कोणताही लग्नसमारंभ किंवा मोठा सण आला, की सोनंखरेदीचे वेध स्त्रियांना लागतात. हौसेनं सोन्याचा नवा दागिना घ्यावा किंवा निदान मुहूर्तावर सोन्याचं लहान वळं तरी खरेदी करावं, अशी स्त्रियांची भावना असते. कारण त्यांच्या दृष्टीनं त्याचं महत्त्व केवळ सोनं परिधान करणं एवढंच नसतं, ती गुंतवणूक असते. सोन्यात केवळ दागिने, सोन्याची नाणी, सोन्याची वळी खरेदी करणं इतकंच नव्हे, तर विविध प्रकारे गुंतवणूक केली जाते. ‘फिजिकल’ सोन्यातल्या गुंतवणूकीबरोबरच गोल्ड बॉण्डस्, गोल्ड ईटीएफ (गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडस्), गोल्ड म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे लोकप्रिय प्रकार आहेत. मात्र हल्ली ‘डिजिटल गोल्ड’ हा प्रकारसुद्धा अतिशय लोकप्रिय ठरत आहे. अनेक जोडप्यांकडून आणि स्त्रियांकडूनही हा पर्याय नेमका काय आहे, याबाबत उत्सुकता प्रदर्शित केली जाते. त्यामुळे एकंदरीतच सोन्यातली गुंतवणूक आणि सोनंखरेदीचा ‘डिजिटल’ मार्ग या दोन्हींविषयी समजावून सागणं महत्त्वाचं वाटतं.
आणखी वाचा : घटस्फोट म्हणजे रोग नव्हे!
सोन्यातली गुंतवणूक कशी असावी?
सोनं हा गुंतवणुकीच्या अनेक प्रकारांपैकी एक प्रकार आहे. जेव्हा इक्विटीमधल्या, डेट (debt) प्रकारातल्या गुंतवणुकी राजकीय, अर्थशास्त्रीय बदलांमुळे घसरतात, शेअर बाजारामध्ये जेव्हा विविध कारणांमुळे पडझड होते, तेव्हा सोन्याची गुंतवणूक तुम्हाला परतावा देऊ शकते. त्यामुळे तुमच्या संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये सोनं हा एक विशिष्ट प्रकारे परतावा देणारा आणि एका प्रकारे तुमच्या संपूर्ण पोर्टफोलिओला प्रसंगी सावरणारा एक पर्याय असू शकतो.
आणखी वाचा : शरीरधर्माचाही सन्मान हवा! (भाग ४ था)
गेलं एक वर्ष विविध आंतरराष्ट्रीय घडामोडी, वाढती महागाई, कोविड १९ नंतरची पूर्वपदावर येत असलेली अर्थव्यवस्था, या कारणांमुळे अर्थव्यवस्थेची हानी झाली. याचा परिणाम इक्विटी, डेट प्रकारातल्या आणि इतर गुंतवणुकीच्या परतव्यावर झाला. यामध्ये सोन्यानं २०२२ मध्ये अंदाजे १४ टक्के इतका परतावा दिला. हा परतावा इतर गुंतवणुकीपेक्षा जास्त होता. आज भारतीय बाजारात सोनं प्रती तोळा रू. ५० हजारच्या आसपास आहे. सोन्याची मागणी वाढतेच आहे. असं असलं तरी पूर्व परतावा दर लक्षात घेता, आपल्या एकूण पोर्टफोलिओच्या एकूण १० टक्के ते २० टक्के इतका भाग तुम्ही सोन्यासाठी देऊ शकता. सोनंखरेदीचे मार्ग अनेक आहेत, मात्र हल्ली ‘डिजिटल गोल्ड’ या मार्गाविषयी उत्सुकता खूप वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता हा विषय जाणून घेऊ या.
आणखी वाचा : विटाळा वाचूनी उत्पत्तीचे स्थान… (भाग ३ रा)
‘डिजिटल गोल्ड’ म्हणजे काय?
डिजिटल गोल्ड म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं खरेदी केलेलं सोनं. जेव्हा दुकानातून सोनं नाणी, बार आदी रूपांत खरेदी केलं जातं, तेव्हा ते काळजीपूर्वक सांभाळून ठेवावं लागतं. त्यासाठी बँक लॉकरचा वगैरे खर्च वाढतो. तसंच त्याचे दागिने करताना घडणावळ, विकताना त्यात होणारी घट हे महत्त्वाचे मुद्दे ठरतात. ऑनलाईन पद्धतीनं (डिजिटल गोल्ड) सोनं खरेदी करताना हे लागू होत नाही. यात सोनंखरेदी केल्यावर ते सुरक्षित ठिकाणी ठेवलं जातं आणि यात खरेदी करणाऱ्यास जोखीम राहत नाही. हे सोनं २४ कॅरट असतं. डिजिटल सोनं खरेदी केल्यावर तुम्ही ते कधीही विकू शकता. हे सोनं तुम्ही तारण म्हणूनही ठेवू शकता. तुम्ही विक्रीअंती या सोन्याची ‘घरपोच डिलिव्हरी’सुद्धा घेऊ शकता.
आणखी वाचा : ‘ती’ने मासिक पाळीलाच पत्र लिहिले! ( भाग २ )
डिजिटल गोल्ड कसं विकत घेता येतं?
हल्ली हे सोनं विकत घेण्यासाठी विविध प्लॅटफॉर्म आहेत. तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं बँक खात्यातून या प्लॅटफॉर्मद्वारे सोनं विकत घेऊ शकता. यासाठी ॲप्स उपलब्ध आहेत. अशा प्रकारे डिजिटल गोल्ड चुटकीसरशी विकत घेता येतं. मात्र ते विकत घेताना पुढील महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या-
१. अशा प्रकारे सोनं विकत घेणं हे अधिकृत अथवा कायद्यानं संरक्षित नाही. ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ आणि भारतीय अर्थबाजारावर नियंत्रण असणारी संस्था म्हणजेच ‘सेबी’ (सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) याला मान्यता देत नाही आणि अशा प्रकारचे सोनं त्यांच्या अखत्यारीत येत नाही.
२. डिजिटल गोल्ड साठवण कालावधी हा मर्यादित असू शकतो.
३. यात विविध प्रकारचे चार्जेस लागू शकतात.
त्यामुळे डिजिटल गोल्ड व्यवहाराला सोपं असलं तरी ते विचारपूर्वक खरेदी करा आणि जोखीम पडताळा.
(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व सर्टिफाईड फायनान्शियल प्लानर आहेत.)
priya199@gmail.com