कॅज्युअल टॉप्स किंवा ड्रेसेस जर ‘स्लीव्हलेस’ असतील, तर त्याला खांद्यावर केवळ कापडी बंद (स्ट्रॅप्स) असतात आणि कित्येकदा तर हे स्ट्रॅप्सदेखील नसतात. अशा ड्रेसेस वा टॉप्समध्ये खांदे, गळा आणि पाठीचा काही भाग उघडा राहातो. या कपड्यांच्या आत प्रत्येक वेळी पारदर्शक स्ट्रॅप्सची ब्रा घालणं शक्य नसतं, कारण ब्राचे स्ट्रॅप्स पारदर्शक असले तरीही ते लगेच दिसून येतात. तर काही वेळा कपड्यांना पाठीवर मोठा ‘कटआऊट डीटेल’ दिलेला असतो, अशा वेळी टँक टॉपसारखी स्ट्रॅपलेस ब्रासुद्धा घालता येत नाही. साडीच्या ब्लाऊजमध्येसुद्धा हल्ली पाठीवर मोठ्या ‘कटआऊट डीटेल’ची फॅशन आहे. पार्टीवेअर ‘बॅकलेस’ कपडेही फॅशनमध्ये आहेत. खांद्यावरून उतरलेला ‘बारडॉट टॉप’, पुढच्या बाजूस ‘नॉट’ (knot) असलेले टॉप्स यांच्या आत काय घालावं असा प्रश्न असतोच. कारण बाहेर वावरताना आपल्याला ‘कम्फर्टेबल’ वाटणंही आवश्यक असतं. बाहेर जाताना कपड्यांच्या आत ब्रा घातलेली नसेल तर खूप जणींना अनकम्फर्टेबल वाटतं, शिवाय चार जणांत काही ‘वॉर्डरोब मालफंक्शन’ तर होणार नाही ना, याची त्यांना भीती लागून राहाते. अशा वेळी फॅशन जगतात वापरला जाणारा, पण सर्वसामान्यांना फारसा ज्ञात नसणारा एक उपाय म्हणजे ‘पेस्टीज्’.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : आई न होणाऱ्या स्त्रीला स्वार्थी ठरवले जाणे दु:खद: – जेनिफर अ‍ॅनिस्टन

‘पेस्टीज्’ म्हणजे काय?

हे उत्पादन काही ब्रॅण्डस् ‘निपल पेस्टीज्’ या नावानंही विकतात. नावावरूनच तुम्हाला हे उत्पादन काय असेल याची कल्पना आली असेल. ब्राऐवजीही काही प्रमाणात ‘कव्हरेज’ मिळावं आणि चुकूनमाकून ‘वॉर्डरोब मालफंक्शन’सारखी बिकट स्थिती उद्भवलीच, तरी काहीही दृष्टीस पडू नये, यासाठी ही योजना असते. कॉटन मटेरिअलच्या या पेस्टीज् चे सेट मिळतात आणि पेस्टीज् ची एक जोडी एकदा वापरून फेकून द्यायची असते (डिस्पोझेबल). अर्थातच त्या स्तनांवर चिकटवायच्या असतात. पेस्टीज् ना आजूबाजूनं ‘ब्रा’सारखा ‘सपोर्ट’ मिळावा म्हणून काही जणी त्वचेवर थेट चिकटवता येण्याजोग्या ‘बॉडी टेप’चाही वापर करतात. काही ब्रॅण्डस् च्या पुन्हा पुन्हा वापरण्याजोग्या- ‘नॉन डिस्पोजेबल’ पेस्टीज् सुद्धा मिळतात. या पेस्टीज् सिलिकॉन मटेरिअलच्या असतात. मात्र इथे आपण डिस्पोजेबल पेस्टीज् ची माहिती घेतोय.

आणखी वाचा : ‘किल द बिल’ची ओपोकू आहे तरी कोण ?

डिस्पोजेबल ‘पेस्टीज्’ काढायच्या कशा?

‘पेस्टीज्’ लावायच्या कशा ते तुम्हाला समजलंच असेल. चिकटवलेल्या पेस्टीज् काढणं हेही एक कामच आहे. याबद्दल प्रत्येक ब्रॅण्डनं आपल्या उत्पादनांवर सूचना दिलेल्या असतात. बरीच मंडळी चिकटवलेल्या पेस्टीज् काढण्यापूर्वी त्यावर तेल किंवा लोशन लावून १५-२० मिनिटं तसंच ठेवतात आणि सावकाश पेस्टीज् काढतात. त्या डिस्पोजेबल असल्यानं कागदांत गुंडाळून त्यांची विल्हेवाट लावायची असते.

आणखी वाचा : उपयुक्त : स्त्रियांची ‘शेपवेअर्स’

‘पेस्टीज्’ वापरताना काय काळजी घ्यावी?

‘पेस्टीज्’ ही फॅशनमधली आयत्या वेळची सोय आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळेच ‘पेस्टीज्’ वापरताना काही गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतात. आपण चिकटवण्याजोग्या- डिस्पोजेबल पेस्टीज् च्या वापराबद्दलचे काही रूढ नियम पाहू या.

  • चिकटवण्याच्या ‘पेस्टीज्’ ६-७ तासांपेक्षा अधिक काळ वापरू नयेत.
  • तसंच त्या कधीकधीच वापरण्यायोग्य असतात, सलग पाठोपाठ दोन दिवस किंवा दररोज तर मुळीच वापरू नयेत.
  • तुमची त्वचा संवेदनशील असेल तर ‘पेस्टीज्’ वापरू नयेत. किंवा पेस्टीज् वापरल्यानंतर त्वचेला खाज सुटणं, त्वचा लाल होणं, सूज अशी लक्षणं दिसल्यास त्या वापरणं त्वरित थांबवावं आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • काही उत्पादक असं आवर्जून सांगतात, की गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, तसंच मधुमेही किंवा प्री-डायबेटिक स्त्रियांनी ‘पेस्टीज्’ वापरू नयेत. त्यामुळे आपण ज्या ब्रॅण्डचं उत्पादन खरेदी करू त्यावर लिहिलेल्या सूचना वाचणं आवश्यक आहे.

आणखी वाचा : त्वचा कोरडी पडते? अशी घ्या काळजी…

फॅशनमध्ये आपण सर्वसामान्य लोक कल्पनाही करू शकणार नाही अशी किती वेगवेगळी उत्पादनं वापरली जातात याचं ‘पेस्टीज्’ हे एक उदाहरण आहे! ऑनलाईन बाजारात वेगवेगळ्या ब्रॅण्डस् च्या पेस्टीज् उपलब्ध आहेत. क्वचित कधीतरी त्या वापरायलाही हरकत नसावी, अर्थात स्वत:चं आरोग्य आणि सोय या दोन्ही गोष्टी सांभाळूनच!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion lifestyle what are pasties which are used by women instead of bra vp