जान्हवीनं वीकएंडला सोसायटीच्या हॉलमध्ये ‘ एक्सक्लूझिव्ह साड्या-कुर्तीजचं प्रदर्शन आणि विक्री’ आयोजित केली होती. जान्हवी जगन्मैत्रीण. त्यामुळे तिच्या एका सोशल मीडिया मेसेजवर असंख्य ग्रुप्समधल्या अनेक मैत्रिणी आवर्जून आल्या. सर्वांना स्नॅक्स, चहापाणी आणि नंतर प्रदर्शन अशी व्यवस्था होती. तिथे मांडलेली प्रत्येक साडी, कुर्ती ही डिझायनर कपड्यासारखी वेगळी, सुंदर आणि किंमतही वाजवी. आलेल्या बायांच्या उड्याच पडल्या साड्यांवर. दोन दिवस वेगवेगळ्या ग्रुप्सवर एकेकीनं टाकलेले फोटो आणि जान्हवीच्या एक्सक्लूझिव्ह सिलेक्शनचं कौतुक चालू होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जान्हवीची ऑफिसमधली सहकारी प्रिया रविवारी संध्याकाळी उशीरा प्रदर्शनात पोहोचली, तेव्हा थोडेच साड्या-कुर्ते शिल्लक होते. खरेदी संपता संपता जान्हवी तिच्याकडे आली. “अगं, कालपासून सगळ्या ग्रुप्सवर तुझ्या सुंदर साड्यांचीच चर्चा सुरु आहे. मला यायला उशीर झाला, कपडे संपत आलेत, तरीही निवडणं अवघड गेलं आणि किंमतीही रिझनेबल ठेवल्यास. पण हे नवीनच काय काढलंस? लहानपणीची बुटीक चालवायची हौस जागी झाली की जॉब सोडून बिझनेस करायचा प्लॅन आहे? कधी नव्हे ती चक्क महिन्याची रजा टाकलीस आणि आता हे प्रदर्शन. आम्हाला ऑफिसमध्ये हवी आहेस बरं का तू.” प्रियाचे प्रश्न ऐकून जान्हवी हसली.

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: पोट साफ होत नाही?

“जॉब सोडायचा नाहीये गं, पण इतक्या वर्षांच्या त्याच त्या रुटीनचा कंटाळा आला होता. ऑफिसला जाण्याच्या कल्पनेनं सकाळपासूनच चिडचिड व्हायची. तेव्हा थोडा ब्रेक हवाय, काहीतरी बदल हवाय हे लक्षात आलं. पण करायचं काय? तेही कळत नव्हतं.”

“हो. नुसतीच रजा घेऊन फार तर चार दिवस करमतं.” प्रियाचा स्वानुभव बोलला.

“तर एका कपड्यांच्या प्रदर्शनात निशा ही शाळेतली मैत्रीण खूप वर्षांनी भेटली. ती हैदराबाद, कोईमतूरहून साड्या, कपडे आणून इथे प्रदर्शनांमध्ये स्टॉल लावते. माझी बुटीकची ओढ तिच्या लक्षात होती. ‘पुढच्या प्रदर्शनाच्या कपडे खरेदीसाठी जाणार आहे. येतेस का?’ म्हणून तिनं सहज विचारलं आणि मी लगेच ‘हो’ म्हटलं. रजा टाकून तिच्याबरोबर फिरले. ती होलसेल मार्केट्स आणि अप्रतिम सुंदर कपडे पाहिल्यावर भारी वाटलं. राहवेना. हिशोब करून बजेट ठरवलं आणि या साड्या-कुर्तीज् खरेदी केल्या. सोसायटीचा हॉल कमी भाड्यात मिळाला, सर्वांना मेसेज पाठवून प्रदर्शन लावून टाकलं.”

“मस्त, इच्छा झाली आणि मार्ग दिसला.”

“खरंच. रजा संपत आलीय आता, गेल्यागेल्या महिन्याभराची पेंडिंग कामं डोक्यावर बसतील, पण आता मरगळ गेलीय, ऑफिस मिस करतेय चक्क.” जान्हवी हसत म्हणाली.

“कपड्यांचा साइड-बिझनेसही करणार का?”

“छे गं. भागली हौस. अशा प्रदर्शनाला फार तर आणखी एकदा मैत्रिणी येतील. त्यानंतर मलाच टाळायला लागतील. पण या सगळ्या उठाठेवीनंतर, महत्वाचं असं कळलं, की ‘आपण आपल्या सवयीच्या कम्फर्ट झोनमध्ये अडकतो. मग तो तोडायची भीती वाटते. पण बदल खरोखरच हवा असेल तर नेहमीपेक्षा वेगळे निर्णय घेण्याचा ‘चॉइस’ आपणच करायचा असतो. थोडं धाडस करायला हवं आपल्याच भल्यासाठी.’

हेही वाचा… पीरियड्सवरून होतेय तुमची ऑफिसमध्ये टिंगल?

“म्हणजे कसं?”

“माझ्यासारख्या वर्कोहोलिक बाईसाठी, ‘ब्रेक घ्यायला हवा’ हे मान्य करणं हा नेहमीपेक्षा वेगळा चॉइस होता. निशानं ‘साड्या खरेदीला येतेस का?’ विचारल्यावर मी ‘हो’ म्हणाले, हा दुसरा वेगळा चॉइस होता. एरवी मी काहीतरी कारण सांगून टाळलं असतं. निशासारख्या एक्स्पर्टसोबत फिरल्यावर कापडमार्केट कळलं. मग थोडं हिशेबी रिस्क घेऊन खरेदीचा खर्च केला तो नेहमीपेक्षा वेगळा असा तिसरा चॉइस होता. एरवी ‘कशाला खर्च?’ याच्यात अडकले असते.”

“खरंच गं.”

“हे व्यवसाय म्हणून फायद्यासाठी करायचं नव्हतं, त्यामुळे खर्च अंगावर पडणार नाही, इतपतच किमती ठरवल्या. माझ्या एक्सक्लूझिव्ह सिलेक्शनला दाद देत प्रत्येक मैत्रीण इथून खुश होऊन गेली, त्यानं खरं समाधान मिळालं. एरवी इतक्या मैत्रिणींना मी चहा-फराळाला तरी कधी बोलावलं असतं? इतक्या वर्षांची बुटीकची हौस पूर्ण झाली तशी अडकलेलं काहीतरी मोकळं झालं. एनर्जी मिळाली, तसंच हेही नक्की कळलं, हे हौसेपुरतं छान होतं, कायमसाठी मात्र जॉबच आवडेल. एक महिन्यामधे भरपूर झाली की एवढी अनुभवाची कमाई.” जान्हवी म्हणाली.

“खरंय. शिवाय उरलेल्या एक्सक्लूझिव्ह साड्या-कुर्ती तुझ्याच मालकीच्या. आता मार्केट कळलंय, त्यामुळे रिटायर झाल्यावर करायला एक ऑप्शन झाला. आवडलंय मला. मीही माझे कम्फर्ट झोन आणि बकेट लिस्ट तपासते आता.” प्रिया म्हणाली.

(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)

neelima.kirane1@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fearless life comfort zone and ability of decision making dvr
Show comments