वजन घटवण्याच्या प्रयत्नांमध्ये पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांना अधिक अडचणी येण्याच्या वेगवेगळ्या कारणांचा आढावा नेहमीच आहारतज्ञ, आरोग्य क्षेत्रातील मंडळी तसंच फिटनेस ट्रेनर्स घेत असतात. आरोग्यदायी जीवनशैलीसाठी, हालचालींतील चपळतेसाठी ही मंडळी व्यक्तिगणिक स्वास्थ्याचा अभ्यास करून एकसामायिक अशा उपयुक्त टिप्ससुद्धा देत असतात. या सगळ्यामध्ये अतिरिक्त वजनाचा मुद्दा बहुतांशवेळा चर्चेचा विषय असतो.
आणखी वाचा : किशोरी पेडणेकरांना खुलं पत्र : ‘तसल्या’ आणि ‘घरंदाज’ बायका म्हणजे नेमकं काय हो?
‘बॉडी शेमिंग’वरून अनेक जणांना टीका, टोमण्यांचा सामना करावा लागतो. तिथे स्त्री-पुरूष असा भेदभाव सहसा नसतो. अतिरिक्त वजनाची समस्या ही सामाजिक आरोग्यासाठीही चिंतेची बाब आहे. परंतु यात स्त्री-पुरूष भेद लक्षात घेणं आवश्यक आहे का, स्त्री आणि पुरूषांमध्ये वजनवाढ आणि वजन कमी करणं, या संदर्भातला वेगळेपणा, याची काही वेगळी कारणं आहेत का, याविषयी न्युट्रिशनिस्ट भक्ती कपूर यांनी आपली मतं नोंदवली आहेत. कपूर यांच्या म्हणण्यानुसार ‘वेटलॉस’ या विषयाला अनेक पैलू आहेत. स्त्री-पुरूषांच्या बाबतीत प्रत्येकाचं आरोग्य, त्यांच्या शरीराची ठेवण, त्यांनी निवडलेली किंवा पत्करलेली जीवनशैली, शिस्त, या सगळ्याचा विचार वजन कमी करण्यापूर्वी करावा लागतो. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्त्रियांना येणाऱ्या अडचणींची कारणंही अनेक आहेत. स्त्रियांना पुरूषांपेक्षा जरा जास्तच आव्हानांचा सामना या बाबतीत हमखास करावा लागतो.
आणखी वाचा : International Day of the Girl Child: एका दिवसासाठी ‘ती’ झाली भारतातील ब्रिटिश उपउच्चायुक्त
पुरूषांना वजन कमी करण्यासाठी स्त्रियांच्या मानानं फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. कधी कधी ‘सेक्स हार्मोन्स’च्या (टेस्टॉस्टेरॉन) कमतरतेमुळे वजन घटवण्यात अडथळा येतो. या हार्मोन्सची पातळी वाढण्यासाठी, ती संतुलित करण्यासाठी इंजेक्शन्स घेणाऱ्या काही पुरूषांचं ११ वर्षं सलग, अभ्यासपूर्वक निरीक्षण करण्यात आलं. या निरीक्षणातून असा मार्ग निवडणाऱ्या पुरूषांनी आपल्या वाढीव वजनाच्या किमान २० टक्के वजन घटवण्यात सहज यश मिळवल्याचं समोर आलं.
आणखी वाचा : सुंदर मी होणार : निगा हात आणि पायांची
मानवी शरीरामध्ये चरबी किंवा मेद हा आवश्यक घटक असतो. शरीराला ऊर्जा देण्याचं काम ही चरबी करते. शरीराला पोषक द्रव्यं पुरवणं, पेशींची देखभाल करणं, विविध अवयवांना संरक्षण देणं, अशी कार्य या चरबीमार्फत केली जातात. परंतु चरबीचं असंतुलन हे अनारोग्याला निमंत्रण देणारं, वजनवाढीला पूरक ठरू शकतं. स्त्रियांपेक्षा पुरूषांच्या शरीरावर चरबीचं प्रमाण कमी असतं आणि स्त्रियांमध्ये ते अधिक असतं. पुरूषांमध्ये चरबी खांद्यापासून पोटापर्यंतच्या भागात साचलेली असते, तर स्त्रियांमधे मांड्या आणि नितंबांवर. मानवी शरीरात न वापरले गेलेले फॅट्स किंवा चरबी साठवण्यासाठी शरीर पेशींची संख्या तसंच आकारही वाढवतं. ही बाब या दोहोंमधील वजनवाढीसंदर्भातल्या असंतुलनाला कारण ठरते. माणसाच्या शरीराच्या वेगवेगळ्या कार्यांमध्ये हार्मोन्सचं कार्य महत्त्वाचं असतं. स्नायू बळकट होणं, बॉडी फॅट कमी करण्यापासून ते अगदी रोजच्या जगण्यातले वेगवेगळे ताणतणाव आणि असह्य भूकेचा सामना करण्यापर्यंत वेगवेगळ्या क्रियांमधे हार्मोन्स सहाय्यकारी असतात. परंतु शरीरात हार्मोनल असंतुलन निर्माण झालं असेल, तर अशा वेळी वजन घटवण्याच्या प्रक्रियेमधे अडथळा निर्माण होतो.
आणखी वाचा : सुंदर मी होणार – डोळे आणि ओठांची काळजी
स्त्री आणि पुरुष यांच्यामधल्या चरबीच्या प्रमाणाचा संबंध त्यांच्या वजनाशी नसतो, तर त्याचं प्रमाण हे स्त्री-पुरुषाच्या शरीररचनेमध्ये दडलेलं आहे. विज्ञान असं सांगतं, की स्त्रियांमधे पुरूषांपेक्षा ११ टक्के अधिक बॉडी फॅट असेल, तर त्याचा अर्थ ती त्यांच्यापेक्षा ११ टक्क्यांनी अधिक जाड आहे असा अजिबात होत नाही. कारण स्त्रियांच्या बाबतीत हे ११ टक्के अतिरिक्त प्रमाण नैसर्गिक असतं. त्यातही स्त्रिया अगदी बांधेसूद शरीराच्या असल्या, तरीदेखील त्यांच्यातील बॉडी फॅटचं प्रमाण ६ ते ११ टक्क्यांनी नेहमीच पुरूषांपेक्षा अधिक असतं, हे कायम शरीरविज्ञानाच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे वजनाची समस्या सोडवायचा निश्चय केला असेल, तर कमी खाणं किंवा उपाशी राहाणं, यापेक्षा संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि आयुष्याला शिस्त या त्रिसूत्रीस आचरणात आणावं लागेल, असं भक्ती कपूर आग्रहानं सांगतात.