डॉ. रश्मी करंदीकर, पोलीस अधीक्षक, नागरी संरक्षण
पोलीस खात्यात भरती होते, तेव्हा ती व्यक्ती असते अक्षरशः मातीच्या गोळ्यासारखी! त्या व्यक्तीच्या संपर्कात येणारा पहिला वरिष्ठ अधिकारी तिला ठाकून ठोकून ‘घडवण्याची’ प्रक्रिया सुरू करतो, तेव्हाच त्या मातीच्या गोळ्याला सुबक आकार प्राप्त होतो. त्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी अर्चना त्यागी मॅडमसारखे कर्तव्यतत्पर असतील तर? प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून त्यांच्या हाताखाली मी रुजू झाले आणि माझा उमेदवारीचा काळ कसा असेल ते लगेच माझ्या लक्षात आलं !
…त्याचं असं झालं, रत्नागिरीत मी प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून पाय टाकताच, मोजून अर्ध्या तासात मला ड्युटीवर हजर राहण्याची ऑर्डर अर्चना त्यागी मॅडम यांनी दिली. दिवसभराचा प्रवासाचा शीण, थकलेलं शरीर, नवीन वातावरण, अस्वस्थ मन… छे! पण हे कौतुक पुरवणारं मुळी क्षेत्रच नाही! त्यामुळे पोलीस ग्राऊंडवर कामावर हजर झाले. मॅडमना कडक सॅल्यूट ठोकला आणि त्यांच्या सूचनेनुसार लागले कामाला! विशेष म्हणजे रात्री १ वाजेपर्यंत त्या स्वतः आमच्यासोबत काम करत होत्या. वरिष्ठांनी केवळ ऑर्डर न देता, आपल्या सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून कसं काम करायचं, हा धडा त्यागी मॅडमनी असा पहिल्याच दिवशी माझ्याकडून गिरवून घेतला.
पोलीस खात्यात काम करताना अंगात बेडरपणा असायलाच हवा. भित्र्या व घाबरट माणसांसाठी हे मुळी क्षेत्रच नाही. त्यात मी मध्यमवर्गीय मराठमोळ्या घरातून आलेली तरुण मुलगी! पण त्यागी मॅडमनी, मी वयाने लहान आहे, एक स्त्री आहे म्हणून कधीही कामात सवलत दिली नाही. ड्युटी फर्स्ट! एकदा काय झालं, रत्नागिरीत पाच जणांच्या खुनांची एक केस आली. हे खून ज्या घरात झाले, ते घर होतं टेकडीवर! एकांतात! खून होऊन पाच-सहा दिवस उलटले होते. त्यामुळे प्रेतं कुजलेली! त्यांत किडे पडलेले! घरभर दुर्गंधी पसरलेली! वास्तविक एखाद्या पुरुष अधिकाऱ्यावर या पंचनाम्याचं काम त्या सोपवू शकल्या असत्या! पण तसं न करता मॅडमनी आदेश दिला, की या प्रेतांच्या पंचनाम्याचं काम रश्मीच करणार! तोपर्यंत साधी मारामारी न पाहिलेल्या माझ्यासाठी हा भलताच धाडसी, पण मन टणक व घट्ट करणारा अनुभव होता; पण त्यामुळेच पुढे अशा अनेक धक्कादायक प्रसंगांना मी सामोरी गेले, अतिशय धीटपणे!
एकदा एका प्रकरणामध्ये एका स्त्रीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती; पण तिच्या गळ्यावरच्या खुणा अस्पष्ट होत्या. मी माझ्या पुस्तकी ज्ञानानुसार, पोलीस इन्स्पेक्टरच्या मताला दुजोरा दिला; पण मॅडमची नजर अनुभवी होती. त्यांनी रात्री १२ वाजता मला शवागरात जाऊन पोस्टमार्टमच्या वेळी हजर राहण्याचा आदेश दिला. शेवटी मृत्यूचं नेमकं कारण तपासलं, तेव्हा त्या स्त्रीचा गळा दाबून खून झाल्याचं सत्य समोर आलं. थोडक्यात काय? तर संशयास्पद मृत्यू ही आत्महत्या आहे की खून हे पोलीस अधिकाऱ्याने स्वतः तपासावं हा धडा त्यांना मला शिकवायचा होता. मात्र हे शिकवताना त्यागी मॅडमनी हीसुद्धा काळजी घेतली की, एवढी विदारक दृश्यं प्रथमच पाहिल्यानंतर, ही तरुण अधिकारी कदाचित जेवू शकणार नाही. तिची अन्नावरची वासना उडेल. तसं होऊ नये म्हणून खास स्वतःच्या घरी बोलावून त्यांनी मला प्रेमाने उत्तराखंड स्टाइलचे छोले पुलावही खाऊ घातला.
दिवसभर कर्तव्यात जराही कसूर न करू देता, अथक काम करायला लावलं, तरी आपल्या हाताखालची ही तरुण अधिकारी कुटुंबापासून दूर एकटी राहते, तिच्या आईचं नुकतंच निधन झाल्यामुळे मनातून उदास असते, हे अचूक ओळखून त्यागी मॅडम प्रत्येक सण, होळी असो की दिवाळी मला त्यांच्यासोबत साजरा करायला बोलवत.
ठाणे ग्रामीण विभागात मी डीवायएसपी म्हणून रुजू झाले, तेव्हा मी तिथली वयाने सर्वात लहान असलेली अधिकारी होते. कर्तव्य बजावताना हे ‘लहान’ असणं आड येत नसे! मात्र मीटिंगच्या वेळी लंचचा मेन्यू ठरवताना मला हवे तेच पदार्थ नक्की केले जात. एका मीटिंगच्या वेळी मी पुरणपोळी आणि कटाची आमटी असा मेन्यू सांगितला. लंचच्या सुमारास नेमकी दंगलीची वर्दी आली. झालं! ठाणे ग्रामीणच्या अधीक्षक म्हणून त्यागी मॅडमनी मला सक्त ऑर्डर दिली, ‘ताबडतोब तिथे जा आणि दंगल आटोक्यात आण!’ मी दिवसभर तिथे बंदोबस्त करून दंगल आटोक्यात आणली. थकूनभागून संध्याकाळी रूमवर परतले तर माझ्या डायनिंग टेबलवर चक्क पुरणपोळी, कटाच्या आमटीसह संपूर्ण जेवणाचा डबा! आपली कनिष्ठ अधिकारी न जेवता ड्युटीवर गेलीय. दिवसभर उपाशीपोटी काम करतेय. याची नेमकी जाणीव ठेवणारे खरंच असे किती वरिष्ठ असतील बरं?
लॉकडाऊनच्या काळात कार्यालयाच्या आजूबाजूची हॉटेल्स बंद होती. काही विशेष केसेससाठी माझा स्टाफ रात्री उशिरापर्यंत माझ्यासोबत काम करत असे. त्यांनी उपाशी राहू नये यासाठी मला जे जमेल ते जेवण मी घरून करून आणत असे व आम्ही एकत्र जेवत असू. स्टाफला याचं कौतुक वाटे! पण संस्कारांची दीपमाळ अशीच तर तेवत असते ना!
माझ्या नावापुढची ‘डॉक्टर’ ही डिग्रीसुद्धा अर्चना त्यागी मॅडममुळेच लागली. ठाणे वाहतूक विभागात पोस्टिंग झाल्यावर त्यांनी मला प्रेमाने समजावलं, ‘‘रश्मी, तू या संधीचं सोनं कर आणि तुझं अर्धवट राहिलेलं पीएचडीचं संशोधन पूर्ण कर!’’ खरंच! अर्चना त्यागी मॅडमसारखे वरिष्ठ हे केवळ आपले अधिकारीच नसतात. तर वेळेला आपल्या आयुष्याला आकार देणारे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईडसुद्धा बनून जातात!