“डॉक्टर, माझं लग्न आहे पुढच्या महिन्यात. ठरवून होतंय माझं लग्न. मला भयंकर टेन्शन आलंय पहिल्या रात्रीचं. माझ्या मैत्रिणींनी काय काय स्टोऱ्या सांगितल्या आहेत मला. भयानक त्रास झाला म्हणे त्यांना.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही तरुणी पुण्याच्या थोडंसं बाहेर असलेल्या गावातून आली होती. पुण्यासारख्या शहरात आता लग्नाच्या वेळी लैंगिक बाबतीत पूर्ण अनभिज्ञ असणाऱ्या तरुण तरुणींची संख्या खूपच कमी होत चालली आहे. तरीही पहिल्यांदा सेक्स करताना टेन्शन असतंच मुलीलाही आणि मुलालाही.

लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीच्या माहितीसाठी तरुण-तरुणी पूर्णपणे मित्र मैत्रिणींवर अवलंबून असतात. आणि शास्त्रीय माहिती खूप थोड्या जणांना असल्यामुळे गैरसमजुती, अतिरंजित कहाण्या, दिशाभूल करणाऱ्या वदंता यांना पेव फुटलेले दिसते. ती तरुणी सांगत होती, “माझी मैत्रीण सांगत होती, त्यांनी लग्नाच्या पहिल्या रात्री पाच वेळा ‘केलं.’ ती पार दमून गेली. बायको नाही म्हणाली तर पुरुष खूप चिडतात, मग पूर्ण आयुष्य खराब होऊ शकतं”

तर अशा चित्रविचित्र समजुती दूर करण्यासाठी या विषयाबाबत योग्य शास्त्रीय माहिती घ्यायला हवी. स्त्रीच्या योनीमार्गाच्या तोंडाशी एक पातळ पडदा असतो ज्याला ‘हायमेन’ असं म्हणतात. ज्या मुली खूप व्यायाम करतात, सायकलिंग करतात त्याचा हा पडदा बऱ्याच वेळा ताणला गेलेला किंवा फाटला गेलेला असतो. तसेच आजकाल खूप मुली मासिक पाळीमध्ये मेंस्ट्रुअल कप किंवा tampon वापरतात. या मुलींमध्ये हा पडदा कधीच फाटून गेलेला असण्याची शक्यता असते. बाकीच्या मुलींमध्ये पहिल्यांदा सेक्स करताना हा पडदा ताणला किंवा फाटला जातो आणि थोडासा रक्तस्त्राव होऊ शकतो. त्यामुळे हायमेन अथवा रक्तस्त्राव होणे यावरून कौमार्य ठरवणे हा तद्दन मूर्खपणा आहे. तसेही कौमार्य ही कल्पना बदलत्या परिस्थितीनुसार पूर्णपणे कालबाह्य झालेली आहे. याची सर्व तरुण मुलांना कल्पना असायला हवी तसेच मागच्या पिढीच्या लोकांनी सुद्धा या संकल्पना डोक्यातून काढून टाकण्याची गरज आहे.

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: ते चार दिवस विश्रांतीचेच

एकदा सेक्स केल्यानंतर पुरूषाला लगेच लिंग ताठरता येऊ शकत नाही. मध्ये विश्रांतीचा काळ आवश्यक असतो. तसेच शरीराची क्षमता ही मर्यादित असते, पण पुरुषी इगो याबाबतीत जास्त असतो. त्यामुळे तरुणांमध्ये एकमेकांत खोट्या फुशारक्या मारण्याचे प्रकार सर्रास होतात. त्यातूनच ‘त्यांनी किती वेळा केलं,’ वगैरे बाता मारल्या जातात. खरंतर पहिल्या रात्री सेक्स होण्याचं प्रमाण ही बरंच कमी आहे. कारण लग्नाच्या गडबडीने दिवसभर दमलेले पतिपत्नी झोपून जाण्याचे प्रमाण जास्त! बऱ्याच वेळा विशेष करून आर्थिक कमकुवत वर्गांतील तरुणांना मित्रांनी पहिल्या रात्री सेक्स झालाच पाहिजे, अशी दहशत घातलेली असते. त्यामुळे नको त्या मानसिक दबावाला बळी पडून हे तरुण अननुभवी पत्नीवर जबरदस्ती करतात. इथेच पुढच्या पूर्ण लैंगिक जीवनाचे गणित चुकते. एकदा जबरदस्ती झालेली ती तरुणी परत कधीच सेक्सचा आनंद घेऊ शकत नाही. मग तिला दोष कसा देता येईल?

पहिल्या रात्री किंवा पहिल्यांदा एकांतात शरीरसंबंधांची घाई करण्याचे काहीच कारण नाही. एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेणे, एकमेकांच्या शरीराची ओळख करून घेणे, जोडीदाराच्या आवडीनिवडी समजावून घेणे यातही खूप उत्कट आनंद मिळू शकतो. पुढची पायरी आपोआप गाठली गेली तर जास्त सुखाची होते. आता बदललेल्या काळानुसार दोघांनीही स्वत:चे मोबाइल स्विच ऑफ करायला हवेत हेही सांगायची गरज आहे.

हेही वाचा… कंत्राटी तत्वावरील महिला कर्मचाऱ्यांनाही प्रसूती रजा आणि फायदे लागू

पहिल्यांदा सेक्स करायच्या वेळी बहुतेक तरूणांना आपल्याला जमेल ना याचे प्रचंड टेन्शन येते. ही अवस्था सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी असते. या टेन्शनमुळे ऐनवेळी लिंग ताठरता आलीच नाही असे होणे अत्यंत कॉमन आहे. मग सगळाच अँटी क्लायमॅक्स होतो आणि जोरदार रसभंग अटळ ठरतो. अशावेळी तरुणीने परिस्थिती अतिशय नाजूकपणे हाताळायला हवी. पुरुषाचा इगो यावेळी अत्यंत नाजूक अवस्थेत असतो. त्याला समजून घेऊन आश्वस्त करणे हाच पुढच्या यशस्वी वैवाहिक जीवनाचा पाया ठरतो.

तेव्हा पहिल्या रात्रीच्या काल्पनिक कहाण्यांमुळे बहकून न जाता योग्य माहिती घेऊन उत्कट आनंद निर्माण करणे हे प्रेमी युगुलाच्याच हातात आहे. नाही का?

(लेखिका स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ञ आहेत)

shilpachitnisjoshi@gmail.com