डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत अनेक ठिकाणी पुष्प प्रदर्शनं भरवली जातात. या वर्षी मुंबईतील एका जुन्या वनस्पती संवर्धन संस्थेतर्फे भरविलेल्या प्रदर्शनाला गेले होते. नेहमीप्रमाणेच ते सुरेख होतंच. प्रदर्शनाचं दुसरं आकर्षण म्हणजे बाहेर लावलेले स्टॉल्स. तिथे फेरफटका मारत असताना एक चांगला बदल जाणवला तो म्हणजे एकही स्टॉल वाईल्ड ऑर्किड्सची विक्री करणारा नव्हता. एरवी केरळ, तमिळनाडू, आसाम, गंगटोक इथून आणलेली जंगली ऑर्किड्स अगदी स्वस्तात विकली जातात. याची काळजी कशी घ्यायची, लावायची कशी, फुलं कधी येतील, रंग कोणता असेल कशा कशाची माहिती न देता हिरीरीने यांची विक्री होई. मग नवशिके, किंचित वनस्पती प्रेमी, परवडतंय या सदराखाली येणारे असे सगळेजण येथील ऑर्किड्स घ्यायला गर्दी करताना दिसायचे. एवढी की स्टॉलवर उभं राहायला जागा नसे. पण हे चित्र मला यावेळी मात्र अजिबात दिसलं नाही आणि मनाला समाधान वाटलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की मी हे असं का म्हणतेय. तर त्यांचं कारण असं आहे की, ही ऑर्किड्स म्हणजे अमरीची फुलं ही बहुतांशी जंगली, नैसर्गिक अधिवासात वाढणारी असतात. त्यांना तेथून उपटून आणणं हे जवळ जवळ फुकट असलं आणि आणणाऱ्याला पैसे मिळवून देणारं असलं तरी त्यामुळे निसर्गाचं मोठं नुकसान होतं. चांगल्या दुर्मिळ जाती या प्रकारामुळे नष्ट होतात. जंगलातलं हे अस्पर्श सौंदर्य पुढच्या पिढीतील निसर्ग प्रेमींसाठी, ट्रेकर्ससाठी, वनस्पती अभ्यासकांसाठी राखून ठेवायचं असेल तर याला आळा बसायलाच हवा होता.

आता सुदैवाने हा बदल होताना दिसतोय. काय असं वेगळेपण असतं या ऑर्किड्समध्ये?

तर मुळात यातील बहुतांशी ऑर्किड्स ही दुर्मिळ या सदरात मोडणारी आहेत, प्रदेशनिष्ठ आहेत. यांचं अनुपम सौंदर्य तेथील नैसर्गिक अधिवासात अनुभवावं असंच असतं. त्यांना ओरबाडून कुंडीत लावण्याचा अट्टहास करू नये. इशान्येकडील राज्ये, दक्षिण भारत, पश्चिम घाट प्रदेश इथे अमरी मोठ्या प्रमाणात आढळते. सिक्कीम तर ऑर्किड्सचा स्वर्ग.

मेघालयात साकुराचा पुष्पोत्सव पाहायला गेलो होतो त्यावेळी धावकी नदीच्या काठी असलेल्या मॉली नॉंग या भारतातल्या सर्वात स्वच्छ अशा गावाला भेट दिली होती. वैशिष्टपूर्ण असं हे गाव खरंच फार देखणं आहे. बाग्लांदेश आणि भारताची सीमा यांना जोडणारी धावकी नदी कमालीची स्वच्छ आहे. तिचं नितळ, आरस्पानी पाणी, त्यातून दिसणारा नदीचा तळं, सभोवताली पसरलेले उंच डोंगराएवढे खडक, त्यात उगवलेल्या वनस्पती. ते दृश्य एरवी आपण फारसं पाहिलेलं नसतं. या नदीतून प्रवास करताना छोट्याशा बोटीतून फिरताना नक्की काय पाहावं, नितळ स्वच्छ पाणी, त्यातून दिसणारा गुळगुळीत दगडांचा तळ की सभोवतालचे कातळ हाच प्रश्न पडतो. नदीतून फेरफटका मारल्यावर आम्ही गावात गेलो. गाव अतिशय स्वच्छ आणि रेखीव होतं. छोटी सुबक घरं, बंगले नव्हे, तर घरं. प्रत्येक घराला अंगणं, अंगणात विविध फुलझाडं, अनेक प्रकारच्या वेली, फळझाडं आणि मुख्य म्हणजे घराघरात लावलेली अनेक प्रकारची ऑर्किड्स. एका एका घरात डोकावत मी निरीक्षण करत होते. विस्टेरीयाच्या सुरेख नाजूक फुलांनी सजवलेला वेल एका अंगणात माझं लक्ष वेधून गेला, म्हणून आत डोकावले तर घर मालकिणीने सुरेख ऑर्किड्स लावली होती. मोठ्या आनंदाने तिने मला त्यातली काही भेट दिली.

माझ्याजवळच्या वैशिष्ट्य पूर्ण फुलांच्या आणि भाज्यांच्या बियांची देवाणघेवाण करण्याच्या बोलीवर मला या गावातील लोकांनी अनेक प्रकारची ऑर्किड्स भेट दिली. हे सगळं ते अतीव प्रेमाने करत होते. निसर्गाच्या सानिध्यात राहणारा माणूस नकळतच निसर्गाचे गुण अंगी बाणवत असतो. निसर्ग हा दाता असतो, तो दातृत्वाचा गुण मला इथल्या प्रत्येक घरात आढळला. ही गावं फेरी अनोखीच ठरली. घरी आल्यावर अर्थातच मी त्यांना फुलझाडं आणि भाज्यांच्या बिया पाठवल्या. या भेटीत मिळालेलं एक साधं दिसणारं ऑर्किड लावून बरेच दिवस झाले, पण ते होतं त्या अवस्थेतच होतं. त्याला ना फुलं येत होती ना पानं. मुळात याची पानं होती लांब, मांसल देठासारखी. फुलं कोणती असतील हे गुढंच होतं, पण साधारण आठ महिन्यांनी पानांच्या बेचक्यातून एक दांडी वर आली आणि तिला कळ्या दिसू लागल्या. मॉस स्टीकच्या आधाराने वाढणाऱ्या या ऑर्किडच्या कळ्या एक दिवस उमलल्या. विलक्षण सुंदर असं ते वांडा मिस जॉकिंम ऑर्किडचं फूल होतं. पुढे अधिक शोध घेतला तेव्हा कळलं की हे सिंगापूरचं राष्ट्रीय फूल आहे. मॉली नॉंगकरांनी ही अशी सुंदर भेट मला दिली होती.

mythreye.kjkelkar@gmail.com