लता दाभोळकर
परवाच महाराष्ट्रातल्या एका आमदाराचा शेरा कानी आला, ‘शेवटी महिला आणि पुरुष थोडासा फरक येतो ना?’ एक विशिष्ट जबाबदारी मलाच मिळायला हवी, कारण काय, तर मी पुरूष आहे, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ. महाराष्ट्रातल्या अशा बुरसटलेल्या विचारांच्या वातावरणात चेन्नईमधून मात्र एक दिलासादायक बातमी आली- ‘आयआयटी मद्रास’ झांझिबारमध्ये नवा आयआयटी कॅम्पस सुरू करणार असून, याची संपूर्ण जबाबदारी प्रीती अघालयम या महिलेकडे देण्यात आली आहे. तांत्रिक भाषेत सांगायचं, तर त्या या आयआयटीच्या संचालकपदी रूजू होणाार आहेत. एका ‘आयआयटी’च्या (इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी) संचालकपदी एक महिला विराजमान होण्याची देशातली ही पहिलीच वेळ आहे.
दक्षिण भारतात स्त्रियांचं शैक्षणिक प्रमाण जास्त दिसून येतं. त्यामुळे तिथल्या एकूणच व्यवस्थेत स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोनही काहीसा पुढारलेला आहे. या पार्श्वभूमीवर या बातमीनं फारसं आश्चर्य वाटलं नाही. पण एकूणात भारतीय स्त्रियांच्या कामगिरीचा विचार करता ही देशासाठी फार महत्त्वाची घटना म्हणावी लागेल. प्रीती यांच्यावर इतकी मोठी जबाबदारी टाकली तर त्यांची शैक्षणिक कारकीर्दही तशीच दमदार असणारच!
… तर कोण आहेत या प्रीती अघालयम?
प्रीती यांनी १९९५ मध्ये आयआयटी मद्रासमधून केमिकल इंजीनियरिंगमध्ये ‘बी.टेक.’ पूर्ण केलं. २००० मध्ये मॅसॅच्युसेट्स एमहर्स्ट विज्ञापीठातून ‘पीएच.डी.’ केली. एमआयटी केंब्रिज इथे पोस्ट डॉक्टरल संशोधन आणि आयआयटी बॉम्बे इथे प्राध्यापक म्हणून काम, अशी तगडी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या प्रीती यांच्यावर भारताबाहेर आयआयटी कॅम्पस उभारण्याची संपूर्ण जबाबदारी टाकणं आणि त्यांनीही ती एक संधी म्हणून स्वीकारणं स्वागतार्हच! प्रीती यांची निवड करून आयआयटी मद्रास यांनी केवळ एका महिलेच्या बुद्धिमत्तेचाच सन्मान केलला नाही, तर स्त्रियांना दुय्यम समजल्या जाणाऱ्या भारतासारख्या देशात एक नवा इतिहास रचला आहे. त्यांच्या या निर्णयानं अनेक महिलांचा पुढचा मार्ग सुकर केला आहे हे निश्चित.
प्रीती सध्या आयआयटी, मद्रास येथे केमिकल इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक आहेत. लवकरच त्या आपल्या नव्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. भारताबाहेरील हे पहिलं आयआयटी कॅप्सस असून येत्या ऑक्टोबर महिन्यापासून या कॅप्ससमध्ये पहिलं शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे. एका वेगळ्याच देशात शैक्षणिक कारकीर्द सुरू करण्याचं मोठं आव्हान प्रीती यांच्यापुढे आहे. अज्ञात प्रदेशात पूर्णपणे नव्यानं शैक्षणिक संस्था स्थापन करणं हेच एक मोठं आव्हान होतं. तिथे प्राध्यापक, विद्यार्थी, शैक्षणिक अभ्यासक्रम अशा अन्य महत्त्वाच्या गोष्टींची आखणी करणं आणि तेही कमी कालावधीत, हे शिवधनुष्यच पेलण्यासारखं आहे, पण या नियुक्तीकडे त्या एक आव्हान म्हणून नाही तर एक संधी म्हणून पाहतात.
प्रीती आपल्या या नवीन जबाबदारीविषयी सांगतात, ‘‘मी आयआयटी मद्रासची माजी विद्यार्थीनी असल्यानं त्यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मला फार मोलाची वाटते. त्यांनी माझा, माझ्या शिक्षणाचा एक प्रकारे सन्मानच केला आहे. मी जेव्हा या कामासाठी झांझिबारला गेले तेव्हा माझ्या लक्षात आलं, की तिथे महिलांचं प्रतिनिधित्व फार महत्त्वाचं मानलं जातं. तिथे अनेक क्षेत्रात महिला उच्चस्थानी नियुक्त करण्यात आल्या आहेत. अशा वेळी आपली जबाबदारीही कित्येक पट महत्त्वाची आहे. आपल्या संस्थेसाठी आणि पर्यायानं देशासाठी अशा प्रकारचं नेतृत्व करणं हा माझाच सन्मान आहे.’’
अलीकडेच भारत आणि टांझानिया यांच्यातील एका सामंजस्य करारानुसार, झांझिबार येथे आयआयटी मद्रासचा एक कॅम्पस सुरू करण्याचं ठरलं. सुरुवातीला चार वर्षांचा ‘बी.एस.’ ( डेटा सायन्स आणि एआय), दोन वर्षांचा ‘मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी’ (डेटा सायन्स आणि एआय) चा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे याची आखणी पूर्णपणे आयआयटी, मद्रास यांनी केली आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी प्रीती यांच्यावर आहे.
प्रीती अघालयम यांना संचालकपदाची जाबाबदारी दिल्यानं आम्ही स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे, असं आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी सांगतात. पुरुषी वर्चस्व असलेल्या क्षेत्रात स्त्री म्हणून आपला निभाव कसा लागला, याविषयी सांगताना प्रीती यांच्यातला आत्मविश्वास पुरेपूर जाणवतो. त्या सांगतात, ‘‘आयआयटी मद्रासमध्ये माझी जडणघडण झाली आहे. मी स्वभावत:च थोडी आक्रमक, वाद घालणारी आहे. परंतु माझ्या संस्थेला पूर्णपणे कल्पना आहे, की मला आयआयटी मद्रासविषयी खूप आत्मीयता आहे. मला धावणं, ब्लॉगिंग आणि शिकवणं यांची खूप मनापासून आवड आहे. त्यामुळेच संस्थेनं माझ्यावरही ही जबाबदारी सोपवली असावी. मी एक स्त्री आहे ही माझ्या संस्थेच्या विचारधारणेनुसार दुय्यम गोष्ट आहे. व्यक्ती म्हणून माझं कर्तव्य यालाच संस्थेनं प्राधान्य दिलं.’’
प्रीती यांचं कुटुंब शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहे. त्यांचे आजोबा एका शाळेचे संस्थापक सदस्य होते. त्यांचे वडील रसायनशास्त्राचे प्राध्यापक, त्यांच्या आईनंही डॉक्टरेट मिळवली आहे. “आईनं पीएच.डी.साठी रात्रभर जागून केलेला अभ्यासक मी स्वत: पाहिला आहे. अभ्यासाचा तोच संस्कार माझ्यावर झाला,” असं त्या सांगतात. आपल्या कारकीर्दीत पतीचाही मोठा वाटा असल्याचं त्या आवर्जून सांगतात. “या क्षेत्रात महिला कमी आहेत, पण हळूहळू ही परिस्थिती बदलते आहे. या पुरुषी वर्चस्व असलेल्या जगात स्त्रीनं खंबीरपणे, आत्मविश्वासानं उभं राहायला हवं. मला माझ्या संस्थेतल्या महिलांचा खूप मोठा पाठिंबा मिळाला आहे. या क्षेत्रात जास्तीत जास्त महिला याव्यात यासाठी प्रयत्न करायला हवेत.” असं प्रीती म्हणतात.
lokwomen.online@gmail.com