राजकीय पातळीवर भारत-पाकिस्तान संबंध फारसे जिव्हाळ्याचे असे कधी नव्हतेच. भारताने अनेकदा मैत्रीचा हात पुढे केला तरी पाकिस्तान त्यासाठी फारसा उत्सुक नसतो, हाच इतिहास. पाकिस्तानला नेहमीच भारतापेक्षा चीन जवळचा वाटतो आणि चीनच्या दृष्टीने भारत-पाकिस्तान मैत्री ही त्यांच्या पथ्यावर न पडणारी… अशा परिस्थितीत भारत-पाकिस्तान संबंध फारसे जवळीकीचे राहिलेले नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० कलम रद्द केल्यानंतर तर पाकिस्तानच्या रागाचा पारा वाढलाच आणि पुन्हा दोन्ही देशांच्या संबंधात नव्याने वितुष्ट आलं. आता यात काही नवं असं नाही, पण या पार्श्वभूमीवर भारताच्या दृष्टीने २००५ च्या भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी गीतिका श्रीवास्तव पाकिस्तानमध्ये भारतीय उच्चायुक्तपदी विराजमान होणे ही एक महत्त्वाची बाब मानली जात आहे. विशेष म्हणजे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादी महिला या स्थानावर नियुक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा… कामजिज्ञासा : पालकांच्या लैंगिक जीवनाचा मुलांवरही परिणाम!

भारत-पाकिस्तान संबंध पाहता हे स्थान तसे काटेरीच, पण गीतिका यांची आतापर्यंतची कारकीर्द पाहता या पदावर त्यांची निवड योग्यच म्हणावी लागेल. कारण यापूर्वी त्यांनी चीनमध्ये भारतीय उच्चायुक्तपदाची जबाबदारी सांभाळली आहे. सध्या त्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात संयुक्त सचिव म्हणून काम पाहात आहेत. त्यांनी कोलकात्याचे विभागीय पासपोर्ट कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयात हिंदी महासागर विभागाच्या संचालिका म्हणून काम पाहिले आहे. आणि आता त्यांना पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तपदाची एक आव्हानात्मक जबाबदारी पेलावी लागणार आहे. भारत-पाकिस्तान संबंधांचा पूर्वेतिहास पाहता ही वाट थोडी बिकटच आहे, परंतु गितिका यांचा लौकिक पाहता ही जबाबदारी त्या समर्थपणे पेलतील असा विश्वास वाटतो.

आपलं काम चोखपणे करणं हाच गीतिका यांचा विशेष. एक तडफदार अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहेच. आपल्या कारकीर्दीतील जास्त वेळ त्यांनी चीनमध्येच घालवला आहे. तेथील त्यांची कामगिरी उल्लेखनीय मानली जाते. २००७- २००९ दरम्यान चीनमध्ये उच्चायुक्तपदी असताना त्यांनी चीनी भाषा शिकून घेतली. आपल्या कामाप्रती निष्ठा असणं याचंच हे एक उदाहरण.

हेही वाचा… रेल्वे बोर्डाला मिळाली पहिली महिला अध्यक्षा, कोण आहेत जया वर्मा-सिन्हा? बालासोर दुर्घटनेनंतर आल्या होत्या चर्चेत!

२०१९ साली काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताच्या या निर्णयाचा परिणाम भारत-पाकिस्तान राजनैतिक संबंधांवर पडणार असल्याचे सूतोवाच केले आणि पुढे झालेही तसेच. भारतानेही इस्लामाबादमध्ये गेली चार वर्षे पूर्णवेळ उच्चायुक्त अधिकारी नियुक्त केला नव्हता आणि आता थेट एका महिलेलाच या पदाची जाबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांमधील विकोपाला गेलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करणे ही गीतिका यांच्यासाठी मोठी कसरत असेल.

भारत-पाकिस्तानचे तणावपूर्ण संबंध मैत्रीत बदलणे- जे अशक्यप्राय मानले जाते- ही जबाबदारी त्या कशी पेलू शकतात याकडे सगळ्यांचेच लक्ष असेल. मूळ उत्तर प्रदेशच्या असणाऱ्या गीतिका या २००५ च्या आयएफएस अधिकारी. मुत्सद्देगिरीत त्या खूप पारंगत आहेत आणि त्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. चीनमध्ये भारतीय उच्चायुक्तांत अनेक वर्ष विविध पदांवर त्या काम करत होत्या. त्यामुळे इस्लामाबामधील उच्चायुक्तांत काम करताना त्यांना चीन आणि इंडो पॅसिफिक विभागात काम करण्याचा अनुभव कामी येईल असे म्हटले जाते.

हेही वाचा… फॅशन मॅगझीनच्या कव्हरवर चक्क ‘एआय जनरेटेड’ मॉडेल!

गीतिका श्रीवास्तव यांना गेल्या चार वर्षांत भारत-पाकिस्तान यांच्यातील बिघडलेल्या संबंधांनंतर भारत-पाकिस्तान मैत्रीचा एक नवा पूल बांधण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. दिवसेंदिवस पाकिस्तानमध्ये बिघडत चाललेली आर्थिक, सामाजिक परिस्थिती, चीनची अघोरी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी चाललेल्या कुरापती, त्यांच्या आमिषाला बळी पडत असलेला पाकिस्तान आणि भारताप्रती पाकिस्तानचा अडेलतट्टूपणा… हा काटेरी मार्ग सुकर करून भारत-पाकिस्तान संबंध पुन्हा सलोख्याचे व्हावे यासाठी प्रयत्न करणे हे त्यांच्यापुढे मोठे आव्हान असेल. आणि इथेच त्यांच्यातील मुसद्देगिरीची खरी कसोटी लागणाार आहे.

असा एक पारंपरिक समज आहे की, एक बाईच दोन घरांमधील विस्कटलेल्या संबंधांची घडी प्रेमाने, प्रसंगी कठोर निर्णयांतून घालू शकते. गीतिका श्रीवास्तव यांना नेमकं हेच करायचं आहे!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First woman officer geetika srivastava has been appointed as charge daffaires at its high commission in islamabad pakistan dvr
First published on: 01-09-2023 at 16:16 IST