गेल्या सहा वर्षांच्या काळात कामगार क्षेत्रात तसेच वैद्यकीय, हॉटेल, आयटी इत्यादी ‘ब्लू अॅण्ड ग्रे कॉलर’ क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये महिला कामगारांच्या सहभागात केवळ एका टक्क्याने वाढ झाल्याचे अभ्यासांती समोर आले आहे. फ्रंटलाइन वर्कफोर्स मॅनेजमेंट, बेटरप्लेस यांनी सुमारे एका लाखाहून अधिक व्यक्तींच्या केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अभ्यासात असेही दिसून आले आहे की, २०१७ साली देशामधे याच क्षेत्रातील नोकऱ्यांमधे महिलांची टक्केवारी ११.९६ होती तर डिसेंबर २०२२ पर्यंत ती वाढून १३.२ टक्के एवढी झाली आहे.
आणखी वाचा : ‘गंगा भागिरथी’ म्हणत २१ व्या शतकातील महिलांना पुन्हा पुरातन काळात नेण्याचा प्रयत्न का?
कोविड महासाथीच्या काळामधे तर ‘ब्लू अॅण्ड ग्रे कॉलर’ श्रेणीतील नोकऱ्यांमध्ये स्त्रियांचा सहभाग अजूनच कमी झाला होता. ह्या अभ्यास अहवालानुसार २०२० सालापर्यंत ६.३४ टक्क्यांपर्यंत महिला नोकरदारांचा सहभाग घसरून चित्र काहीसे निराशाजनक दिसत होते. कोविड महासाथीच्या लाटेमध्ये कामगारवर्गात घट झाल्याचा विशेष परिणाम महिला कामगारांबाबत दिसून आला. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी हाती असलेल्या नोकऱ्या सोडणाऱ्यांमध्ये त्या आघाडीवर होत्या, असेही अहवाल नोंदवतो. गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय महिलांचा कामातील सहभाग ११ ते १३ टक्क्यांदरम्यान वाढला आहे. उपरोक्त उद्योगांच्या श्रेणीमधे अधिकाधिक महिलांना रोजगार मिळू लागल्याने स्थिती पूर्वपदावर आल्याचे अभ्यासामध्ये म्हटले गेले असले तरीही महासाथीचा परिणाम उद्योगांवर तसंच समाजावर नक्कीच खोलवर झालेला आहे. कोविडपूर्व काळाच्या तुलनेत अभ्यास अहवालात दाखवलेली संख्यावाढ ही अगदीच जुजबी आहे.
आणखी वाचा : नातेसंबंध : लहान बहीण वाईट संगतीत फसते तेव्हा…
या अहवालात कर्मचाऱ्यांमध्ये महिलांच्या अल्प सहभागाविषयी नमूद केलेली कारणे सामाजिक अडथळ्यांकडेच निर्देश करतात असे नाही तर महिलांच्या वाटेतले असे अडसर दूर करण्यात, बदल करण्यात अपयशी ठरलेले सरकार आणि पुरेशा उपाययोजनांचा उद्योग जगतातील अभाव हेदेखील अधोरेखित करतात. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्यामते संथ गतीने होणाऱ्या प्रगतीचे कारण महिलांना पुरेसे पाठबळ न मिळणे, कामासंबंधीची लवचिकता नसणे, लहान मुलं तसंच ज्येष्ठांची काळजी घेण्याबद्दलच्या सुविधेचा अभाव, कारखाने राहत्या ठिकाणापासून दूर असणे आणि तिथपर्यंत पोहोचण्यातील आव्हाने, कामाच्या क्षेत्रात पायाभूत सुविधांचा अभाव, याचबरोबर सद्यस्थितीतील सांस्कृतिक पूर्वग्रह – पारंपरिक विचारधारा ह्या सगळ्याचा एकसंध परिणाम कामावर आणि समाजावर होत असल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे.
आणखी वाचा : टोमॅटोसारखी त्वचा हवी? मग ‘हे’ कराच!
अहवालात पुढे म्हटले आहे, की महिलांचा अल्प सहभाग हा पुरवठा आणि मागणी अशा दोन्ही बाजूंच्या अडचणींचा एक घटक आहे. पुरवठ्याच्याबाबतीत म्हणायचे तर तिथे कामाच्या तासांबद्दलच्या लवचिकतेचा अभाव आणि कामाचे स्वरूप महिलांसाठी अडथळा ठरते आहे. नोकरी करणाऱ्या बहुतांश आघाडीच्या महिलांना दुहेरी भूमिका करावी लागते. कौटुंबिक जबाबदाऱ्यांबरोबरच व्यावसायिक आव्हाने, दायित्व यांचा समन्वय त्यांना साधावा लागतो. उत्पादन विभागातील असेंब्ली लाइन्स यासारख्या नोकऱ्यांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. खरेतर डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह, कन्स्ट्रक्शन वर्कर्स आदी नोकऱ्यांमध्ये जास्त संधीच्या शक्यता आहेत. तिथे मात्र महिला फारशा जात नाहीत. महिलांचा अल्प सहभाग असण्यामागे मागणी पुरवठ्यातील ही तफावत मुख्य कारण आहे, असे अहवालात नोंदविले आहे.