गेला आठवडाभर राधिकाचं चित्त ठिकाणावर नव्हतं. एक तर ती बधिर बसलेली असायची किंवा येरझाऱ्या घालत असायची. तिचा भावनाशून्य चेहरा आता आईला पाहवेना. दोघींसाठी कॉफीचे कप घेऊन राधिकाजवळ बसत तिनं विचारलं, “राधा, आता काय करायचं ठरवते आहेस पुढे?” काहीच उत्तर न देता राधिका मख्ख चेहऱ्याने कॉफी पीत राहिली.

दोन वर्षांपूर्वी बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदवी मिळवल्यानंतर राधिकाचा जवळचा मित्र ध्रुव मास्टर्ससाठी परदेशी गेला. राधिकाला त्या वर्षी ॲडमिशन मिळाली नाही, त्यामुळे ती पुढच्या वर्षीसाठी तयारी करत होती. ध्रुव आपल्याला आज ना उद्या प्रपोज करेल, असं तिच्या मनात गृहीत होतं. अशा वेळी एका गर्लफ्रेंडसोबत तो सीरियस रिलेशनशिपमध्ये आहे असं त्यानं एकदा तिला कळवलं तेव्हा राधिका आतल्या आत कोसळली. ध्रुवनं तिला फसवलं असंही नव्हतं. त्यांची चांगली मैत्री होती. पुढचं कदाचित तिनंच गृहीत धरलं होतं; पण त्यामुळे मास्टर्स आणि परदेशी जाणं दोन्ही तिला नकोसं झालं.

हेही वाचा – “एक वर्ष घरात राहिल्याने माझा नवरा परत येईल का?”

घरात बसून राहण्यापेक्षा थोडा बदल आणि ब्रेक घेऊन मन स्थिर झाल्यावर पुढचं ठरवू अशा विचारातून तिनं नोकरी करायचं ठरवलं. तिच्या बॉसचे एक मित्र फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित होते, ते एकदा बॉसना भेटायला आले असताना राधिकाची ओळख झाली. तिनं कॉलेजमध्ये ‘स्टेज’ केलेलं आहे हे बोलण्यात आलं, तेव्हा “माझ्या नवीन फिल्मच्या लीड रोलसाठी तुझ्यासारखीच मुलगी मी शोधत होतो,” असं म्हणून त्यांनी रोल ऑफर केला. उदास झालेल्या रधिकाला त्यामुळे एकदम छान वाटलं. ऑफबीट चित्रपट असल्यानं एकदा असा वेगळा अनुभव घेऊन पाहायला हरकत नाही असं घरच्यांचंही मत पडलं आणि राधिकाने होकार दिला. स्क्रीन टेस्ट वगैरे होऊन ती निवडली गेली.

त्या भूमिकेसाठी थोडं नृत्य, थोडी घोडेस्वारी येणं आवश्यक होतं. हिरॉईन बनण्याच्या उत्साहाने तिने तसे क्लासेस लावले. स्क्रीन प्ले, ट्रायल्स सुरू झाल्या. त्यासाठी सध्याचा ‘मेक शिफ्ट’ जॉब तिला अर्थात सोडावा लागला. मित्रमैत्रिणी, नातलगांमध्ये तिचा भाव भलताच वाढला. ते ‘स्पेशल’ असणं एंजॉय करत असताना प्रोड्यूसर आणि डिरेक्टरचं काही तरी बिनसलं आणि तो दुर्दैवाने प्रोजेक्ट अचानक डब्यात गेला. राधिका पुन्हा एकदा कोसळली. बधिर, सुन्न झाली.

“आई, जवळजवळ दोन वर्षं पूर्ण वाया गेली गं आयुष्यातली. आज ना जॉब, ना पैसे, ना मास्टर्स, काहीच हातात नाही माझ्या. पुढचं काही समजतच नाहीये.”

“दोन वर्षं वाया गेली का खरंच? तुझ्याकडून तू पूर्ण प्रयत्न केलास. जे तुझ्या हातातच नव्हतं तिथे तुझा काय दोष? चांगलं हे आहे, की तुझी डिग्री पूर्ण झाल्यानंतर हे सगळं झालं. ध्रुवच्या धक्क्यानंतर तुला थोडा वेळ हवा होता, तेव्हाही रिकामं न बसता तू जॉब सुरू केलास. फिल्मचा प्रोजेक्ट सहा महिन्यांत संपणार होता. त्यानंतर मास्टर्ससाठी जायचं किंवा फिल्म्सकडे करिअर म्हणून पाहायचं याचा निर्णय घेता आला असता. त्या त्या वेळी सगळं योग्य दिशेनंच चाललं होतं.” आई म्हणाली.

“ते स्वत:चं समाधान करणं झालं आई. माझ्या हातात ‘आज’ काय आहे?”

हेही वाचा – गच्चीवरची बाग: खरकट्या अन्नापासून खतनिर्मिती

“CV बघू ना आपण तुझा. ‘बायोटेक’मधली चांगली डिग्री आहे, एका जॉबचा अनुभव आहे, पूर्वी पूर्ण अनोळखी असलेली फिल्मची प्रोसेस आज माहीत आहे, एका फिल्मसाठी निवडलं गेल्याचं पत्र हातात आहे, शिवाय बऱ्यापैकी नाच आणि घोडेस्वारी येतेय. फिल्म करिअरमधलं ग्लॅमर आणि बेभरवशीपणा दोनही बाजू तू अनुभवल्या आहेस. आता बायोटेकमध्ये ‘मास्टर्स’ करायचं की नवी फिल्म मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे हे ठरवणं सोपं जाईल. या सगळ्याचा पुढे कुठे तरी नक्की उपयोग होईल एवढा विश्वास ठेव. मग तुझं नेमकं काय वाया गेलं राणी? आता चार लोकांना भेटायचं, अर्ज करायचे की वेळ गेला म्हणून रडत बसून आणखी चार-सहा महिने घालवायचे? हा चॉइस मात्र तुलाच करायला हवा राधा.” आई म्हणाली.

राधा खऱ्या अर्थाने भानावर आली आणि तिने आपला सीव्ही त्या अर्थाने पहिल्यांदाच पाहिला आणि समाधानानं हसली. आता तिचा ती निर्णय घेणार होती.

(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)

(neelima.kirane1@gmail.com)