ऐतिहासिक वारसा जतन करणे ही सोपी प्रक्रिया नाही. वैज्ञानिक पद्धतीने या वारसा जतनाची प्रक्रिया सुरू असताना त्याचा परिणाम ती प्रक्रिया करणाऱ्यावर देखील होतो. त्यामुळेच की काय हे काम करणारी मंडळी फारच थोडी. त्यातही हे कार्य करणाऱ्या महिला तर जवळजवळ नाहीतच. मात्र डॉ. लीना रामकृष्णन यांनी हे आव्हान स्वीकारलं. ऐतिहासिक वारसा जतन, वन्यजीवांच्या जतनाची प्रक्रिया पार पाडणाऱ्या त्या कदाचित पहिल्या महिला आहेत. त्यांच्या कार्याचा झेंडा भारतातच नव्हे तर सातासमुद्रापार त्यांनी रोवला आहे.
ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा जतनच नाही तर मृत वन्यजीवांमध्ये पेंढा भरून त्यांना अप्रत्यक्षपणे जिवंत स्वरूप देण्याचं काम गेल्या दोन दशकांपासून डॉ. लीना रामकृष्णन करत आहेत. शास्त्रोक्त आणि तंत्रशुद्ध पद्धतीनं त्यांनी केलेल्या या कामामुळे अनेक वास्तू, शिल्प यांना नवसंजीवनी मिळाली आहे.
भारताला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. परंतु हा वारसा जतन करण्याची वृत्ती भारतीयांमध्ये फारशी दिसत नाही. या वारशाचा फक्त अभिमान बाळगणं एवढंच आपण करतो. त्याच्या जतनासाठी फारसे कष्ट घेत नाही. त्यामुळे अनेकदा भीती वाटते की पुढच्या पिढीसाठी हा वारसा राखू की नाही. पण डॉ. लीना यांचे काम पाहिले की एक आशेचा किरण दिसतो.
लखनऊ येथे केंद्र सरकारची एकमेव संस्था ‘राष्ट्रीय सांस्कृतिक संपदा संरक्षण’ (एनआरएलसी) आहे. या संस्थेपर्यंतचा त्यांचा प्रवास सहज नव्हता. त्यांनी ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा’तून मास्टर्स इन फाईन आर्ट (एमएफए)ची पदव्युत्तर पदवी घेतली. त्यावेळी पुरातत्त्वशास्त्र वा आर्किओलॉजी हा विषय अभ्यासाला होता. या विषयानं त्यांना चांगलीच ओढ लावली. त्यातला मोहोंजोदडो, हडप्पा संस्कृतीचा उल्लेख लीना यांच्या मनाला स्पर्शून गेला. पुरातन संस्कृती कशी असेल, या संस्कृतीत वापरल्या गेलेल्या वस्तू कशा असतील, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात रूंजी घालू लागले. या गोष्टी समजून घेण्यासाठी त्या विषयाच्या मुळाशी जाणं आवश्यक होतं आणि म्हणूनच त्यांनी प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्रात पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केला. एवढ्यावरच न थांबता मूर्तिशास्त्र, मानववंशशास्त्र, वस्तुसंग्रहालयशास्त्र या विषयांचाही अभ्यास केला. पुढे त्यांना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारितील राष्ट्रीय सांस्कृतिक संपदा संरक्षण संस्थेची (एनआरएलसी-लखनऊ) फेलोशिप मिळाली. येथून सुरू झालेल्या त्यांच्या प्रवासानं मग कुठे थांबाच घेतला नाही.
‘एनआरएलसी’नं त्यांच्यावर पहिलीच मोठी जबाबदारी सोपवली. महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील मगन संग्रहालयात महात्मा गांधी यांच्या नियमित वापरातील वस्तू आहेत. त्यांची शाल, काठी, चष्मा, ताम्रपत्र असं बरंच काही. संग्रहालयात त्यांची आठवण जतन करून ठेवणं इथपर्यंत ठीक, पण त्याच्या संवर्धनाच्या अर्थानं सुरक्षिततेचं काय? त्यांची शाल हातात घेतली तेव्हा ती गळून पडेल, अशी त्या शालीची अवस्था होती. ती जीर्ण झालेली आणि कीड लागलेली शाल संवर्धनासाठी त्यांच्या हातात पडली तेव्हा राष्ट्रपित्याच्या आठवणीही आपल्याला जपता आल्या नाहीत, या भावनेनं त्यांचे डोळे पाणावले. एवढी महत्त्वाची जबाबदारी कशी पार पाडायची ही भीतीही मनात होती. जीर्ण झालेल्या या वस्तूंना पुन्हा ‘जिवंत’ करायचं होतं. एका ध्येयानं त्यांनी कामाला सुरुवात केली. शास्त्रोक्त व तंत्रशुद्ध प्रक्रियेतून हा अनमोल ठेवा पूर्वस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशही आलं. गांधीजींची काठी, त्यांचा चष्मा पुढच्या अनेक पिढ्या पाहू शकतील अशा रीतीनं त्यांचं सवर्धन केलं. या वस्तू अक्षरश: ‘जिवंत’ केलं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. या कामात पहिली परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर साताऱ्याचे ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय’,औंध येथील कलासंग्रहालयातील ऐतिहासिक वारसा- जो येत्या काही वर्षांत कदाचित कायमचा नाहीसा झाला असता, तो डॉ. लीना रामकृष्णन यांनी मूळ रुपात आणला. मात्र, त्यांच्यापुढचं आव्हान संपलं नव्हतं. ज्या शहरात त्या वाढल्या त्या नागपूर शहरानंच त्यांची परीक्षा घेतली. राज्याच्या या उपराजधानीत ब्रिटिशकालीन मध्यवर्ती संग्रहालय आहे. (‘अजब बंगला’ या नावानं हे संग्रहालय ओळखलं जातं) मध्यभारतातील या एकमेव संग्रहालयात ब्रिटिश राज्यकर्त्यांनी त्यांच्या काळात मोठमोठी दगडी शिल्पं आणि वस्तू आणल्या होत्या. इंग्रज गेले आणि या संग्रहालयाची वाताहत सुरू झाली. ती आजतागायत सुरू आहे. गर्भवती महिलेची नऊ महिन्यांची अवस्था मांडणारं शिल्प पाहण्यासाठी अनेक ठिकाणांहून लोक येत. परंतु जतनाअभावी हा वारसा नाहीसा झाला. एवढेच काय, वारसा जतनासाठी याठिकाणी असणारी प्रयोगशाळाही बंद पडली. डॉ. लीना रामकृष्णन यांना या संग्रहालयातील वस्तूंच्या जतनाची जबाबदारी सोपवली तेव्हा एका अडगळीच्या खोलीतून त्यांना काम सुरू करावे लागले. प्रयोगशाळा असणारी आणि अडगळीचे स्वरूप प्राप्त झालेली खोली स्वच्छ करण्यापासून त्यांच्या कामाला सुरुवात झाली. प्रयोगशाळा नाही, वस्तूंचे जतनकार्य करावे अशी जागा नाही.
अशास्थितीत त्यांनी कामाला सुरुवात केली. संग्रहालयाच्या वरच्या मजल्यावर एक अडगळीची खोली होती. ती खोली स्वच्छ करून प्रयोगशाळा पुन्हा सुरू केली. संवर्धनप्रक्रिया पार पाडताना त्याला विशिष्ट तापमानाची गरज असते, नाही तर प्रक्रियेसाठी लागणारी रासायनिक द्रव्ये आणि इतर साहित्य खराब होऊन संवर्धन कार्यात अडथळे येतात. श्वासही घ्यायला कठीण होईल अशा या खोलीचं रूपांतर संवर्धन प्रयोगशाळेत केलं. त्यासाठी अनेक वर्षे लागली. ही खोली अडगळीत असल्याने त्यात प्रकाश नाही, वारा नाही. उन्हाळ्यात कुलर लावावा तर त्याचा संवर्धन प्रक्रियेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता होती. अशावेळी घामाच्या धारा लागत, पण तरीही त्यांनी हाती घेतलेलं काम सुरूच ठेवलं. एक महिला वस्तूजतनाचं काम करत आहे म्हटल्यावर त्यांच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांनी आपलं काम थांबवलं नाही. या संग्रहालयात इतिहासाची गाथा सांगणाऱ्या मोडीलिपिततल्या पोथ्या होत्या. वाळवीमुळे त्यांची पाने गळून पडलेली. हातातही घेता येणार नाही इतकी जीर्ण झाली होती, त्या पोथ्यांना त्यांनी नवसंजीवनी दिली. अजिंठा आणि वेरुळच्या लेण्या पाहायला जगभरातील पर्यटक भारतात येतात. या लेण्यांच्या दुर्मीळ चित्रकृती मोजक्याच शिल्लक आहेत. आजवर जिथेजिथे या चित्रकृती ठेवल्या, त्या त्या ठिकाणी त्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या असा इतिहास आहे. महाराष्ट्रातील अजिंठा तसेच मध्य प्रदेशातील बाघ लेण्यांमधील नऊ दुर्मीळ चित्रकृती नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात आहेत. ऊन, पाऊस, वाऱ्याचा परिणाम झाल्यानं त्या ७५ टक्के जीर्ण झाल्या डॉ. लीना यांनी त्यांच्या जतनाचे काम हाती घेतले आणि त्यांना पूर्वस्थितीत आणण्याचे प्रयत्न केले. ब्रिटिशांनी त्यांच्या काळात आणलेली मोठमोठी शिल्पे संग्रहालय प्रशासनाने संग्रहालयाच्या आवारात ठेवली. कित्येक वर्षे ती तशीच पडून असल्यानं बाह्य वातावरणाचा परिणाम होऊन त्यांचा रंग बदलला. काही शिल्पांवरील प्राचीन लिपी पुसली गेली. ही शिल्प मूळ स्थितीत आणण्यासाठी त्यावर एका विशिष्ट प्रकारच्या कागदाचा वापर करून त्या घासून काढाव्या लागल्या आणि नंतर त्यावर रासायनिक प्रक्रिया करावी लागली. माणूस एक दिवस, दोन दिवस जास्तीत जास्त आठवडाभर हे काम करू शकेल, पण डॉ. लीना यांनी कित्येक महिने या शिल्पांवर काम करून त्या पूर्ववत केल्या. त्यांच्या कामातील अचूकता हीच त्यांची ओळख. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सदरा, त्यांचा कोट, टाईपरायटर या वस्तू जेव्हा त्यांनी पूर्ववत केल्या, तेव्हा डॉ. बाबासाहेबांच्या अनुयायांचे डोळे पाणावले. मात्र, प्रशासन आणि राजकारण्यांच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी केंद्राच्या ‘एनआरएलसी’ या संस्थेचा राजीनामा दिला. सरकारी काम आणि त्यात येणारे अडथळे यातून मुक्त होत स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, वारसा जतनाचं काम सोडलं नाही. देशभरातून त्यांना संवर्धन कार्यासाठी बोलावलं जातं. अगदी राष्ट्रपती भवनही त्यातून सुटलेलं नाही. राष्ट्रपती भवनात अनेक ऐतिहासिक वस्तू आहेत आणि त्यांच्या संवर्धन कार्याची जबाबदारी डॉ. लीना यांनी पार पाडली आहे.
त्यांनी ‘हेरिटेज कन्झर्वेशन सोसायटी’ स्थापन केली आणि त्यांना पहिलं काम वनखात्यानं दिलं. यापूर्वीही त्यांनी वनखात्यातील पेंढा भरलेल्या वन्यप्राण्यांचं जतन व संवर्धनाचं काम केलं होतं. त्यातूनच सोसायटी स्थापन केल्यानंतर वनखात्यानं संवर्धनासाठी त्यांच्याकडे रानगव्याचं शीर दिलं. त्याचा रंग बदलला होता. केस पूर्णपणे चिकटलेले होते. ते रानगव्याचंच शीर आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित व्हावं अशी स्थिती होती. मात्र, त्यावर शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया करत जणू काही जिवंत स्वरूप दिलं, तेव्हा वनखातेही अवाक् झाले. राज्यातील वनखात्याच्या सर्व विभागात धूळ खात पडलेल्या वन्यप्राण्यांच्या ‘ट्राफी’च्या संवर्धनाचा निर्णय त्यांनी घेतला.
हे ही वाचा…आरती नेमाणे… सेवाकार्याला समर्पित!
डॉ. लीना रामकृष्णन कामानिमित्त भारतातच नाही, तर भारताबाहेरही जातात. असंच एकदा सिंगापूरला गेल्या असताना तिथल्या संग्रहालयात त्या गेल्या. संग्रहालय प्रशासनाशी संवाद साधताना डॉ. लीना यांचं वारसा जतन क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान पाहून तेदेखील अचंभित झाले. त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा फायदा करून घेण्याचं ठरवलं आणि त्यांनीही होकार देत वस्तू संवर्धनाचे धडे दिले.
एखादी वस्तू, हस्तलिखित किंवा दस्तावेज वस्तुसंग्रहालयात किंवा कलासंग्रहालयापर्यंत पोहोचले की त्याच्या जतनाची जबाबदारी तिथेच संपते आणि ती आपोआप जतन होते, असाच सर्वसाधारण समज आहे. मात्र, कलाकृती तिच्या निर्मितीच्या क्षणापासूनच वेगवेगळ्या प्रकारच्या परिणामांना सामोरी जात असते. जीर्ण झालेली वस्त्रे शेकडोवेळा धुतलेली असतात. देखण्या कोरीव दगडी शिल्पांचे क्षारांमुळे झीज होते. कलात्मक लाकडी शिल्पांना वातावरणातील आद्रतेमुळे भेगा पडतात. हा ऐतिहासिक, कलात्मक, सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी डॉ. लीना रामकृष्णन यांच्यासारख्या महिला जेव्हा काम म्हणून नाही, तर जबाबदारी म्हणून ते करतात, तेव्हा त्यांना नवसंजीवनी मिळते. rakhi.chavhan@expressindia.com