ब्रिटनमधील दुसऱ्या सर्वात मोठ्या मॅरेथॉन शर्यतीत भारतातील संबलपूरी साडीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं, ही बातमी नक्कीच वाचताना रोचक वाटेल, नव्हे ती आहेही! मँचेस्टर येथे नुकत्याच पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ओदिशाच्या मधुस्मिता जेना दास हिने आपल्या आगळ्यावेगळ्या वेशभूषेने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. मँचेस्टरनिवासी ४१ वर्षीय मधुस्मिता हिने भारतीय पारंपारिक हातमागावर विणलेली लालसर केशरी रंगातील संबलपूरी साडी परिधान करून ४२.५ किमी (सुमारे २६.४ मैल) अंतराची शर्यत ४ तास ५० मिनिटांत पूर्ण केल्याने प्रेक्षक थक्क झाले!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : गृहिणी असलेली आई की, नोकरदार आई? हायकोर्टाने स्पष्ट केले की…

तिच्या ह्या कामगिरीची दखल अनेक ट्विटरयुजर्सनी घेतली असून भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे असे समयोचित प्रदर्शन केल्याबद्दल तिचे भरभरून कौतुकही केले आहे. ४२.५ किमी अंतराची ही स्पर्धा तशीही एवढ्या कमी अवधीत पूर्ण करणं हेच आव्हान असताना ओडिया मधुस्मिताने साडी नेसून ती पूर्ण करणं हे अधिक आश्चर्यकारक आणि आव्हानात्मक असल्याचं बऱ्याच नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. काही युजर्सनी मॅरेथॉनसारख्या स्पर्धेमध्ये असे पाऊल उचलणे हेच अभिनंदनीय असल्याचं म्हटलं आहे. काही युजर्सनी तिच्या या धाडसीपणाला सलाम केला आहे. काहींनी हा अभिमानाचा क्षण असल्याचंही लिहिलं आहे. मॅरेथॉनमधील तिच्या फोटोवर एका युजरने असं म्हटलं आहे की, खरंच इतका सुंदर फोटो पाहण्यासारखा आहे.

आणखी वाचा : ‘ब्लू अॅण्ड ग्रे कॉलर’: महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येत केवळ एक टक्का वाढ

विदेशी कपड्यांना जास्त पसंती देणाऱ्यांनी आपली संस्कृती जगाला कशी दाखवायची, हे मधुस्मिताकडून शिकलं पाहिजे. एका ट्विटर युजरने स्पर्धेतील तिचा फोटो शेअर करत त्याखाली म्हटले आहे की, फोटोमधून तिचा पारंपारिक पेहरावात स्पर्धेत सहभागी होण्यामागचा दृढनिश्चय आणि आत्मविश्वास झळकतो. आदिवासी आणि समृद्ध संबलपूरच्या सांस्कृतिक वैशिष्ट्याचेही कौतुक त्याने केले आहे. मँचेस्टर मॅरेथॉन य ब्रिटनमधील सर्वात महत्त्वाच्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धेत वैभवशाली वारसा लाभलेल्या भारताच्या पारंपारिक पेहराव परिधान करून सहभागी होताना तिने कोणतेही दडपण घेतले नाही किंवा त्यामुळे स्वतःचे लक्ष विचलित होऊन दिले नाही, याबद्दलही काही युजर्सनी तिचे विशेष कौतुक केले आहे.

आणखी वाचा : ‘गंगा भागीरथी’ म्हणत २१ व्या शतकातील महिलांना पुन्हा पुरातन काळात नेण्याचा प्रयत्न का?

‘फ्रेंड्स ऑफ इंडिया इन्टे डॉटयूके’ च्या अधिकृत ट्विटर हॅण्डलने मधुस्मिताच्या धावण्याचा व्हिडियो प्रसारित केला आहे. त्या व्हिडियोमधे ती साडी नेसूनही अतिशय सहजपणे मॅरेथॉन धावण्याचा आनंद घेत असताना आणि तिच्यासोबतचे अन्य स्पर्धक तिचा उत्साह वाढवताना दिसत आहेत. ४२.५ किमीचे आव्हान पारंपारिक वेशभूषेतही सहजपणे पूर्ण करता येते, हा आत्मविश्वास मधुस्मिताने सगळ्या जगाला दाखवून दिला असल्याचेही इथे म्हटले आहे. भारतीय संस्कृतीचा वारसा असा अभिमानाने तिने अशाप्रकारे प्रदर्शित केल्याने भारतीय पोशाखांकडे सगळ्यांना आकर्षून घेण्याचा तिचा दृष्टिकोन नक्कीच स्तुत्य आहे, असंही ट्विटमधे म्हटलं आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion attraction of manchester marathon was sambalpuri indian sari women odisa madhusmita jena das vp
Show comments