सगळ्यांचीच नखं सुबक, चांगली असतील असं नाही. पण नखांची नियमित आणि चांगली निगा राखली, तर मात्र खूप काही वेगळं न करताही नखं चांगली दिसू शकतात. यात आपण घेत असलेला आहार संतुलित आणि पोषक असणं जसं आवश्यक आहे, तसंच जीवनशैलीत सकारात्मक बदल करून आरोग्य सुधारणंही गरजेचं आहे. चांगल्या आरोग्याचं तेज आपोआपच नखांवरील नैसर्गिक चमक म्हणून दिसायला लागतं. आज मात्र आपण खास प्रसंगी बहुतेक स्त्रिया हातापाय सुंदर दिसावेत म्हणून जे मेनिक्युअर आणि पेडिक्युअर करून घेतात, त्यात नखांची निगा कशी राखली जाते याविषयी थोडी माहिती घेऊ या. मेनिक्युअर आणि पेडिक्युअर करताना ग्राहक म्हणून आपण कशाकशाचा आग्रह धरावा, काय केलं म्हणजे नखांसाठी ते फायदेशीर ठरेल, याबद्दल ‘एएडी’नं (अमेरिकन अकॅडमी ऑफ डरमॅटॉलॉजी असोसिएशन) काही टिप्स देऊन ठेवल्या आहेत, त्या पाहू या.
आणखी वाचा : मी असुनही नसल्यासारखीच…, नवरा दुर्लक्ष करत असेल कर ‘या’ ५ टिप्स वाढवतील संसारात गोडवा
नखांनाही मॉईश्चरायझरची गरज!
त्वचेप्रमाणेच नखांनाही मॉईश्चरायझरची गरज असते. विशेषत: नेल पॉलिश काढण्यासाठी जे नेल पॉलिश रीमूव्हर वापरलं जातं, त्यात असलेल्या रसायनांमुळे नखं कोरडी पडू शकतात. त्यामुळे नखांचा ओलावा कायम राहाण्यासाठी आपण हातांना मॉईश्चरायझर लावतो, तेव्हा ते बोटांना आणि नखांनाही लावणं फायदेशीर.
‘क्युटिकल’ची काळजी घ्या
नखांचं ‘क्युटिकल’ म्हणजे नखांच्या तळाशी, बोटाच्या त्वचेला लागून असलेला गोलाकार भाग. अनेक जण मेनिक्युअर करताना हे क्युटिकल चांगलं दिसावं म्हणून ते ट्रिम करण्याचा वा मागे सरकवण्याचा प्रयत्न करतात. असं करू नका. क्युटिकल्स नैसर्गिकरित्या जशी आहेत तशीच राहू दिलेली चांगली.
कृत्रिम नखांचा वापर मूळची नखं लपवण्यासाठी नको!
ज्यांची नखं मुळात निरोगी आहेत त्यांनीच आणि क्वचितच कृत्रिम नखं वापरावीत. कारण वारंवार कृत्रिम नखं वापरण्यामुळे मूळच्या नखांवर दुष्परिणाम होतात.
तुमची मूळची नखं ठिसूळ झाली असतील, पिवळी पडली असतील किंवा त्यावर बुरशी संसर्गासारखी समस्या निर्माण झाली असेल, तर ते लपवण्यासाठी कृत्रिम नखांचा वापर नक्कीच करू नये. त्यामुळे समस्या वाढू शकते.
आणखी वाचा : यशस्विनी, करिअर : जपानच्या महिला क्रिकेट टीममध्ये चक्क मराठी मुलगी! (उत्तरार्ध)
‘नेल सलून’मध्ये जाताना…
‘नेल सलून’मध्ये जाताना काही गोष्टी तपासणं गरजेचं आहे. त्या अशा-
- मुख्य गोष्ट अशी, की नखांवरचे सौंदर्योपचार करणारी व्यक्ती प्रशिक्षित आहे का हे पाहणं आवश्यक आहे. हल्ली काही सलून्स आपल्या नेल टेक्निशियन्सच्या प्रशिक्षणाची प्रमाणपत्रं भिंतीवर लावून वा प्रसिद्ध करून व्यवहारात पारदर्शकता आणतात. परंतु तसं नसेल, तर त्याची चौकशी करायला हवी. नखं हा शरीराचा कितीही लहान भाग असला, तरी त्यांवरचे उपचार करणारी व्यक्ती प्रशिक्षित हवीच.
- सलूनमध्ये स्वच्छता पाळली जात आहे का? म्हणजे नेल टेक्निशियन संरक्षक हातमोजे आहेत का? एका व्यक्तीवर सौंदर्योपचार झाल्यानंतर हात धुवत आहेत का? ग्लोव्हज् बदलत आहेत का? याचं निरीक्षण करायला हवं.
- वापरलेली लहान लहान साधनं सलूनमध्ये इकडेतिकडे ठेवून दिलेली तर नाहीत ना? त्यातूनच स्वच्छतेचं दर्शन घडतं.
- सलूनमध्ये वापरली जाणारी साधनं कशी स्वच्छ केली जातात, हेही त्यांना विचारायला कचरू नका. ग्राहक म्हणून ते जाणून घ्यायचा तुम्हाला हक्क आहे.