डॉ. स्मिता प्रकाश जोशी
सात वर्षांचा अनीश त्याच्या वडिलांसमोर अंग चोरून उभा होता. त्याचा बाबा म्हणजे अमित त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न करत होता, पण अनीश त्याचा हलकासा स्पर्शही स्वतःला होऊ देत नव्हता. बाबाने आणलेल्या ‘गिफ्ट’कडे तो ढुंकूनही बघत नव्हता. त्याचा राग त्याच्या डोळ्यात दिसत होता.
“मॅडम, बघा तो किती घाबरलाय. त्याला अमितला अजिबात भेटण्याची इच्छा नाहीये, तुम्ही न्यायाधीशांना तसं कळवून टाका. आम्हाला दोघांनाही त्याचं तोंडही बघायचं नाहीए, तो आमच्या आयुष्यात नको आहे.” शलाकाही तावातावाने बोलत होती.
शलाकानं अमितविरुद्ध कुटुंब न्यायालयात घटस्फोटाची केस दाखल केली होती. तर तिनं पुन्हा नांदायला यावं याकरिता विवाह पुनर्प्रस्थापित करण्याची केस अमितनं न्यायालयात दाखल केली होती. कुटुंब न्यायालयाच्या कार्यपद्धतीमध्ये केस न्यायालयात चालवण्यापूर्वी समुपदेशकांकडे पाठवली जाते आणि समुपदेशक त्यांच्यातील ताण-तणाव समजून घेऊन ते दूर करण्यासाठी उभयतांना समुपदेशन करतात. यानुसार हे प्रकरण माझ्याकडे आलं होतं आणि मुलाची त्यांच्या वडिलांबरोबर भेट घडवून आणावी, असं न्यायालयानं सांगितलं होतं पण शलाका यासाठी अजिबात तयार होत नव्हती. मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, “शलाका, शांत हो. मुलांना आई-बाबा दोघांच्याही प्रेमाची गरज असते. बाप म्हणून अमितचं मुलाशी वागणं चुकलंही असेल, पण आपल्या मुलाच्या आयुष्यात बापच नको, हा टोकाचा विचार करू नकोस. व्यक्ती कधीही वाईट नसते, त्याचं वर्तन वाईट असू शकतं.”
“बघा मॅडम, तिनंच मला मुलापासून तोडलं आहे.” अमितनंही तिच्या तक्रारी सांगणं सुरू केलं. पण मी दोघांनाही शांत केलं.
“हे बघा, मुलगा दोघांचाही आहे म्हणूनच मुलासाठी काय योग्य ठरेल याचा विचार होणं अधिक गरजेचं आहे, अमित, तू मुलाचा बाप आहेस, आणि भेटीसाठी त्याची मानसिक तयारी करणं हे तुझं काम आहे, तू प्रयत्न कर.”
माझं बोलणं ऐकून अमित आणि शलाका दोघेही शांत झाले. पण अनीश तोंड फिरवून बसला होता. तो अमितकडे बघतही नव्हता आणि अमित तोंड लपवून आपल्या डोळ्यांतील अश्रू मागे सारण्याचा प्रयत्न करीत राहिला.
अनीश अत्यंत हुशार मुलगा होता. कोणतीही गोष्ट त्याला शिकवली की तो लगेच आत्मसात करायचा त्यामुळेच अमितनं त्याला बुद्धिबळ आणि क्रिकेट या दोन्ही गोष्टी शिकवायचं ठरवलं. तो स्वतः त्याला खूप वेळ देत असे. त्याच्यासाठी वेगळे कोचिंग क्लासही त्यानं लावले होते. अनीशनं कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला तरी तो यशस्वी होऊनच यायचा आणि त्यामुळेच अमितच्या त्याच्याकडून अपेक्षा वाढत गेल्या. बुद्धिबळाच्या एखाद्या टुर्नामेंटमध्ये तो कमी पडला तर पुढच्या स्पर्धेसाठी अमित त्याची खूप तयारी करून घ्यायचा. सराव करण्याची जबरदस्ती करायचा परंतु अनीश कधी कधी कंटाळायचा. स्पर्धेसाठी न खेळता इतर मुलांसारखं मनमोकळं खेळावं, असं त्याला वाटायचं, पण अमित जबरदस्तीने त्याच्याकडून सराव करून घ्यायचा. या स्पर्धेत जिंकायलाच हवं, असा त्याचा अट्टहास असायचा आणि अनीशनं ऐकलं नाही तर अमितची खूपच चिडचिड व्हायची आणि तो अनीशला कठोर शिक्षाही करायचा. याबाबतीत तो शलाकाचंही ऐकायचा नाही. त्याच्या या वागण्याचा अत्यंत त्रास झाल्यानेच शलाका अनीशला घेऊन माहेरी निघून आली होती.
आपल्या मुलानं सर्वोच्च यश संपादन करावं, ही इच्छा पालकांनी ठेवणं याच्यात कोणतीही चूक नाही, पण ज्या वेळेला त्या गोष्टीचा अट्टहास केला जातो आणि मुलावर त्याचं दडपण आणलं जातं त्या वेळी अमितसारखं मुलाला आणि पत्नीलाही गमावण्याची वेळ येते. अमित बाप म्हणून वाईट नव्हता. त्यानं मुलासाठी खूप वेळही दिला होता, पण मुलाला समजून घेण्यात तो कमी पडला होता. पती आणि पत्नी दोघांच्यात कितीही वाद झाले तरी आई आणि बाबा या मुलांच्या मनातील प्रतिमा कधीही डागाळल्या जाऊ नयेत याची काळजी दोघांनीही घ्यायला हवी, हे मी शलाकालाही समजावून सांगितले आणि मग अनीशशी बोलायला सुरुवात केली.
अनीश, तुझा बाबा तुझी खूप वाट बघतोय, आता तो तुला खेळण्यासाठी कोणतीही जबरदस्ती करणार नाही. तुला कधी शिक्षाही करणार नाही. तुझा बाबा वाईट नाहीये रे, त्याचं वागणं तुला आवडत नव्हतं. पण आता बाबानं ‘गुड बाबा’ होण्याचं ठरवलं आहे, तुही ‘गुड बॉय’ होणार ना? शूर मुलं कोणालाच घाबरत नाहीत. बाबा आता आईलाही सॉरी म्हणालाय. बाबाने अनीशला किती गोष्टी शिकवल्या आहेत. मम्मा, बाबा आणि अनीशनं कित्ती कित्ती मजा केली आहे, हे बघ बाबाकडे किती फोटो आहेत. बाबा आणि मम्मा सोबत अनीश किती छान दिसतोय.”
“हो, खरंच आम्ही खूप मज्जा केली. आणि हा फोटो मला स्कूलमध्ये सांगितलेल्या फॅमिली प्रोजेक्टमध्येही लावता येईल. बाबा, हा प्रोजेक्ट करायला तू मला मदत करशील का? मम्मा, आपण पुन्हा एक नवीन फोटो काढायचा का? जुने फोटो बघता बघता अनीश केव्हा अमितशी बोलायला लागला हे त्याचं त्यालाच कळलं नाही. हळूहळू तो अमितच्या कुशीत शिरला आणि त्याला मिठीत घेऊन अमितनं आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
हे सर्व बघून शलाकालाही स्वतःच्या डोळ्यातलं पाणी लपवता आलं नाही. मुलाच्या सुखाशिवाय आईला दुसरं काय हवं असणार?
आता पुन्हा अनीशला आई आणि बाबा दोघांचाही सहवास मिळणार होता.
(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत)