स्वत:ची प्रगती करू शकतात असं त्या आवर्जून सांगतात.

मुंबई, मराठी माणसं, मराठी संत, साहित्य यावर त्या भरभरून बोलतात. बोलता बोलता त्यांच्या मुखातून कधी जनाबाई ऐकायला मिळते तर कधी तुकाराम… मराठी संत साहित्य त्यांच्या तोंडून ऐकत रहावंस वाटावं इतक्या सहजपणे अर्थ उलगडून सांगतात. मराठी संत परंपरेविषयी त्या आत्मियतेने बोलतात.

मातृभूमी म्हणून आपलं भारतावर नितांत प्रेम आहे आणि ते कायम राहील हे त्या आवर्जून नमूद करतात. आता आयुष्याच्या संध्याकाळी अमेरीकेतलं जीवनही शांततेत आनंदात घालवत आहेत. आयुष्यात इतके चढउतार अनुभवूनही पटेल आजींच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून समोरच्यालाही जगण्याची उमेद यावी…

lata.dabholkar@expressindia.com