प्रिय मुला,

आज तुझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून तुझ्या मनात सुरू असलेली घालमेल मला दिसत होती रे.. दहावीत चांगले टक्के मिळतील की नाही, यातच तुझा जीव अडकला होता, पण तुला कसं सांगू बाळा माझा जीव तुझ्यात अडकला होता … आज निकाल लागला आणि तुला तुझ्या अपेक्षेपेक्षा खूप कमी टक्के मिळाले. मला माहीत आहे तू खचला आहेस पण टेन्शन घेऊ नको. जेव्हा तू लहानपणी पडायचा तेव्हा कोणताही आधार न घेता पुन्हा उभा राहायचास. पुन्हा पडायचा पण पुन्हा उभा राहायचास. तुझ्यातील ती जिद्द पाहून तेव्हा वाटले होते की तू आयुष्यात कधीही हार मानणार नाही. आज तुला हेच सांगते की हार मानू नको.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुला वाटते की तू आम्हाला नाराज केले, पण तसे काहीही नाही. आईवडील पोटच्या पोरावर का रागावतील? तुला लहानपणापासून आम्ही बघतोय. तू खूप मेहनती आहेस आणि तुझ्या मेहनतीच्या जोरावर प्रामाणिकपणे तू जे टक्के मिळवले त्यात आम्ही खूप समाधानी आहोत. मी तुला नेहमी म्हणायचे की अभ्यास कर पण याचा हा अर्थ नाही की आज निकाल पाहून मला वाईट वाटेल. अरे प्रत्येक आईवडील मुलांना चांगल्या गोष्टी शिकवत असतात.

बाळ, यश अपयश हा जीवनाचा एक भाग आहे. आज पदरी अपयश आले तर उद्या यश येईल. कठीण काळात खचून जाणे, हा मार्ग नाही तर केलेल्या चुकांमधून शिकणे खूप महत्त्वाचे आहे. तू लहानपणी व्हिडीओ गेम खेळायचा. खूपदा हरायचा पण त्यासाठी तू व्हिडीओ गेम खेळणे बंद केले नाही आणि मग एकदिवस तू त्यात पारंगत झालास आणि त्यानंतर तू प्रत्येकवेळी जिंकू लागला. आयुष्य हे असंच असतं म्हणून तू हार मानू नको.

हेही वाचा : थेट King charlesला भेटली पिंक रिक्षा चालवणारी १८ वर्षीय आरती, जिंकला युकेचा रॉयल ॲवॉर्ड, वाचा प्रेरणादायी गोष्ट

मला माहितेय बाळा लोक काय म्हणतील याचं तू टेन्शन घेतलं आहेस. कमी टक्के मिळाल्यामुळे शेजारी, नातेवाईक काय म्हणतील, याचा विचार करतोयस. पण त्यांचा विचार करू नको बाळा. ते आज बोलतील. उद्या त्यांना तुझे टक्के सुद्धा लक्षात राहणार नाहीत. त्यामुळे आयुष्यात इतर लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही. तुझी आई, तुझे बाबा तुझ्याबरोबर आहेत, त्यामुळे लोकांचं टेन्शन घेऊ नको.

तुला एक सांगू.. मार्क्स कोणीच आयुष्यभर लक्षात ठेवत नाही. तू काय करतोय, कोणत्या क्षेत्रात काम करतोय, पुढे तुला लोक हे विचारतील. त्यामुळे तुला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे, त्यावर लक्ष केंद्रित कर. आज दहावी आहे, पुढे बारावी आहे आणि त्यानंतर आणखी अशा अनेक परिक्षेला तुला सामोरे जावे लागेल. त्यामुळे पुढचा विचार कर. फक्त आज केलेल्या चूका पुन्हा होणार नाही याची काळजी घे.

बाळा तु एकटा नाही. तुझ्याबरोबर कायम आम्ही होतो, आहोत आणि राहू त्यामुळे स्वत:ला एकटं समजू नको. तुला कमी टक्के मिळाले म्हणून दु:ख वाटत असावं पण याचं दु:ख वाटणे साहजिक आहे पण स्वत:ला त्रास करून घेण्यात काहीही अर्थ नाही. त्यापेक्षा यातून शिक आणि पुढे जा. तुला आयुष्यात जे करायचं आहे त्यासाठी आम्ही नेहमी तुला सहकार्य करू. तुला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे, त्यासाठी आम्ही तुझ्या नेहमी पाठीशी आहोत.

तुझी प्रिय आई

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emotional heart touching letter from mother to her son who passed 10 th ssc exam with less marks motivating letter maharashtra 10th ssc results 2024 declared chdc ndj