चारुशीला कुलकर्णी
‘‘माझं मी पाहून घेईल. कुणाला कशाला हव्या चौकशा… माझं आयुष्य आहे… मी माझ्या पध्दतीनं जगेन,’’ असं ठणकावून सांगताना रश्मीनं हातातील फ्लॉवर पॉट दाणकन् जमीनीवर टाकला. जमिनीवरील त्या फ्लॉवरपॉटसारखीच तिच्या आयुष्याची आणि संसाराची अवस्था झाली होती. चारचौघांसारखा सुरळीत सुरू असलेला रश्मीचा संसार ती आणि तिचा नवरा समीर- दोघांच्या हेकेखोरपणामुळे फार काळ टिकला नाही. आपलं पटत नाही असं लक्षात आल्यावर परतीचे दोर कापत दोघांनीही मागचा पुढचा कुठलाही विचार न करता घटस्फोटाच्या कागदपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यांचा निर्णय पक्का असला तरी न्यायालयानं या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी दिला. संसाराच्या वर्षाची गोळाबेरीज करण्यापेक्षा पुढचे सहा महिने काढायचे कसे? हा प्रश्न रश्मीला सतावत होता.
‘नवऱ्यानं सोडलेली’ हा शिक्का माथी बसल्यानं रश्मी अधिकच आक्रमक झाली होती. तिचा इगो दुखावला होता. आता आपल्याला हवं तसं वागण्याचं-बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालं, अशाच विचारात ती वावरत होती. तिनं वेगळं होताच नवऱ्याकडे पोटगीची मागणी करत नोकरी शोधण्यास सुरुवात केली. आपल्या मुलीचं नवऱ्याशी पटत नाही, तिला त्यानं किंवा तिनं त्याला सोडलं यापेक्षा हेकेखोरपणाने दोघांनी आपला संसार मोडला हा सल रश्मीच्या घरच्यांना होता. कमी अधिक फरकानं समीरच्या आई-वडिलांनाही हीच काळजी होती. या दोघांच्या घटस्फोटापेक्षाही त्यामुळे समाजात होणारी बदनामी, पुढे दोघांच्या भावडांचं लग्न असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या समोर होते. रश्मी मात्र या सर्वांपासून कोसो दूर होती. ‘मी म्हणेन तेच खरं’ या अविर्भावात असल्यानं तिला समजावण्याच्या भानगडीतही कोणी पडत नव्हतं. घरातली कामं आटोपली की हातात मोबाईल घेऊन व्हॉट्स ॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम असा समाजमाध्यमांवरील तिचा वावर वाढला होता. वेगवेगळया समुहातील मित्रांशी ओळखी वाढत गेल्या. समीर आपल्या सोबत नाही ही उणिव ती एक प्रकारे भरून काढण्याचा प्रयत्न करत होती. समीर आपल्याला नाकारतो आहे, आता आपल्याला त्याची गरजच नाही असं स्वत:ला समजावत ती पुरूषांशी मैत्री करत राहिली. अशाच प्रयत्नात फेसबुकवर तिला अजय भेटला. नोकरी निमित्त दिल्लीला असलेला अजय मूळ नाशिकचा. हाच धागा पकडत रश्मी आणि अजयची मैत्री वाढण्यास सुरुवात झाली. मैत्रीचं रुपांतर अवघ्या काही दिवसात प्रेमात झालं. दोघांमध्ये सातत्यानं समाजमाध्यमांवर संवाद सुरू असताना खातरजमा म्हणून व्हिडिओ कॉलही करण्यात आले. रश्मीनं आपल्या विस्कटलेल्या संसाराविषयी सांगताच अजयने ‘समीरला सोडून दे. माझ्या जवळ ये, आपण सुखात राहू,’ असं सांगितलं. त्याच्या बोलण्यातून रश्मीला हवा असलेला मानसिक आधार मिळाला. अजयसोबत सुखी संसाराची स्वप्न ती पाहू लागली. या काळात दोघं वेगवेगळ्या कारणानं भेटत राहिले आणि अजय रश्मीच्या जास्तच जवळ आला. त्या दोघांचे समीप क्षण त्यानं तिच्याही नकळत मोबाइलमध्ये कैद केले. त्यांच्यातील अश्लील संभाषणाचे स्क्रीन शॉट काढत तो ते सेव्ह करू लागला. हे सारं रश्मीच्या नकळत सुरू होतं.
दरम्यान, समीरच्या घरच्यांनी आणि रश्मीच्या आई-वडिलांनी पुढाकार घेत दोघांचं पॅचअप करण्याचा प्रयत्न केला. समीरनंही यासाठी पुढाकार घेतल्यानं रश्मीचा इगो सुखावला. रश्मी आणि समीरच्या गाठी भेटी झाल्या. न्यायालयाकडूनही समपुदेशन झालं. याचा सकारात्मक परिणाम रश्मीवर झाला. ती पुन्हा झालं गेलं विसरून समीरसोबत संसार करायला तयार झाली. याची पूर्वकल्पना हळूहळू तिनं अजयलाही दिली. पण अजयला हे मान्य झालं नाही. ‘तू माझ्याकडे ये माझ्या सोबत राहा’ हे तिला तो वारंवार सांगत राहिला.
न्यायालयानं समीर आणि रश्मीचा घटस्फोटाचा अर्ज फेटाळत दोघांनी पुन्हा एकत्र संसार करा असा सल्ला दिला. त्यानुसार रश्मी पुन्हा सासरी जाण्याची तयारी करत असताना अजयचा कॉल आला. ‘मला समीरसोबत राहायचं आहे, तो माझा नवरा आहे असं तिनं निक्षून सांगितल्यावर अजयनं तिला धमकी दिली. अजयच्या मनात नेमकं काय आहे याची कल्पना नसल्यानं रश्मी त्याला खूप काही बोलली. या अपमानाचा बदला घेण्यासाठी रश्मी आणि त्याचे खास क्षण, त्याच्या चित्रफिती, अश्लील संभाषण त्यानं समीरला व्हॉट्स ॲप केला. ‘तुझ्या गैरहजेरीत तुझी बायको काय रंग उधळत होती हे तू बघ’ असं म्हणत त्यानं समीरला डिवचलंही. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं हे सारं समाजमाध्यमांवर अपलोडही केलं. रश्मीच्या या वागण्यानं दुखावलेल्या समीरनं तिच्या सोबत न राहण्याचा निर्णय न्यायालया समोर व्यक्त करत तिच्यावर व्याभिचाराचे आरोप केले. पाहता पाहता रश्मीचं सुखी संसाराचं स्वप्न तिच्या डोळ्यांदेखत भंगलं. यात नेमकी चूक कोणाची? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिला.