रेश्मा भुजबळ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘हातभर दाढी आणि वितभर मिशा’ म्हटल्यावर पुरूषाचीच आकृती डोळ्यांसमोर उभी राहते. मात्र, हे वर्णन एखाद्या स्त्रीचे असेल तर? आश्चर्य वाटले ना! तसे पाहिले तर स्त्रियांच्या ओठांवरची गडद झालेली लव किंवा हनुवटीवर वाढत असणारे केस आणि ते काढून टाकण्यासाठी ब्यूटी पार्लरमध्ये ‘थ्रेडिंग’ करून घेणं, हे नवीन नाहीये. मात्र, तरीही हातभर दाढी… हे वर्णन जरा अतिशयोक्तीच वाटते. मात्र, हे वास्तव आहे. अमेरिकेतील मिशिगन येथील ३८ वर्षांची एरिन हनीकट ही महिला मात्र स्त्रियांमध्ये सर्वांत लांब दाढी आणि मिशा घेऊन वावरतेय आणि त्याची नोंद गिनीस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

एरिनच्या दाढीची लांबी ३० से.मी. इतकी आहे. यापूर्वी गिनिस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या विवियन व्हिलर या ७५ वर्षांच्या स्त्रीच्या दाढीची लांबी २५.५ से.मी. इतकी होती.

आणखी वाचा-आपल्याच प्रेमाला ठार करण्याइतपत तिरस्कार येतो कुठून?

एरिन १३ वर्षांची असतानाच तिला ‘पीसीओएस’चा (पॉलीसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम) त्रास सुरू झाला. तिची नितळ त्वचा बदलत गेली आणि तिच्या चेहऱ्यावरच्या केसांमध्ये वाढ होत गेली. पौंगडावस्थेत असणारी एरिन आपल्या दिसण्याबाबत फारच संवेदनशील होती. त्यामुळे चेहऱ्यावरचे वाढते केस तिला अर्थातच त्रासदायक वाटत होते. त्यामुळे तिनं चेहरा गुळगुळीत असावा यासाठी दिवसातून तीन वेळा शेव्हिंग करण्यास सुरूवात केली. त्याबरोबरीनं वॅक्सिंग आणि हेअर रिमूव्हिंग क्रीमचा वापरही होताच. अर्थात त्याचा परिणाम असा झाला, की तिच्या चेहऱ्यावरील केस अधिकच राठ होत गेले. वय वाढत गेल्यावर मात्र तिने आपला पीसीओएसचा त्रास आणि त्यावरील उपाय स्त्रीरोग तज्ज्ञांच्या साह्याने समजावून घेत त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली.

२०१८ मध्ये एका जीवघेण्या आजारपणात तिला तिचा पाय गमवावा लागला. त्या वेळी सततच्या तणावामुळे तिचा रक्तदाब वाढता राहून डोळ्यांवरही परिणाम व्हायला लागला होता. तिच्या डॉक्टरांनी या सगळ्या त्रासावर तिचे सकारात्मक राहणे किती गरजेचे आहे, हे विषद केल्यावर तिने त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. आज एरिन एकंदरच सगळ्याच बाबतीत स्वत:च्या आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहते. म्हणूनच एवढी दाढी वाढू देण्याचे धाडस ती करू शकली. करोनाकाळात तिने चेहऱ्यावरचे केस न काढण्याचा निर्णय घेतला. करोना काळात मास्क वापरावा लागत असल्याने तिचा निर्णय अमलात आणणे आणखी सोपे गेले आणि नैसर्गिरीत्या तिचे दाढीचे केस वाढत गेले. जेवताना ती दाढीचे केस टी-शर्टमध्ये सरकवते किंवा बांधून ठेवते. इतर वेळी मात्र ते मस्तपैकी तिच्या पोटापर्यंत रुळत असतात!

आणखी वाचा-सत्ता तालिबानची: पारतंत्र्य स्त्रियांचे!

आता तिच्या वाढलेल्या दाढीमुळे तिला अजिबात अवघडलेपण येत नाही. उलट माझी वाढलेली हनुवटी (डबल चिन) दाढीमुळे झाकली जाते, असे एरिन सांगते. एरिन अगदी मोकळेपणाने सर्वत्र वावरते. आपल्याकडे अद्याप कोणी अवहेलनेच्या दृष्टीने पाहिले नसल्याचेही ती आवर्जून सांगते. ”नैसर्गिकरीत्या माझ्या शरीरावर वाढलेल्या केसांमुळे माझे नाव गिनीस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहे, यामुळे छान वाटते. अन्यथा ते नोंद होण्यासाठी मी स्वत: नक्कीच काही करू शकले नसते,” याची प्रांजळ कबुली एरिन देते.

जसे आहे तसे स्वत:ला स्वीकारून आनंदाने आपल्या जोडीदाराबरोबर जीवन जगणारी एरिन सौंदर्य वाढीसाठी वाट्टेल ते करणाऱ्यांसाठी नक्कीच एक वेगळी दिशा दाखवते.

पीसीओएसची लक्षणे आणि कारणे

दर महिन्याला होणारा मासिक पाळीचा स्त्राव अगदी कमी प्रमाणात होणे, महिन्यातून एकापेक्षा अधिक वेळा मासिक स्त्राव होणे किंवा महिन्यातून एकदाही मासिक स्त्राव न होणे. दोन-तीन महिने (किंवा कधीकधी चार-सहा महिने) मासिक पाळी न येणे आणि जेव्हा येईल तेव्हा खूप कमी किंवा खूप जास्त स्त्राव होणे. मासिक पाळीच्या वेळी ओटीपोटामध्ये व कंबरेत होणार्‍या वेदना. किंवा मासिक पाळी येण्याचे वय झाले असूनही एकदाही पाळी न येणे ही ‘पीसीओएस’ची लक्षणे असू शकतात. मासिक चक्र बिघडण्यामागे स्त्री-शरीरामधील संप्रेरकांमध्ये (हार्मोन्समध्ये) झालेली उलटापालट हेच कारण असते.

शरीर स्त्रीचे असूनही पुरुष-संप्रेरक अधिक प्रमाणात स्त्रवणे ही पीसीओएस् मधील मुख्य गोष्ट आहे. या पुरुष-संप्रेरकांच्या परिणामांमुळे मुलींच्या चेहर्‍यावर तारुण्यपिटिका (पिंपल्स) येतात. याशिवाय शरीरावर केस वाढणे हे एक लक्षण दिसते. ज्यामुळे मुलीच्या चेहर्‍यावर मिशीचे किंवा/आणि दाढीचे केस येऊ लागतात. तर कधी याच पुरुष-संप्रेरकांमुळे केस गळायला लागून समोरून (सहसा पुरुषांमध्येच दिसणारे) टक्कल पडत जाते.

lokwoman.online@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Erin honeycutt with a full beard and bushy moustache mrj