अपर्णा देशपांडे
“ए, वाव! कित्ती क्यूट ना?” टिचक्या छोट्याशा वनपिसकडे बघत मिहिकाने प्रतिक्रिया दिली, आणि अनूने तिला मागे खेचलं. “काहीही काय मिहिका, कित्ती लहान ड्रेस आहे तो. हा नको घेऊस. ओरडतील घरचे.” अनूच्या या बोलण्यावर सावी हसली. “काही ओरडणार नाही कुणी. तिच्या घरी ती म्हणेल ती पूर्व दिशा असते. मिहिका म्हणजे ‘पापा की परी’ आहे बाई, तुला माहीत नाही का? तिचे डॅड तिचे सगळे हट्ट पुरवतात. आपल्यासारखं नाही. काहीही करताना दहा वेळा विचार करावा लागतो.” हा संवाद सुरू असताना मिहिकानं ड्रेस घालून बघितला आणि पसंतही केला. त्यानंतर तिनं आणखी बरंच काय काय घेतलं. नव्यानं ग्रुपमध्ये जॉइन झालेल्या अनूला मात्र या ‘पापा की परी’चं राहून राहून आश्चर्य वाटत होतं. घरी आल्यावर तिनं तिच्या प्राध्यापक आईला इत्थंभूत खबर दिली, आणि विचारलं, “आई, मिहिकासारख्या लाडावलेल्या मुलींना लग्नानंतर त्रास होत असेल नाही? तिला घरी बसल्या जागी सगळं मिळतं. कुठल्याच गोष्टीसाठी अडवलं जात नाही. आणि तिला असं वाटतं की सगळं जग असंच आहे. सगळीकडे तिची खातिरदारी केली जाईल. तसंच सासर मिळेल असं नाही ना?
आई हसली. म्हणाली, “लग्नानंतरच का? घरात खूप जास्त ‘पॅम्पर’ केलं गेलं की मुलींना बाहेरच्या जगात वावरायलाही त्रास होतो. सार्वजनिक ठिकाणी, दुकानात, कॉलेजमध्ये जरा कुणी आवाज चढवून बोललं की लगेच यांना अपमान झाल्यासारखं वाटतं. रडायला लागतात एकदम. कधी ओरडा खायची सवय नसते. माझ्या कॉलेजमध्ये येतो मला असा अनुभव.”
“मग लग्नानंतर अशा मुलींचं काय?”
“अशा मुलींनी आधी हे लक्षात आलं पाहिजे, की आपण ‘पापा की परी’ आहोत, पण ते आपल्या घरात. आपल्याला प्रिन्सेससारखी वागणूक मिळते तशी प्रत्येक घरात प्रत्येक मुलीला नसते मिळत. आपल्या घराबाहेरचं जग म्हणजे आपलं राज्य आणि आपण तिथल्या राजकुमारी नसणार आहोत. आपली कामं आपल्याला करता आलीच पाहिजेत. सतत वडिलांच्या छायेत राहून भागणार नाही. आजची आपली रेलचेल त्यांच्या जिवावर सुरू आहे. पुढे आपलं करिअर आपल्याला घडवून आपल्या पायावर उभं राहायचं आहे.” आईचं बोलणं ऐकताना अनूनं मध्येच प्रश्न विचारला, “पण लग्नानंतर काय? तेवढं पॅम्परिंग तिला नाही मिळालं तर ती टिकेल का संसारात?”
“नक्की टिकेल. पण तिला काही गोष्टींचं भान ठेवायला लागेल. आपल्या सासरी त्यांची अशी एक कार्यपद्धत असेल. तिथे आपल्याला प्रेम मिळेल, पण आपल्या तालावर कुणी का नाचेल? आपल्याला जबाबदारी अंगावर घेणं यायला हवं. त्यांची आर्थिक बाजू हिच्याइतकी भक्कम असेल-नसेल, पण त्यांच्या प्राथमिकता वेगळ्या असू शकतात. सासरकडची मंडळी आपल्यावर प्रेम करतात की नाही, आपली काळजी घेतात की नाही, आपल्याला सन्मानाची वागणूक मिळते की नाही हे बघणं जास्त गरजेचं आहे.”
“मिहिकासारख्या मुलींना साध्या कारमध्ये बसायलाही नको वाटतं म्हणे! जेवायचं तर एकदम महागड्या हॉटेलमध्ये! खांद्यावर कायम महागडी पर्स हवी. Lol! फिरायला गाडी आहे हेच भाग्य नाही का? वाढदिवसाला मनासारखी गिफ्ट नाही मिळाली म्हणून नाराज होती ती परवा.” अनूनं सांगितलं.
“छोट्या छोट्या गोष्टींनी नाराज होणं, मनासारखं घडलं नाही तर एकदम डिप्रेशनमध्ये जाणं हे कमकुवत मानसिकतेचं लक्षण आहे. सगळ्या परिस्थितीत आनंदाने जगता आलं पाहिजे. सगळे दिवस सारखे असतात का? कधी कमी, कधी जास्त असणारच. नवऱ्यानं त्याच्या हाताने काही करून खाऊ घातलं तर ती किती आनंदाची गोष्ट आहे. तुमचे स्टार हॉटेल फिके त्यापुढे. प्रेमानं दिलेली साधीशी भेटवस्तू लाखमोलाची. आणि बाहेर तुमची कुणी इतकी आवभगत का करेल? ऑफिसमध्ये काम नीट नाही केलं तर बॉस ओरडणारच. तिथे कर्तृत्व दाखवावं लागतं. तिथे लाड करणारे ‘पापा’ मदतीला येत येऊ शकत नाहीत. समजेल तिलाही हळूहळू. चूक तिच्यासारख्या मुलींची नाही तर ती आई-वडिलांची आहे. अतिलाडाने मुलींना वास्तवाचं भान देण्यात कमी पडतात. ‘पापा की परी’ असेना का, जगणं समजण्यात भारी असली म्हणजे झालं,” आई म्हणाली आणि अनूने हसत तिला होकार दिला.
adaparnadeshpande@gmail.com