रजोनिवृत्तीच्या उंबरठ्यावरील काम करणाऱ्या इंग्लंडमधील राष्ट्रीय आरोग्य सेवेतील महिला कर्मचारी यापुढे राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वानुसार घरून काम करू शकणार आहेत. तेथील आरोग्य सेवेच्या प्रमुख अमॅण्डा प्रिचर्ड यांनी प्रथमच रजोनिवृत्तीसंदर्भात राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ती जारी करताना अन्य कर्मचाऱ्यांनी रजोनिवृत्तीला आलेल्या महिलांची अशाही परिस्थितीत प्रगती होण्यासाठी या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण केले पाहिजे, असे म्हटले आहे. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार आयुष्यातल्या या टप्प्यातून जाणाऱ्या महिलांना तुलनेने सहजसोपी, ताण न येणारी कामे दिली जातील आणि त्यांना लवचिक कार्यपद्धतीचाही लाभ मिळेल. अशा महिलांच्या कामकाजामध्ये योग्य त्या तडजोडी, बदल करण्याबाबत एनएचएस मार्गदर्शक तत्त्वांमधे नमूद करण्यात आले आहे. या तडजोडींमध्ये विश्रांतीबाबत लवचिकता, मर्यादित काम किंवा कामाच्या तासांत घट यांचा समावेश असू शकतो.
आणखी वाचा : आपल्या ‘चक दे’ गर्ल्स! भारतीय महिला हॉकी संघाची जागतिक यशाला गवसणी
कोविड महासाथीमुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या प्रश्नांतून, समस्यांतून बहुतांश रूग्णालये अद्यापही रुग्णभेटी, शस्त्रक्रिया यांच्या ताणातील आणि संख्येतील तफावत भरून काढू शकलेल्या नाहीत. याचा परिणाम दहापैकी एकाला नोकरी न मिळण्यावर झालेला आहे. परंतु प्रिट्चर्ड म्हणाल्या की, म्हणूनच रजोनिवृत्तीला आलेल्या महिलांना त्यांच्या गरजेच्या नाजूक काळात अशी लवचिकता मिळाली तर एनएचएसच्या कार्यप्रणालीला भविष्यात पुढे नेण्यास ते साह्यकारी ठरेल. रजोनिवृत्ती ही आरोग्याची समस्या नाही तर तो आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे आणि एनएचएसमध्ये कार्यरत महिलांना या संक्रमणाचा सामना करताना प्रत्यक्ष काम करत राहण्यासाठी तसंच त्यांच्या प्रगतीसाठी भक्कम आधार मिळावा, असं वाटतं. या संक्रमणावस्थेतून जाणाऱ्या महिलांना कामाच्या ठिकाणी कधीही अवघडल्यासारखे वाटू नये किंवा आयुष्यातील या स्वाभाविक रजोनिवृत्तीच्या टप्प्यासंदर्भात बोलताना त्याची लाजही वाटू नये, असंही त्या म्हणाल्या.
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : समलिंगी संबंधांची किळस का वाटावी?
म्हणूनच महिलांकरिता कामाच्या लवचिक तासिका, त्यांच्यामधे अशावेळी वाढणाऱ्या उष्णतेवर (हॉट फ्लशेस) उपाय म्हणून पंख्यांची व्यवस्था, सुटसुटीत गणवेश आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यासारख्या साध्या उपायांचा अवलंब करायला हवा. असे बदल सर्वत्र झालेले मला पहायचे आहेत. रजोनिवृत्तीच्या विविध लक्षणांमध्ये वेदना, सांधेदुखी, निद्रानाश, अचानक शरीराचे तापमान वाढणे आणि गोष्टी विसरणं, चिडचिड होणं अशांसारख्या आरोग्याच्या समस्या दिसून येतात. एनएचएसमधील एकूण कर्मचाऱ्यांपैकी ४५ ते ५४ वयोगटातल्या महिलांचे प्रमाण एक पंचमांश आहे आणि सुमारे दोन लाख ६० हजार महिलांमधे कामाच्या ठिकाणी रजोनिवृत्तीची लक्षणे आढळून आली आहेत.
आणखी वाचा : चॉइस तर आपलाच : भूतकाळातलं अपयश की वर्तमानातलं समाधान?
फॉसेट सोसायटीने केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, दहापैकी एका महिलेला याबाबत अन्य सहकाऱ्यांकडून, नोकरदारांकडून पाठिंबा मिळत नसल्यामुळे कामावरून काढून टाकले जाते. रजोनिवृत्ती मार्गदर्शक आदेश मोहीम गटाचे प्रमुख मेरील फ्रॉस्ट्रप म्हणाले, की कामाच्या लवचिक वेळा देऊनही एखाद्या महिलेला तिची लक्षणे कामासंदर्भातील तिच्या क्षमतांवर परिणाम करत आहेत, असं वाटलं तर एखाद्या गर्भार महिलेला ज्याप्रमाणे तिचे अन्य सहकारी मदत करतील वा मदतीसाठी धावून येतील, त्याप्रमाणेच त्यांनी तिला पाठिंबा द्यावा. म्हणूनच एनएचएसने अशाप्रकारे ही मार्गदर्शक तत्त्वे आखलेली आहेत की कोणत्याही क्षेत्रातल्या कामाच्या ठिकाणी अमलात आणता येऊ शकतील.