मुखशुद्धीसाठी व पानामध्ये मसाला म्हणून वापरण्यात येणारी बडीशेप सर्वांच्याच परिचयाची आहे. भारतामध्ये प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात लोणची, पापड, मसाला, पुरणपोळी आणि भाज्यांमध्ये बडीशेपेचा उपयोग अगदी प्राचीन काळापासून केला जातो. मराठीत ‘बडीशेप’, हिंदीमध्ये ‘सौंफ’, संस्कृतमध्ये ‘शतपुष्पा’, इंग्रजीमध्ये ‘फेनेल’ व शास्त्रीय भाषेत ‘फोनिक्युलम व्हल्गेर’ (Foeniculum Vulgare) या नावाने ओळखली जाणारी बडीशेप ही वनस्पती ‘अंबेलिफेरी’ या कुळातील आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतामध्ये बडीशेपेचे पीक सर्वत्र घेतले जाते. उत्तर गुजरातमधील उंझा हे बडीशेपेच्या व्यापारासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. बडीशेपेचे रोप हे तीन फूट उंच व सुगंधित असते. हे रोप दिसायला शेपूच्या रोपाप्रमाणे दिसते. या रोपाला देखणे तुरे येतात. या तुऱ्यांनाच सुरुवातीला पिवळी फुले लागतात. या फुलांमध्येच बडीशेपेचे दाणे असतात.

हेही वाचा… कंपन्यांच्या CEO पदावर पुरुषांची मक्तेदारी? महिला अधिकाऱ्यांची संख्या घटली; नेमकं कारण काय?

औषधी गुणधर्म

आयुर्वेदानुसार: बडीशेप दीपक, पाचक, बुद्धिवर्धक, कफनाशक, हृदय, स्निग्ध, रुचकर, बलदायक, उलटी, अतिसार व आमप्रकोप दूर करणारी आहे.

आधुनिक शास्त्रानुसार: बडीशेपेमध्ये तंतुमय पदार्थ, प्रथिने, मेद, उष्मांक, पिष्टमय पदार्थ, कॅल्शिअम, ‘अ’ व ‘ब’ जीवनसत्त्वे, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, सोडिअम, लोह ही सर्व पोषक घटकद्रव्ये असतात.

उपयोग

१. बडीशेपेच्या उकळलेल्या पाण्यात खडीसाखर घालून ते पाणी प्यायल्यास पित्तज्वर नाहीसा होतो.

२. छातीमध्ये जळजळ होऊन पोटात उष्णता जाणवत असेल, तर अशा वेळी बडीशेप रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी प्याल्याने पोटातील उष्णता नाहीशी होते. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांत उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हे पाणी वारंवार प्यावे.

३. कमी-अधिक अन्नसेवनामुळे पोट गच्च होऊन पोटात दुखते. अशा वेळी भाजलेली बडीशेप व धणाडाळ खाल्ल्यास घेतलेल्या अन्नाचे पचन होऊन त्वरित आराम मिळतो.

४. बाळंतिणीच्या दिनचर्येमध्ये जेवणानंतर आवर्जून भाजलेली बडीशेप, ओवा, तीळ, धणाडाळ यांचे मिश्रण करून खाण्यास द्यावे. याने जास्त प्रमाणात घेतलेल्या आहाराचे पचन होऊन आमनिर्मिती होत नाही. त्यामुळे बाळाला शुद्ध दुधाचा पुरवठा होतो.

५. बडीशेपेच्या सेवनाने शरीरातील रक्त शुद्ध होऊन त्वचाविकार दूर होतात. रक्त शुद्ध झाल्यामुळे त्वचेचा रंगही उजळतो.

६. बद्धकोष्ठतेचा त्रास वारंवार जाणवत असेल, तर अशा वेळी रात्री झोपताना बडीशेपेचे चूर्ण कोमट पाण्याबरोबर घेतल्यास शौचास साफ होऊन पोटातील गॅस कमी होतो.

७. हरभरा, मटकी या कडधान्यांपासून बनविलेल्या अन्नपदार्थामुळे पोटात गॅसेस निर्माण होतात. म्हणून या पदार्थापासून अन्न तयार करताना बडीशेपेचा वापर केल्यास पोटात गॅसेस निर्माण होत नाहीत.

८. उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून व शरीराची पचनशक्ती वाढविण्यासाठी बडीशेप, नागवेलीची पाने, गुलकंद हे मिक्सरमध्ये बारीक करून दुधातून घेतल्यास उष्णतेपासून होणारा त्रास थांबतो. या थंडाईमुळे मनाला व शरीराला आल्हाददायक वाटते.

९. बडीशेप बुद्धिवर्धक आहे. त्यामुळे लहान मुलांची, तरुण मुलांची व नोकरदारवर्गाची बुद्धिमत्ता वाढविण्यासाठी जेवणानंतर नियमितपणे भाजलेली बडीशेप खावी. निरनिराळ्या कारणांनी शारीरिक दुबर्लता येऊन मानसिक थकवाही अनेकांना जाणवतो, अशा वेळी बडीशेप खाल्ल्यास शरीरात उत्साह संचारतो.

१०. अजीर्ण होऊन करपट ढेकरा येत असतील, तर अशा वेळी बडीशेप पाण्यात उकळून त्यात थोडी खडीसाखर घालावी व हा तयार झालेला काढा कोमट असतानाच त्याचे सेवन केल्यास अजीर्णासारखे विकार दूर होतात.

११. बडीशेप, तीळ – धणाडाळ, जवस भाजून त्यात थोडे मीठ व लिंबाचा रस घालून ते एका बाटतील भरून ठेवावे व जेवणानंतर हे मिश्रण खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी जाऊन मुखशुद्धी होऊन खाल्लेल्या अन्नाचे पचनही सुरळीत होते.

१२. लहान बालकांना बडीशेपचा अर्क दिल्यास त्यांना वारंवार अपचन, उलटी व गॅसचा त्रास होत नाही.

सावधानता

काही लोक वारंवार बडीशेप खातात व एकप्रकारे व्यसनासारखे तिच्या अधीन होतात. परंतु असे न करता जेवणानंतर अगदी थोड्या प्रमाणात मुखशुद्धीसाठी व घेतलेल्या अन्नाचे पचन होण्यासाठीच तिचा वापर करावा. अति प्रमाणात बडीशेप खाल्ल्यास तोंडाच्या आतून चिरा पडतात. तसेच पोटातदेखील दाह, उष्णतेचा त्रास जाणवू शकतो.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fennel usage and caution digestive booster medicinal properties dvr
Show comments