EY Employee Anna Sebastian Perayil Death : अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) इंडिया कंपनीतील सनदी लेखाकार (सीए) ॲना सेबास्टियन पेरायिल (वय २६) या तरुणीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. ॲनाच्या मृत्यूनंतर तिच्या आईने कंपनीच्या सीईओला पत्र लिहून तिच्या मृत्यूप्रकरणी कंपनीवर ताशेरे ओढले होते. अनियमित कामांच्या वेळामुळे ॲनाच्या शरीरावर परिणाम झाल्याचं आईचं म्हणणं आहे. परंतु, कामाच्या अतिताणाचा परिणाम झालेली ॲना ही एकमेव मुलगी नाही. भारतभारतील असंख्य महिला कार्यालयीन कामात इतक्या गुंतून गेल्या आहेत की आठवड्यातील सर्वाधिक काळ त्या ऑफिसच्या कामातच असतात. परिणामी त्यांच्या शररीरावर आणि मनावर परिणाम होतो.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO)कडे असलेल्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञान (IT), कम्युनिकेशन आणि तांत्रिक व्यवसाय यांसारख्या क्षेत्रातील महिला सर्वाधिक वेळ काम करतात. IT आणि महिला पत्रकार दर आठवड्याला सरासरी ५६.५ तास काम करतात. तर पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्यात दिवसातून ११ तासांपेक्षा जास्त किंवा सहा दिवसांच्या आठवड्यात दररोज ९ तासांपेक्षा जास्त काम महिला करतात. त्याचप्रमाणे, ॲनासारख्या व्यावसायिक आणि तांत्रिक नोकऱ्यांमधील महिला आठवड्यातून ५३.२ तास काम करतात. बिझनेस स्टॅण्डर्डने यासंदर्भातील वृत्त दिलंय.
तरुण महिला नोकरदार वर्गाची स्थिती काय?
तरुण महिला नोकरदार वर्गाची परिस्थिती याहून वाईट आहे. १५ ते २४ वयोगटातील आयटी आणि पत्रकार महिला साप्ताहिक सरासरी ५७ तास काम करतात, तर तांत्रिक व्यवसायात ५५ तास काम करतात. जागतिक स्तरावर भारतीय महिला सर्वाधिक कार्यालयीन काम करतात, हेच यातून सिद्ध होतं. उदाहरणार्थ, जर्मनीच्या आयटी आणि मीडिया क्षेत्रातील महिला दर आठवड्याला सरासरी ३२ तास काम करतात, तर रशियामध्ये याच क्षेत्रातील महिला ४० तास काम करतात.
भारतीय कामाच्या ठिकाणी लैंगिक असमतोल
कामाचा प्रचंड ताण असूनही भारतीय महिलांचे या क्षेत्रात लक्षणीयरीत्या कमी प्रतिनिधित्व आहे. भारतातील व्यावसायिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक नोकऱ्यांमध्ये केवळ ८.५ टक्के महिला आहेत, तर माहिती आणि कम्युनिकेशन क्षेत्रातील केवळ २० टक्के कर्मचारी महिला आहेत. तुलनेत, इतर अनेक राष्ट्रांमध्ये या उद्योगांमध्ये महिलांचा सहभाग जास्त आहे. १४५ राष्ट्रांपैकी तांत्रिक क्षेत्रात महिलांच्या प्रतिनिधित्वासाठी भारत तळापासून १५ व्या क्रमांकावर आहे.
गेल्या काही वर्षांत महिलांमध्ये शैक्षणिक क्रांती झाली आहे. विविध क्षेत्रात महिला उंच भरारी घेऊन स्वतःचं जग निर्माण करतात. स्पर्धात्मक युगात जगण्यासाठी स्पर्धेशी जुळवून घेतात. घर, ऑफितुस आणि सोशल लाईफ सांभाळताना त्यांना नाकी नऊ होतात. परंतु तरीही या सर्व गोष्टी एकहाती सांभाळण्याची त्यांची वृत्ती कमी होत नाही. परिणामी त्यांची शारीरिक स्वास्थ्य बिघडतं. त्यामुळे कामाचं योग्य नियोजन करून, जितका स्ट्रेस झेपू शकेल तितकाच कार्यालयीन कामाचा स्ट्रेस घेऊन काम करण्याचं आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येतंय.