अनेक जणी हे शीर्षक वाचून गोंधळल्या असतील! ‘काहीच न करता’ उंच कसं दिसायचं बुवा? … हो, हे शक्य आहे! आणि असं म्हणताना आम्ही तुम्हाला ‘हील्स घाला’ वगैरे अजिबात सुचवणार नाही. ना आम्ही उंची वाढवण्यासाठीचे कोणते व्यायामबियाम सांगतोय आणि ना उंची वाढवणारं कोणतं ‘अचाट’ औषध घ्यायला सांगतोय!
इथे आम्ही तुम्हाला फक्त अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे अगदी तुमच्या रोजच्या ‘लूक’मध्ये राहूनच तुमची उंची आहे त्यापेक्षा जराशी जास्त ‘भासेल’! आहे ना मजा? आम्हाला हीसुद्धा जाणीव आहे, की एक वर्ग असाही प्रतिवाद करेल, की ‘उगाच आहोत त्यापेक्षा उंच दिसण्याची गरजच काय आहे? आपण जसे दिसतो त्यावर प्रेम करा.’ अगदी मान्य. मुळात ‘कुणासारखं’ दिसण्याची गरज नसते. प्रत्येक ‘चतुरा’ सुंदरच आहे. पण हे आपल्याला माहीत असून, पटत असूनही खास प्रसंगी आपण नेहमीपेक्षा जास्त उजळ दिसण्यासाठी चेहऱ्याला ‘फेशियल’ करतो, मस्त मेकअप करतो, हातपाय सुंदर दिसावेत म्हणून मेनिक्युअर-पेडिक्युअर, अगदी ‘नेल आर्ट’ही करतो, सण-समारंभांना नखरेल हील्स घालून मिरवतो! रूढ अर्थानं सौंदर्याचे काही मापदंड आपल्या मनात बसलेले असतात. अभिनेत्री, मॉडेल्स, ‘फॅशन इल्फ्लूएन्सर्स’चा आपल्यावर प्रभाव पडत असतो. त्यानुसार बहुतेकजणी आपापली सौंदर्याची व्याख्या तयार करतात आणि त्यानुसार दिसण्याचा प्रयत्न करतात. ही अगदी साधी मानवी भावना. आहोत त्यापेक्षा उंच दिसण्याचा प्रयत्न करणं हे त्याचंच एक उदाहरण. आम्ही एवढंच सांगतोय, की त्यासाठी कुठलाही अघोरी वा ‘अनकम्फर्टेबल’ उपाय करू नका. या काही मजेशीर युक्त्या आजमावून पाहा. यात तुम्ही अक्षरशः काहीच न करता, आहात त्यापेक्षा थोड्या उंच भासाल!
बॉटम्स आणि पाऊल यात थोडी फट हवी
हे वाचून तुम्हाला वाटेल की, ‘काहीही सांगता का राव!’ पण ही एक अगदी ‘ट्राईड अँड टेस्टेड’ युक्ती आहे. तुम्ही लेगिंग, ट्राउझर किंवा जीन्स काहीही घातलेलं असो, जर पावलांचा भाग आणि पाय यात घोट्याजवळ थोडीशी जागा मोकळी सोडली, तर उगीच तुमची उंची थोडी जास्त भासते. यात काहीच ट्रिक नाही, निव्वळ दृष्टिभ्रम! ही युक्ती काही आम्ही शोधलेली नाही! खास फॅशनसाठी ओळखली जाणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री सेरा जेसिका पार्कर (‘सेक्स अँड द सिटी’वाली!) खुद्द ही ट्रिक आजमावते. सेरा जेसिका पार्करची उंची आहे पाच फूट तीन इंच. खरंतर अभिनेत्रींना हील्सचं वावडं मुळीच नसतं. त्या त्यांच्यासाठी नेहमीच्याच. पण “वातावरणात कितीही थंडी असली तरी मी पायातले बूट/ चपला आणि ट्राउझर/ पॅन्ट/ स्कर्ट यात किंचितशी जागा मोकळी सोडतेच, कारण त्यामुळे मी उंच वाटते. मग बर्फाळ ऋतूत बाहेर गेल्यावर पायाच्या फक्त तेवढ्या छोट्या पट्ट्यात काही काळ संवेदनाच जाणवत नाहीत! पण मी स्वतःला तसं ‘ॲडाप्ट’ करून घेतलंय,” असं सेरानं एलन डीजनरसच्या एका कार्यक्रमात सांगितलं होतं. आपल्याकडे बर्फ वगैरे पडण्याची शक्यता मुळीच नाही! तेव्हा सेराचा हा फंडा आपल्याकडे अगदीच सहज करून बघण्याजोगा.
‘क्रॉप्ड लेंग्थ’
हा सेरा जेसिका पार्करच्या युक्तीचा आणखी सोपा प्रकार म्हणावा लागेल. हल्ली ‘अँकल लेंग्थ’ आणि ‘क्रॉप्ड लेंग्थ’ कपड्यांची खूप चलती आहे, मग ती लेगिंग, ट्रेगिंग, ट्राउझर, जीन्स असो, की प्लाझो असो. यात मुळातच कपड्याची उंची घोट्यापर्यंतच असते. अशा कपड्यांत उंची काहीशी जास्त (आणि वयही काहीसं तरुण!) भासतं. यावर हील्ससुद्धा खूप छान दिसतात. पण हील्स निवडताना नेहमी आपला कम्फर्ट आणि आरोग्य सर्वांत महत्त्वाचं हे विसरू नका!
गडद रंग, व्हर्टिकल डिझाईन!
गडद – विशेषतः काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये आपली जाडी उगाच थोडी कमी दिसते आणि त्यामुळे उंची थोडी जास्त वाटते! का? कारण डोळे फसतात! यात आणखी एक फंडा म्हणजे कपड्यावरचं डिझाईन ‘व्हर्टिकल’ म्हणजे उभं’ हवं, ‘हॉरिझाँटल’-आडवं नको. उदा. उभ्या सरळ रेघा, उभ्या रेघांमध्ये फूलं किंवा तत्सम काही. व्हर्टिकल डिझाईनही जाडी कमी आणि उंची जास्त असल्याचा भास निर्माण करतं.
असं म्हणतात, की फॅशन हे आपल्याला हवं तसं दिसण्याचं शस्त्र आणि शास्त्र दोन्ही आहे. त्यात खेळायला भरपूर वाव असतो. मग या निमित्तानं थोडी दृष्टिभ्रमाची मजा करून पाहायला काय हरकत आहे!