फॅशनच्या क्षेत्रात दररोज काय नवीन बघायला मिळेल हे सांगणं कठीण आहे! ‘जागतिक’ समजली जाणारी प्रत्येक फॅशन हल्ली समाजमाध्यमांमुळे अल्पावधीतच सर्वदूर पसरते आणि आधुनिक, मोठ्या शहरांमध्ये ती लगेच व्यक्तींच्या अंगावर दिसूही लागते. अशीच एक फॅशनप्रेमींकडून वापरली जाऊ लागलेली, पण सामान्य लोक मात्र क्वचितच वापरतील अशी नवी फॅशन म्हणजे ‘डीटॅचेबल स्लीव्हज् ’. हो, तुम्ही बरोबर वाचलं आहे! ‘डीटॅचेबल’ म्हणजे अर्थातच काढून ठेवता येण्याजोग्या- म्हणजे निव्वळ बाह्या बाजारात विकत मिळू लागल्या आहेत. आता टॉपशिवाय नुसत्या बाह्याच कोण विकत घेईल आणि त्या खरोखर वापरल्या जातील का, हे प्रश्न इथे गौण आहेत! कारण हल्ली अनेक सेलिब्रिटी मंडळींच्या स्टायलिश पोषाखात या डीटॅचेबल बाह्यांनी स्थान मिळवलेलं दिसतं आहे.
आणखी वाचा : विजया वसावे… नंदूरबारमधील ओळखपत्रधारक पहिली तृतीयपंथीय!
डीटॅचेबल बाह्या या अर्थातच स्लीव्हलेस टॉप आणि ड्रेसेसबरोबर वापरल्या जातात. सध्या त्या बहुतेक वेळा टँक टॉप, ट्यूब टॉप किंवा स्ट्रॅपलेस ब्रालेट टॉपबरोबर घातलेल्या पाहायला मिळत आहेत. ‘बेसिक’ असा सॉलिड कलरमधला स्लीव्हलेस टँक टॉप घातल्यावर त्यावर जर समान रंगाच्या ‘पफी’ (फुग्याच्या) डीटॅचेबल स्लीव्हज् परिधान केल्यास त्या टॉपचं रूप एकदमच पालटतं. या स्लीव्हज् हाफ, थ्री-फोर्थ किंवा फुल लेंग्थ अशा तीन्ही प्रकारात मिळतात. शिवाय त्यात साध्या, घोळदार, फुग्याच्या, रफल्स- म्हणजे फ्रिलच्या असे प्रकारही मिळतात. विशेषत: काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पफी किंवा बलून स्लीव्हज् त्यातल्या त्यात अधिक प्रमाणात वापरल्या जात आहेत असं पाहायला मिळतं. काळा आणि पांढरा रंग विविध जीन्स, ट्राऊझर वा स्कर्टवर घालता येतो, हेच याचं कारण असावं. कारण डीटॅचेबल स्लीव्हज् ची किंमत कमी मुळीच नसते.
आणखी वाचा : आलियाला लग्नाआधीच गरोदर म्हणणाऱ्या ट्रोलर्सना चपराक
डीटॅचेबल बाह्या काखेपाशी बसतात. काही जणी त्या आणखी आधुनिक लूकसाठी कोपरापाशी किंवा दंडावरसुद्धा घालतात. या बाह्यांना इलॅस्टिक दिलेलं असतं, त्यामुळे त्या जागेवर राहू शकतात. त्यात सर्वसाधारणपणे वेगवेगळे साईज दिलेले नसले, तरी त्या आपल्याला बसताहेत का, काखेत त्वचेवर काचत तर नाहीत ना, हे तपासून पाहायला हवं.
आणखी वाचा : ‘मेटा’च्या ‘इंडिया हेड’ संध्या देवनाथन आहेत तरी कोण? जाणून घ्या त्यांचा प्रवास…
अनेक ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मस् वर अशा स्लीव्हज् विकल्या जात आहेत. त्यातले जरा लोकप्रिय ब्रॅण्डस् पाहिले, तर डीटॅचेबल बाह्यांच्या एका जोडीची किंमत हजार रुपयांच्या वरच असते. कित्येकदा त्याहूनही बरीच जास्त. केवळ बाह्यांसाठी इतके पैसे घालवावेत का? त्यापेक्षा त्याच पैशांत बाह्यांची वेगवेगळी फॅशन करून दोन-तीन टॉप्स शिवून होणार नाहीत का? असे प्रश्न सामान्यांना पडणं साहजिक आहे. पण फॅशनचं प्रेम अनेकदा वस्तूची वाजवी किंमत आणि वास्तवातली उपयुक्तता यापेक्षा अधिकच ठरतं, त्यातलाच हा प्रकार! मात्र वारंवार मित्रमंडळींबरोबर बाहेर जाण्याचा, पार्ट्यांना जाण्याचा प्रसंग येत असेल आणि आहेत त्या कपड्यांवर तुम्हाला वेगवेगळे ‘लूक’ मिरवायचे असतील, तर काही स्लीव्हलेस टॉप्स आणि डीटॅचेबल स्लीव्हज् ची एखादी जोडी वॉर्डरोबमध्ये बाळगणं तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकेल.
आणखी वाचा : नातेसंबंध : स्पर्शाचा हेतू
नुकताच अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिनंदेखील आपल्या इन्स्टाग्रामवर डीटॅचेबल बाह्यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. तिनं तिच्या लूकमध्ये बटणांचा स्लीव्हलेस काळा टँक टॉप घालून त्यावर या बाह्या परिधान केल्या आहेत आणि खाली फ्लोरल फ्रिंटची घोळदार पलाझो घालून लूक पूर्ण केला आहे. मात्र तिनंही या बाह्यांची ‘एक छान गमतीशीर वस्तू’ म्हणून ओळख करून देताना असंही स्पष्ट म्हटलं आहे, की ‘कलाकारांच्या वॉर्डरोबमध्ये असे बरेचसे कल्पक प्रकार असले, तरी इतरांनी मात्र त्याबरोबर प्रत्यक्षात वापरता येतील असे स्लीव्हलेस कपडे आपल्याकडे किती आहेत, ते आधी तपासावं. त्याशिवाय त्यावर गुंतवणूक करू नये!’