शीर्षक वाचून हसू फुटलं असेल, तर हसून घ्या! पण आम्ही फक्त तुम्हाला गेल्या काही काळात जगभर अतिशय लोकप्रिय झालेल्या एका ‘सौंदर्यसोसा’ची ओळख करून देतोय. बहुसंख्य पुरूषांच्या चेहऱ्यावर जशा दाट दाढी-मिशा येतात, तशा निश्चितच स्त्रियांच्या चेहऱ्यावर नसतात. तरीही अनेक स्त्रिया हल्ली दाढी का करू लागल्या आहेत?…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्त्रियांच्या चेहऱ्यावरही काही प्रमाणात केस असतातच हे काही आम्ही सांगायला नको. आपण भुवया कोरून घ्यायला पार्लरमध्ये जातो, तेव्हा तिथे आलेल्या ९९ टक्के स्त्रिया भुवयांबरोबर कपाळ आणि त्याबाजूचा भाग, ओठांच्या वरचा भाग (अप्पर लिप्स!) आणि हनुवटीवरूनही थ्रेडिंग करून घेतातच. या भागात प्रामुख्यानं केसांची लव असते. लव म्हणजे चेहरा आणि अंगावरचे अगदी बारीक बारीक केस. ते ठळकपणे दिसून येत नाहीत, कारण त्यांचा रंग त्वचेच्या रंगाशी मिळताजुळता, फिका असतो. पण ज‌वळून पाहिल्यावर ही लव दिसते. ती सगळ्यांच्याच अंगावर असते आणि शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी निसर्गानं केलेली ती एक स्वत:ची अशी योजना आहे. त्याव्यतिरिक्तही दिसून येतील असे काही काळे केस स्त्रियांच्या चेहऱ्यावर असतात. आधी सांगितल्याप्रमाणे प्रामुख्यानं ओठांच्या वर, हनुवटीवर आणि गालांच्या वर- कानांच्या खालच्या बाजूला हे केस असतात. काही स्त्रियांच्या चेहऱ्यावर ते जास्त आणि लगेच नजरेत येतील असे असतात, तर काहींच्या चेहऱ्यावर ते वेगळे ओळखू येत नाहीत. आता स्त्रियांमध्ये या ठिकाणी रेझर वापरून रीतसर ‘शेव्हिंग’ करण्याची पद्धतही रूढ झाली आहे.

मृत त्वचा निघून जाते

या शेव्हिंगमध्ये नुसते चेहऱ्यावरचे केसच नाही, तर मृत त्वचाही निघून जाते आणि वरचा तेलकटपणा जाऊन चेहरा आणखी गुळगुळीत दिसू लागतो, हे स्त्रियांमध्ये फेस शेव्हिंग लोकप्रिय होण्याचं प्रमुख कारण आहे. शिवाय नीट केल्यास ते थ्रेडिंग वा वॅक्सिंगच्या तुलनेत कमी वेदनादायी आहे.

स्त्रिया दाढी कशी करतात?

  • स्त्रियांची त्वचा पुरुषांपेक्षा थोडी वेगळी- थोडी पातळ, मुलायम असते. त्यामुळे स्त्रियांच्या फेस शेव्हिंगसाठी स्त्रियांसाठीचंच खास ‘फेस शेव्हिंग रेझर’ (डर्माप्लेनिंग रेझर) वापरणं योग्य. त्याच्या ब्लेडचा दर्जा उत्तम हवा. तुम्हाला आपला चेहरा आणि त्वचेच्या पोताचा अंदाज घेऊन ते वापरण्याचा आधी बेताबेतानं सराव करावा लागेल. तुम्ही या बाबतीत अगदीच अनभिज्ञ असाल, तर आधी हे रेझर वापरून पाहिलेल्यांचा प्रत्यक्ष सल्ला जरूर घ्यावा. शेव्हिंग करताना त्वचेला वा तुम्हाला कोणतीही इजा होता कामा नये.
  • पुरूष ज्याप्रमाणे आधी शेव्हिंग क्रीम किंवा फेसाळ साबण लावून दाढी करतात, तसं स्त्रियांच्या फेस शेव्हिंगमध्ये साधारणतः केलं जात नाही. बऱ्याच स्त्रिया कोणतंही शेव्हिंग क्रीम न लावता, केवळ आधी चेहरा स्वच्छ धुवून, टिपून नुसतंच त्यावरून रेझर फिरवतात. याला ‘ड्राय शेव्हिंग’ म्हणतात.
  • पण काही जणींची त्वचा कोरडी असते. त्या ड्राय शेव्हिंगऐवजी सौम्य शेव्हिंग जेल, शेव्हिंग क्रीम वा अगदी मॉइश्चरायझरसुध्दा लावू शकतील आणि त्यावर रेझर वापरणं सोपं जाईल.
  • एका जागी एकदाच स्ट्रोक करणं चांगलं, त्वचा खरवडली जाऊ देऊ नका.
  • रेझरच्या प्रत्येक स्ट्रोकनंतर रेझर पाण्याखाली धरावं, म्हणजे त्यावरचे शेव्ह करून आलेले सूक्ष्म केस धुवून जातील.
  • आयब्रो थ्रेडिंग करून घेताना जशी एका हाताच्या बोटांनी त्वचा दाबून बाजूला ओढून धरतात, तसंच स्त्रिया शेव्हिंग करतानाही करतात. हे शेव्हिंग केसांच्या वाढीच्या दिशेनं केलं जातं.
  • शेव्हिंगनंतर चेहरा पाण्यानं धुवून, टिपून, त्यावर सौम्य मॉइश्चरायझर लावतात.

समस्या कोणत्या?

स्त्रियांचं फेस शेव्हिंग हे पुरुषांच्या शेव्हिंग रेझर्सच्या जाहिरातीत दाखवतात तितकं सोपं नसतं! मुख्य म्हणजे आपल्याला त्याची अजिबात सवय नसते. त्यामुळे कापलं जाऊ शकतं. अतिउत्साहात आयब्रो शेव्हिंग करतानासुद्धा तिथली त्वचा अक्षरशः खरवडली गेल्याची उदाहरणं कमी नाहीत. त्यामुळे फेस शेव्हिंग नीट जमेपर्यंत मोठं धाडस नको. विशेषतः डोळ्यांच्या आसपास जरा जपूनच!

चेहऱ्यावर अनेकदा तारुण्यपिटिका (पिंपल्स), पुरळ, जास्त कोरडे आणि जास्त तेलकट असे त्वचेचे पॅच असू शकतात, तर काही ठिकाणची त्वचा खूप संवेदनशील असते. अशा ठिकाणी शेव्हिंग करताना काळजी घ्यावी लागते, नाहीतर खरचटलं जाऊन ती समस्या त्रासदायक होऊ शकते.

स्त्रियांनी दररोज फेस शेव्हिंग करण्याची गरज नसते आणि ते टाळावंसुद्धा. तरीही फेस थ्रेडिंग वा वॅक्सिंगच्या तुलनेत फेस शेव्हिंग वारंवार- म्हणजे दर आठवड्याला किंवा दर एक-दोन दिवसांनी करायची गरज भासू शकते. त्यामुळे आपण शेव्हिंग आणि त्यानंतर त्वचेला नीट मॉइश्चराईझ करायला, त्वचेची काळजी घ्यायला वेळ देऊ शकणार आहोत का, याचा आधी विचार करायला हवा.

केसांचा टोकदारपणा शेव्हिंगनंतर जातो आणि बोथट झाल्यामुळे ते छोटेसे केस थोडे जाड वा राठ भासू शकतात. मात्र वारंवार शेव्हिंग केल्यामुळे पुढचे केस जाड वा राठच येतील का, याला काही आधार नाही.

तेव्हा तुम्हाला स्वतःच्या ‘शेव्हिंग स्किल्स’बद्दल चांगली खात्री असेल तर फेस शेव्हिंग आजमावून पाहायला काहीच हरकत नसावी!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Everything you need to know about face shaving for women pros and cons nrp